आम्ही बदलली १३ घरे (भाग - १७)
आठवणींचा पाऊस (भाग - २) - 'सायकल'
आमचे आप्पा काका उर्फ 'सुधाकर', म्हणजे माझ्या वडिलांचे सख्खे जुळे भाऊ.. तंतोतंत 'कार्बन कॉपी'! अंगकाठी, रंगरूप, उंची आणि स्वभाव... सगळं डिट्टो. देवाने दोघांना घडवताना एकाला निवांत बनवलं असावं आणि दुसऱ्याला चक्क 'कॉपी-पेस्ट' करून मोकळा झाला असावा! देवाने इथे जरा आळशीपणाच केला म्हणायचा. जन्मात फक्त दोन मिनिटांचा फरक, पण त्यामुळे आप्पा काका 'मोठे' झाले. लहानपणापासूनच आमच्या 'गण्या-दिन्या' सारखीच ह्यांची 'रमा-सुधा' ची जोडी पंचक्रोशीत फेमस होती.
आमचे आप्पा काका म्हणजे पोस्टमन. गावाच्या आसपासची खेडी आणि छोट्या-छोट्या वाड्या-वस्त्यांवर त्यांना जावं लागायचं. हा सगळा प्रवास ते त्यांच्या सायकलवरून करायचे. आमच्या घरातली हीच ती एकुलती एक सायकल! बाकी घरातल्या कुणाला कधी इतकं फिरायची गरजच पडली नाही, त्यामुळे कदाचित इतर कोणी सायकल शिकायचा प्रयत्नही केला नसावा.
आम्हाला मात्र गावातल्या गावात, रानात किंवा फाट्यावर.. कुठेही जायचं झालं, तरी नुसती पायपीट करावी लागायची. त्या इवल्याशा वयात एक-दोन किलोमीटर चालणं म्हणजे, माझ्या त्या चिमुकल्या पायांवर झालेला घोर अत्याचारच वाटायचा मला! मग कधी हट्ट करून नानांच्या खांद्यावर, तर कधी आई किंवा आत्याच्या कडेवर जाण्यासाठी मी घरातून निघाल्यापासून मागे लागायचो. आणि जर त्यांनी उचलून घेतलं नाही, तर तिथेच भोकाड पसरायचो.
माझ्या या अशा वागण्यामुळेच मग घरच्यांनी मला असं उगाच बाहेर नेणं कमीच करून टाकलं होतं. पण जेव्हा आप्पा काका कुठे बाहेर जायचे, आणि ते ही त्यांची सायकल घेऊन... तेव्हा मात्र मी नेमानं त्यांच्या मागे लागायचो.
त्यांची ती सायकल म्हणजे एकदम भक्कम आणि रुबाबदार! रंगाने पूर्ण काळीभोर, आणि त्यावर 'अॅटलास' कंपनीची ती अस्सल सोनेरी नक्षी. आप्पा काकांनी त्या सायकलला अगदी जिवापाड जपलं होतं आणि आपल्या आवडीने थोडं सजवलंही होतं. हँडलच्या दोन्ही मुठींना लटकणारे ते रंगीत गोंडे सायकलची शोभा अजूनच वाढवत होते. तिला आजच्या सायकलसारखे नाजूक वायरचे ब्रेक नव्हते, तर लोखंडी सळ्यांचे खणखणीत 'रॉड ब्रेक' होते.
हँडलच्या मधोमध एखाद्या मोटारीला असावा तसा एक दिवा (Headlight) होता. चाक फिरलं की तो असा लकाकायचा की बस्स! मला नेहमी आश्चर्य वाटायचं, 'ना सेल, ना बॅटरी, मग हा दिवा लागतो तरी कसा बुवा?' एकदा काकांनी चाकाला लागून असलेला तो मोठा 'डायनामा' दाखवला आणि त्याचं विज्ञानही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते सर्व तेव्हा माझ्या डोक्यावरूनच गेलं होतं. खरं तर, त्यामागचं विज्ञान समजून घेण्यापेक्षा, त्या गोष्टीकडे 'जादू' म्हणून बघण्यातच खरी मजा होती... म्हणूनच कदाचित ती जादू मनात तशीच जपून ठेवावीशी वाटत होती.
