आम्ही बदलली १३ घरे (भाग - ९)
भावकी भाग - २
नुकताच लागलेला निकाल हा आईने मला शिकवताना उपसलेल्या कष्टाचं फळ होतं. गावाकडे, रानात जाताना, ती मला कडेवर घ्यायची आणि डोक्यावर जेवणाच्या डब्यांचं घमेलं असायचं. चालता चालता मला ती बाराखडी पाढे शिकवायची, गोष्टी सांगायची. आमचं शेत गावापासून २ मैलांच्या अंतरावर होतं, ओझं कडेवर असल्यामुळे चालायला वेळ लागायचा. हे बघून वाटेत भेटणारे येणारे-जाणारे, काही जण मस्करीमध्ये पाय खेचायचे, तर काही जण कौतुकाने म्हणायचे,
"मीराबाई, तुह्य ल्योक कलेक्टर व्हईल बघ.. गावात एकदम साहेब व्हऊन यील.."
पुण्यात आल्यानंतर आईच्या दिनचर्येत जरा बदल झाला होता. तिची धडपड आणि चिडचिड थोडी कमी झाली होती. गावाकडे असताना, मला ती माझी आई वाटायचीच नाही; तिने सारखं स्वतःला काही ना काही कामातच वाहून घेतलेलं असायचं. गावाकडे असताना आमच्या घरात १५ माणसं. स्वयंपाक, धुणी-भांडी आणि वरून आडातून पाणी शेंदून आणून, मोठ्ठाले तीन रांजण भरावे लागायचे. आमचे पंजोबा आणि आजोबांच्या आत्या दोघेही आमच्या घरी, अंथरुणाला खिळून, त्यांची सेवा करावी लागायची. आणि ह्यातून वेळ मिळालाच तर शेतात राबायला जावे लागे.
आणखी एक जगावेगळंच प्रकरण होतं आमच्या घरात. आमच्या वाड्यात, एक बाळंतीणीची खोली होती आणि सर्वांनी अगदी मनावरच घेतलं होतं की काय, ही खोली रिकामी ठेवायचीच नाही. जोपर्यंत आम्ही तिथे होतो तोपर्यंत, झालंही तसंच. त्या खोलीत नेमाने कोणी ना कोणी बाळंतीण असायचीच. मग त्यांची सेवा.. घरातले सर्वजण त्यात व्यस्त.
तशी आई माझी हक्काची, पण तिथे मला तिचा निवांत असा वेळ मिळायचाच नाही. मात्र, पुण्याला आल्यापासून माझी चंगळ होती. आई फक्त माझी होती. जे नाना पारगावला असताना रात्रंदिवस रानात काम करत असायचे आणि बरेच दिवस दिसायचेही नाहीत, आता तेही माझ्यासोबत वेळ घालवू लागले होते. त्यांना हळूहळू काम आणि घर यांचा मेळ घालता यायला लागला होता. त्यांनी नुकतीच मला पंखांची होडी बनवायला शिकवली होती. येणाऱ्या पावसाळ्यात आम्ही अशा होड्या बनवून, आमच्या घराजवळून वाहणाऱ्या ओढ्यात सोडणार होतो.
नानांच्या शिफ्ट असायच्या. जेव्हा केव्हा त्यांची रात्रपाळी असायची, तेव्हा ते त्यांच्या कॅन्टीनमधून मफिन, बन मस्का, खारी किंवा नानकटाई घेऊन यायचे. आता मी एकटाच होतो. जो खाऊ यायचा तो फक्त माझा असायचा. आता त्याचे तीन भाग होणार नव्हते. मी माझ्या 'एकुलता एक' असण्याचा पुरेपूर फायदा घेत होतो.
आमचा दिगू दादाही असाच एकुलता एक, त्याचे पण भरपूर लाड व्हायचे. आत्या आणि मामा त्याला हवं ते आणून द्यायचे. माझ्या धाकट्या आत्यालाही एकच मुलगा - आदित्य. त्याचीही अशीच मजा. घरात येणारी प्रत्येक गोष्ट त्यांचीच. आई-वडील फक्त तुमचेच. फक्त ऑर्डर सोडा, हट्ट करा; पाहिजे ते मिळणार! 'एकुलता एक' असणं म्हणजे मज्जाच! देवाने आदल्या जन्मी केलेल्या पुण्याचं फळ म्हणून की काय, मला हे 'एकुलतेपण' दिलं होतं.
