आम्ही बदलली १३ घरे (भाग - १३)
"पुना" पुन्हा तोच उध्दार (भाग - २)
(आजचा दिवस)
मी आणि पप्या दुकानातून सामान घेऊन परतत होतो. पप्या मला एखाद्या 'वेल ट्रेंड गाईड'सारखा (Well-trained guide) गावाची ओळख करून देत होता. मी ही त्याची बडबड निमूटपणे ऐकत होतो, पण मनात मात्र 'हा कधी बोलायचा थांबतोय' असंच वाटत होतं. मी जरा त्याच्याकडे दुर्लक्ष करून रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या घरांचं निरीक्षण करण्यात मग्न झालो.
मला थेरगाव हे पारगावपेक्षा फारसं वेगळं वाटत नव्हतं. इथेही लोकांच्या दावणीला गाई-म्हशी होत्या. गावाला लागूनच पवना नदी वाहत होती—अगदी आमच्या 'तलवार' नदीसारखी, फक्त फरक एवढाच की ह्या नदीला बारमाही पाणी होतं. सारवलेल्या भिंती, काही भिंतींवर शेणाच्या थापलेल्या गोवऱ्या आणि फारच तुरळक दुमजली इमारती... सगळंच ओळखीचं वाटत होतं.
फक्त एकच गोष्ट मला फार वेगळी जाणवली, ती म्हणजे टीव्हीचे अँटिने! पारगावात कोणाच्या घरी टीव्ही आहे, हे त्यांच्या माळवदावरच्या उंचच उंच अँटीन्यावरून लांबूनच कळायचं. इथले अँटेने मात्र त्या मानाने फारच बुटके होते आणि बहुतेक त्यांना लावलेल्या काड्याही फार कमी होत्या. आणखी एक गंमत म्हणजे, काहींच्या घरावर ना छोटा अँटेने, ना मोठा; तरीही घरात टीव्ही आणि तोही रंगीत!
अशा गप्पा मारत आम्ही घरापाशी पोहोचलो, तर आजुबाजूला चांगलीच धावपळ उडालेली दिसली. पप्या एकदम उत्साहाने म्हणाला, 'काहीतरी राडा झालाय वाटतं!' आता काहीतरी धमाल बघायला मिळणार आणि पुढचे एक-दोन तास आपली फुकट करमणूक होणार, या आशेने आम्ही गर्दीतून वाट काढत पुढे निघालो.
आता कानावर रडण्याचे आवाज येऊ लागले होते. आम्ही जसजसे जवळ जात होतो, तशी आमची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. शेवटी मला आमच्याच पडवीजवळ बायकांचा घोळका दिसला आणि तो रडण्याचा आवाजही ओळखीचा वाटू लागला.
पप्या मला सोडून कधीच गायब झाला होता. मी त्या घोळक्यातून कसबस डोकावून पाहिलं... तर समोर साक्षात आई रडत होती! तिला रडताना पाहून माझे धाबेच दणाणले. आमची नेहमी 'मदर इंडिया'च्या तोऱ्यात वावरणारी आई आज अशी 'निरुपा रॉय'सारखी रडतेय, म्हणजे प्रकरण नक्कीच गंभीर आहे, हे मला कळून चुकलं होतं. माझ्या मनात नाना प्रकारचे विचार येऊ लागले.
(फ्लॅशबॅक - कालचा दिवस)
आम्ही काल दुपारीच सामानाचे दोन ट्रंक घेऊन थेरगावला पोहोचलो. हे गाव पाहून मला हायसं वाटलं; कारण शिवाजीनगरला एस.टी.तून उतरल्यापासून पुण्यातल्या त्या टोलेजंग इमारती बघून बघून मान दुखायला लागली होती.
गाड्यांनी गजबजलेले रस्ते, तो गोंगाट आणि हातगाड्यांनी व्यापलेले फुटपाथ पाहून, 'आपला इथे काही निभाव लागणार नाही' असंच वाटलं होतं. पण थेरगावला पाऊल टाकताच मनापासून वाटलं... हेच ते आपलं गाव!
काल नानांनी खास सामानाची आवराआवर करण्यासाठी सुट्टी घेतली होती. आई आणि नानांनी सामान लावायची खूप खटपट केली, पण तरीही पसारा काही संपत नव्हता. शेजारीच नानांच्या कंपनीत काम करणारे एक काका आणि त्यांचं कुटुंब राहत होतं. नानांनी त्यांना घरी चहाला बोलावलं आणि आमची ओळख करून दिली. 'पप्या' हा त्यांचाच मुलगा. त्याचं खरं नाव तसं 'अतुल' होतं, पण मला 'पप्या' हेच नाव जास्त आवडलं.
कारण गावाकडे असताना मला एक भारी गोष्ट समजली होती-ती म्हणजे, जिगरी मित्र एकमेकांना कधीच खऱ्या नावाने हाक मारत नाहीत, ते नेहमी टोपणनावच वापरतात! पप्या वयाने माझ्यापेक्षा दीड वर्षाने मोठा होता, पण गंमत म्हणजे येत्या जूनमध्ये शाळा सुरू होईल तेव्हा तो माझ्याच वर्गात, म्हणजे दुसरीलाच असणार होता. मला मात्र त्याच्या रूपात माझा भावी 'जिवलग मित्र' दिसत होता. त्यांनी त्यांच्या दोन्ही लहान मुलींचीही ओळख करून दिली, पण मला त्यांची नावेही जाणून घेण्यात काडीचाही रस नव्हता.