पोस्टमनची सायकल म्हणून की काय, तिचं मागचं कॅरियर सुद्धा भलं मोठं आणि रुंद होतं, ज्यावर आप्पा काकांच्या टपालाच्या खाकी पिशव्या आरामात विसावायच्या. तिची ती कातडी सीट आणि त्याखालील मोठ्या स्प्रिंग्स... सायकल चालताना त्या स्प्रिंगचा आणि साखळीच्या कव्हरचा एक लयबद्ध 'खर्र-खर्र' आवाज यायचा, जो आजही कानात घुमतोय. आणि सर्वात भारी म्हणजे तिची ती पितळी वाटीची 'ट्रिंग ट्रिंग' करणारी घंटी, जी विनाकारण वाजवायला मला भारी मजा यायची!
सायकलवरून जाणं म्हणजे माझ्यासाठी एक मोठी पर्वणीच असे. माझ्या त्यावेळच्या 'विशेष' हट्टी स्वभावामुळे असेल कदाचित, पण काका मला कधीच मागे कॅरियरवर बसवत नसत. माझी जागा ठरलेली-समोरचा दांडा! तिथे ते काळजीपूर्वक एक जाडजुड टॉवेल गुंडाळायचे आणि मग मला त्यावर बसवून, माझे पाय व्यवस्थित दुमडून समोरच्या मडगार्डवर ठेवायला सांगायचे. ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे एखाद्या सेवकाने आपल्या 'बाळराजांसाठी' शाही घोडा तयार करावा, तशीच वाटे. त्यावेळी माझी ऐट आणि रुबाबही एखाद्या राजपुत्रापेक्षा कमी नसायचा.
मी एकदाचा त्या टॉवेलयुक्त दांड्याच्या 'सिंहासनावर' विराजमान झालो की लगेच गाडी सुटत नसे. आधी पुढची ५-१० मिनिटे 'यात्रीगण कृपया ध्यान दे..' असा सूचनांचा कार्यक्रम चाले... आणि मगच आमची स्वारी पुढे सरके. मी जेमतेम २-३ वर्षांचा असेन. आप्पाकाकांच्या सायकलच्या दांड्यावर बसलो की माझे चिमुकले पाय चेन-कव्हरपर्यंत सुद्धा पोहचत नसत. पण हँडलवर हात ठेवून बसल्यावरचा तो रुबाब मात्र असा असायचा, की जणू सायकल मीच चालवतोय!
रस्त्यात येणाऱ्या प्रत्येकाला घंटीच्या 'ट्रिंग ट्रिंग' आवाजाने हैराण करून सोडण्यात एक वेगळीच मज्जा यायची. उन-सावलीच्या खेळात आमच्या बरोबर पळणारी आमची उंच-बुटकी सावली आणि धावणारा रस्ता पाहण्यात मी हरवून जायचो. सायकल चालू लागल्यानंतर माझी बडबड सुरू व्हायची. आप्पा काका फक्त '.. हुं ..' म्हणायचे.. मला तर माझी बडबड सुरू ठेवायला त्यांच्या प्रतिसादाची काहीच गरज नव्हती.
गावातल्या जुन्या रस्त्यावरून सायकल धावताना होणाऱ्या खडखडाटामुळे माझ्या आवाजालाही एक कंप सुटायचा. सायकलच्या त्या धक्क्यांनी माझा आवाजही 'कातर' व्हायचा. कधी काही बोलायला नसेल, तर मी मुद्दाम 'आssssss' असा आवाज काढत राहायचो. त्या थरथराटात तो आवाज किती मजेशीर आणि विचित्र ऐकू यायचा! अंगावर येणारी ती गार वाऱ्याची झुळूक आणि ती सायकलची दांडी एक थंड जागेचं ठिकाणच वाटायची. आज गाड्यांचे ए.सी. आहेत, पण त्या उघड्या वाऱ्यातली आणि आप्पा काकांसोबतच्या त्या खडखडणाऱ्या प्रवासाची आठवण अजूनही तशीच आहे.