पुण्यातले ते 'एकुलतेपणाचे' राजेशाही दिवस जगत असतानाच उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि आम्ही पाटोद्याला, माझ्या आजोळी गेलो. तिथे गेल्यावरही, जागा बदलली तरी माझा 'रुबाब' मात्र तसाच होता. सुट्टी अगदी मजेत चालली होती. एक दिवस दुपारी, वाड्याच्या प्रशस्त बैठकीत आजोबांची मैफल जमली होती. त्यांचे भलंमोठं मित्रमंडळ तिथे हजर होतं. खुद्द आजोबा माझं 'प्रगती पुस्तक' हातात घेऊन, एखाद्या सरदारासारखे रुबाबात बसले होते.
मध्यभागी तंबाखूने खच्चून भरलेली चिलीम तयार होती. आजोबांनी ती चिलीम डाव्या हातात उचलली. उजव्या हाताने, नारळाच्या शेंडीचा धगधगता निखारा चिलीमीच्या तोंडावर अलगद ठेवला. चिलीमीच्या बुडाला ओलं कापड गुंडाळलं आणि दोन्ही हातांच्या ओंजळीत ती चिलीम अशी पकडली, जणू काही एखादा दागिनाच.
त्यांनी चिलीम तोंडाला लावली आणि डोळे मिटून एक दीर्घ, जोरदार 'दम' लावला. क्षणात, चिलीमी मधला विस्तव फुलला आणि आजोबांनी नाका-तोंडातून धुराचे भलेमोठे लोट हवेत सोडले. तो पांढरा शुभ्र धूर आणि तंबाखूचा तो उग्र वास तिथे पसरला. एक समाधानी हुंकार देत, त्यांनी ती धगधगती चिलीम शेजारी बसलेल्या शास्त्री काकांकडे सरकवली आणि जमलेल्या सगळ्यांना अभिमानाने सांगायला सुरुवात केली—
"आमच्या गणोबान आमच नाव काढलं, पैकीच्या पैकी मार्क पाडलेत.., ते ही पुण्याच्या शाळेत.. हे बघा!"
अस म्हणत, माझं प्रगती पुस्तक, मित्र मंडळीत फिरवलं. मी बैठकीच्या दारात उभा राहून हे सर्व पाहत उभा होतो. त्यांनी माझ्या कडे हात करून हाक मारली "गणोबा, इकडे या.. " आणि माझा हात धरून, पुढचे १५-२० मिनिटे माझं मनसोक्त कौतुक करत होते..
समोरचं दार उघडं होतं, मला दारातून आज्जी आणि मामी, आईला धरून सायकल रिक्षात बसवताना दिसल्या. त्या कुठे तरी चालल्या होत्या. मला पण त्यांच्या बरोबर जायचं होत, पण मी आजोबांचा हात झटकून जाऊ शकत नव्हतो.. मी निमूटपणे तिथे तसाच उभा राहून, त्यांना रिक्षातून जाताना पाहत राहिलो.
संध्याकाळी, मी दाराच्या चौकटीत बसून आईची वाट पाहत होतो, आई कुठे गेली आहे याचाच विचार करत होतो, आणि तेवढ्यात मामांने मला जे सांगितलं ते ऐकून पायाखालची जमीनच सरकली.. घात झाला..! मी इतका गाफिल कसा राहिलो? आपल्याला कस काही कळलं नाही? ना आईनं काही सांगितलं ना वडिलांनी.. अचानक अस कसं झालं? मी अवाक् होऊन विचार करत होतो. पूर्णपणे गोंधळून जाऊन शांत राहण्याचा प्रयत्न करत होतो..
आता माझ्या प्रत्येक सुखाचा वाटेकरी आला होता... आणि आमच्याच घरात, खुद्द माझ्याच राज्यात, 'भावकी'चा उदय झाला होता!





0 Comments:
Post a Comment