(फ्लॅशबॅक - आजची सकाळ)
आज सकाळी मी उठण्यापूर्वीच नाना 'फर्स्ट शिफ्ट'साठी निघून गेले होते. आईला चाळीची पूर्ण माहिती आणि कोणती गोष्ट कुठे आहे, याची कल्पना त्यांनी दिली होती. काही अडलं नडलंच, तर पप्याच्या आईची मदत घ्यायलाही त्यांनी सांगितलं होतं.
खिडकीतून आलेल्या सूर्यकिरणांनी मला जाग आली. तो प्रकाश पाहून मनात आलं, 'या नवीन घरातला हा पहिला सूर्योदय... जणू तो आयुष्यात एक नवा प्रकाश आणि नवी उमेद घेऊन आलाय.' मी उत्साहाने उठून पडवीत आलो आणि आळस देत बाहेर नजर टाकली.
बापरे! ही सकाळ गावाकडच्या शांत सकाळीपेक्षा किती वेगळी होती! नळावर पाण्यासाठी उडालेली झुंबड, डबे घेऊन कामाला पळणारे लोक आणि टोस्टवाले-खारीवाल्यांचे आवाज... हा सगळा गोंगाट, वातावरणात अगदी एकरूप झाला होता.
मी सकाळचं आवरून पप्याचीच वाट पाहत बसलो होतो. पण तो अजून उठला नव्हता. साहेबांची उन्हाळ्याची सुट्टी चालू होती ना, त्यामुळे सगळं कसं अगदी निवांत होतं! मी दोनदा त्याच्या घराच्या उघड्या दारातून डोकावून पाहिलं, तर आमचे साहेब एकदम पालथे पडून अडवेतेडवे पसरले होते. त्याच्यासाठी हा काही माझ्यासारखा 'आयुष्यातला पहिला सूर्योदय' नव्हता, हे माझ्या एव्हाना लक्षात यायला हवं होतं.
हातात काहीच काम नव्हतं आणि मी पूर्णपणे त्या पप्यावरच अवलंबून होतो, त्यामुळे मला आता भलताच कंटाळा आला होता. आईसुद्धा तिच्या कामात व्यस्त होती. माझा नुसता 'आत-बाहेर' असा खेळ सुरू होता; कधी घरात जाऊन बसायचो, तर कधी लगेच पडवीत येऊन बाहेर बघायचो. पण आता बाहेरची वर्दळ हळूहळू कमी झाली होती. नळही कोरडा पडला होता आणि रस्त्यावर तर आता शुकशुकाट होता. विशेष म्हणजे, सकाळपासून मला पप्याखेरीज माझ्या वयाचं दुसरं एकही पोरगं दिसलं नव्हतं.
मी पुन्हा एकदा पप्याच्या उघड्या दारातून आत डोकावलं... परिस्थिती 'जैसे थे' होती! हा कुंभकर्ण खरोखरच माझ्या संयमाचा अंत पाहत होता. माझी सकाळी वाटलेली ती नवी उत्सुकता दुपार व्हायच्या आतच मावळायला लागली होती.
तेवढ्यात मला आईची हाक ऐकू आली, 'गण्या sss ! ये गण्या sss...' मी लगेच पळतच आत गेलो. सकाळपासून मी इतका 'पकलो' होतो की, मला आईच्या त्या एका हाकेनेही हायसं वाटलं. आई म्हणाली, 'अरे, काल नानांनी आणलेल्या सामानात धुण्याचा साबण विसरला वाटतं. जरा जाऊन घेऊन येतोस का? आणि हो, अजून थोडं किरकोळ सामान आणायचंय, तेही घेऊन ये.'
मला आता बाहेर पळायला आयती संधी मिळत होती, पण अडचण अशी होती की, मला वाण्याचं दुकान नेमकं कुठे आहे, तेच माहिती नव्हतं. तितक्यात बाहेरून, पप्याच्या घरातून एक मंजुळ आवाज आला, 'उठ! ऊठ मेल्या... किती वेळ लोळणार आहेस अजून... ऊठ !!' बहुतेक पप्याच्या आईने साहेबांना 'शिव्यांची भूपाळी' गाऊन उठवलं होतं! हे ऐकून माझ्या अंगात नवचैतन्य संचारलं.
मी आईला लगेच 'हो' म्हणालो आणि विचारलं, 'पप्याला घेऊन जाऊ?' आईने होकार देताच मी सुसाट त्याच्या दारात गेलो. पाहतो तर काय, पप्या अंथरूणावर बसून अंग वाकडं-तिकडं करत मोठ्या जांभया देत होता. त्याचा तो अवतार बघून मला हसूच आलं. मनात विचार आला, 'या' नमुन्याची वाट पाहत होतो का आपण सकाळपासून? याचंच नावाचा जप चालला होता ना मगाशी? खरंच म्हणतात ना... 'अडला हरी, गाढवाचे पाय धरी!'
क्रमशः





0 Comments:
Post a Comment