असाच एक दिवस... आमच्या घरी पाहुणे येणार होते. आजोबांनी आप्पा काकांना शेतातून हुरड्यासाठी ज्वारीची कोवळी कणसं आणायला सांगितली. पाहुण्यांच्या येण्यामुळे आज हुरड्याचा बेत ठरला होता. आईने आधीच शेंगदाण्याची खमंग चटणी कुटून ठेवली होती. आम्ही बच्चेकंपनी पाहुणे आल्यामुळे खूश होतोच, पण त्याहून अधिक हुरडा भाजला जाणार, किस्से रंगणार आणि गाण्यांची मैफिल जमणार, या कल्पनेनेच हुरळून गेलो होतो.
इतक्यात माझं लक्ष बैठकीतून बाहेरच्या ओट्याकडे गेलं. तिथे आप्पा काका सायकल काढत होते. त्यांनी सायकल रस्त्यावर उतरवली, आणि एका ढांगेतच सायकलवर मांड ठोकून ते शेताच्या वाटेला लागले. हे पाहताच माझा आनंद क्षणात मावळला. मलाही काकांबरोबर शेतात जायचं होतं! मी एका हाताने आपली ढगळ चड्डी सावरत, पळतच दारात आलो.
"आप्पा काका... ओ आप्पा काका..." मी जीवाच्या आकांताने हाका मारत होतो. माझा आवाज त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचत असावा, पण बहुधा मला नेण्याचा त्यांचा विचार नसावा... म्हणूनच ते न थांबता पुढेच निघाले.
ते तसेच पुढे चालले आहेत हे पाहून, चड्डी सावरतच मी थेट रस्त्यावर धूम ठोकली. त्यांच्या सायकलमागे जिवाच्या कराराने धावू लागलो. पायात चप्पल नव्हती, रस्त्यावरची ती बारीक खडी तळपायांना रूतत होती, टोचत होती... तरीही मी पळतच होतो. आप्पा काका आता बरेच लांब गेले होते. "आता हे आपल्याला सायकलवर नेणार नाहीत..." ही जाणीव होताच, धावता धावता माझ्या गळ्यात हुंदका दाटला आणि मी मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली.
एका हाताने कमरेची निसटणारी चड्डी आणि दुसऱ्या हाताने रडल्यामुळे वाहणारं नाक पुसत, मी त्या धुळीने भरलेल्या रस्त्यावर आप्पा काकांच्या सायकलमागे धावतच होतो...
क्रमशः





खुपचछान जुन्या आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद शुभाशीर्वाद अभिनंदन ऊ
ReplyDeleteThank you!!
Deleteसायकलच वर्णन वाचून मला माझ्या बाबांची सायकल आठवली. तीच मोठी सायकल पाय जमिनीला टेकत नसताना देखील तशीच कैंची करत चालवायचो. आणि चमड्याची सिट हा देखील एक प्रकार त्याकाळी अस्तित्वात होता हे आजच्या पिढीला सांगितलं तर आश्चर्य वाटेल त्यांना. आपल्या लहानपणी भलेही जागा वेगवेगळ्या असतील पण अनुभव आणि आठवणी सारख्याच आहेत. म्हणून तुझी प्रत्येक गोष्ट relatable वाटते.
ReplyDeleteअगदी खरंय!! १९९० मध्ये almost सगळ्यांच्या बऱ्याच गोष्टी थोड्याफार फरकाने सेम होत्या.
Deleteआणि मला वाटलाच होत की तुला तुझ्या बाबांची सायकल नक्की आठवेल..🙂
Delete