आम्ही बदलली १३ घरे (भाग १)
माणूस एकदा घर बदलतो, दोनदा बदलतो... आम्ही तब्बल १३ वेळा बदलली!
प्रत्येक घरातलं वातावरण वेगळं, तिथले प्रश्न वेगळे आणि तिथली 'पात्रं' तर त्याहून वेगळी. घर बदलण्याच्या या धावपळीत सामानाची मोडतोड झाली, त्रास झाला, पण अनुभवांची मात्र श्रीमंती मिळाली.
या लेखमालेतून मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या या १३ घरांच्या प्रवासावर. जिथे तुम्हाला भेटतील काही कडू, काही गोड आणि काही निव्वळ हसवून लोळवणारी माणसं!
सुरुवात करूया पुण्यातल्या एका चाळीवजा घरातून... जिथे पाण्यासाठी युद्ध व्हायचं ..वाचा, माझा हा पहिला अनुभव...
लहानपणी आम्ही पुण्यात (पिंपरी - चिंचवड मधे) एका भाड्याच्या खोलीत राहायचो. "भाड्याची खोली" म्हटलं, की ज्या-ज्या गोष्टी डोक्यात येतात किंवा "डोक्यात जातात", त्या सगळ्या तिथे हजर होत्या. १०x१२ ची ती 'प्रशस्त' खोली, सार्वजनिक शौचालय, घरमालकाची अखंड कटकट आणि आमचा तो विख्यात 'सार्वजनिक नळ'... यादी बरीच मोठी आहे!
आमचा नळ... म्हणजे फक्त आमचाच नाही, तर आजूबाजूच्या तीस-एक कुटुंबांची ती जीवनवाहिनी (आणि रणभूमी) होती. पाणी सकाळी आणि संध्याकाळी जेमतेम दोन-दोन तास दर्शन द्यायचं. त्यामुळे सकाळी पाणी जाऊन नळ कोरडा पडला, की लोक संध्याकाळच्या पाण्यासाठी तिथे हंडा-कळशी ठेवून 'बुकिंग' करायचे. काहीजणांची दादागिरी तर अशी, की एकदा का नळाचा ताबा घेतला, की घरातली सर्व भांडी... अगदी तांबे, पेले आणि वाटी-चमचे काठोकाठ भरल्याशिवाय ते नळाचा ताबा सोडत नसत. चुकून कोणी त्यांना जाब विचारलाच, तर 'उच्चकोटीच्या' अस्सल गावरान मराठी भाषेत तुमचा आणि तुमच्या सकल खानदानाचा यथेच्छ उद्धार झालाच म्हणून समजा!
या नळावरच्या रणरागिणींमध्ये आमच्या एक काकू होत्या. एकदम धष्टपुष्ट आणि दणकट!... सततच्या आठ्यांमुळे सुरकुतलेलं कपाळ आणि त्यावर नवऱ्याच्या कर्तृत्वापेक्षाही (आणि आकारापेक्षाही) मोठं लावलेलं कुंकू! जेमतेम हातभर केस, पण त्यांचा कसंबसं बांधलेला अंबाडा. सहावारी साडी अंगाला अपुरी पडेल या भीतीने बहुतेक त्या नऊवारी नेसायच्या. तोंडात मशेरी आणि सोबतीला चारचौघींचा घोळका घेऊन त्या गप्पा छाटत बसलेल्या असायच्या. या चारचौघी म्हणजे आमच्या गल्लीचे 'सीसीटीव्ही कॅमेरे' होत्या आणि आमच्या ह्या काकू म्हणजे त्यातला 'मास्टर कॅमेरा'!
एक गोष्ट मात्र मला आजपर्यंत न उमगलेलं कोडं आहे, ती म्हणजे अख्खी गल्ली ह्या काकूंना "मम्मी" म्हणायची. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत... "मम्मी"! अमुकची मम्मी किंवा तमुकची मम्मी नाही, तर युनिव्हर्सल "मम्मी". त्याकाळी आई-बाबांना मम्मी-पप्पा म्हणण्याचं नवीनच फॅड आलं होतं. काही अतिउत्साही मुलं तर काका-काकूंना सुद्धा 'मोठे पप्पा' आणि 'मोठी मम्मी' म्हणायची. स्वतःच्या आईला मम्मी म्हटलं तर समजू शकतो, फार तर सासूच्या धाकापोटी तिला 'मम्मी' म्हटलं तरी तो नाईलाज समजता येईल, पण दुसऱ्याच्या आईला, काहीही संबंध नसताना 'मम्मी' म्हणणं म्हणजे... हद्दच झाली राव!
बरं, या 'मम्मी'ला मम्मी म्हणणारे तिच्या घरात तरी कुठे कमी होते? तीन मुले आणि एक मुलगी! दोन सुपुत्रांची लग्ने झाल्यामुळे दोन सुना, मुलीचं लग्न झालं असूनही तिचा मुक्काम सतत माहेरीच, आणि उरला सुरला सगळ्यात धाकटा... ज्याच्यासाठी मम्मीचा 'सुनेचा शोध' हा अविरत चालूच होता!
क्रमशः
- प्रस्मित






0 Comments:
Post a Comment