आम्ही बदलली १३ घरे (भाग ६)
माझ्या ओळखीची एकुलती एक श्रीमंत व्यक्ती म्हणजे माझी लाडकी पुण्याची आत्या. ती अगदी प्रेमळ, मायाळू आणि साधीभोळी. सात भावंडांमध्ये ती सगळ्यात श्रीमंत असली, तरी गर्व आणि अहंकाराचा वाराही तिला कधी लागला नाही. श्रीमंतीचा बडेजाव न करता ती प्रत्येकाशी, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, मनापासून आणि आपुलकीने वागायची. तिच्याकडे गेल्यावर कधीच परकेपण जाणवले नाही; उलट, तिच्या श्रीमंतीपेक्षा तिचे मनच जास्त श्रीमंत, असे मला नेहमी वाटायचे.
आमचे मामा (आत्याचे यजमान) ही तसेच, अगदी कर्तबगार. मी त्यांच्याकडून खूप वेळा त्यांच्या लहानपणीचे किस्से ऐकले होते. त्यांनी आणि त्यांच्या भावंडांनी कसे हलाखीत दिवस काढले, काबाडकष्ट करून प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात कसे यश संपादन केले, हे ऐकायला खूपच मजा यायची. ते नेहमी मला म्हणायचे, "गण्या, पडेल ते कष्ट कर, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायची तयारी ठेव, यश झक मारत तुझ्याकडे येतं की नाही ते बघ." बहुतेक माझ्या आई-बाबांनाही त्यांनी असेच सांगितले असावे आणि त्यामुळेच आम्ही आमचा 'बारधाना' घेऊन पुण्यात कष्ट करण्यासाठी आलो होतो.
त्यांच्या वंशाला एकच दिवा, दिवा म्हणजे अगदी दिवाच! आमच्या सर्वांच्या आधी या भूतलावर येऊन, सर्वांकडून जबर लाड करून घेतलेला तो 'जावयाचा पोर'. जर तुम्ही मराठीतला "माझा छकुला" चित्रपट पाहिला असेल, तर त्यातला हा 'छकुला'. एकदम खोडकर! तो जेव्हा जेव्हा गावाकडे यायचा, तेव्हा घरचेच काय पण सारं गाव त्याच्या पुढे-पुढे करायचं. कोणी दूध आणून देतंय, कुणी कैऱ्या, कुणी चिंचा तर कुणी पेरू. तो घरी आला की आज्जी आणि सर्व माम्या-मावश्या स्वयंपाकघरात पक्वान्न बनवण्यात स्वतःला वाहून घ्यायच्या. 'मामा लोक' म्हणजे माझे वडील आणि काका, यांच्या मागे तर एकच काम - त्याच्यासाठी बंब पेटवून पाणी तापव, हुरडा भाज, त्याला सायकलवर गावभर फिरव, नाहीतर त्याच्यासाठी खास बैलगाडी जुंपून त्याला चक्कर मारून आण. हुशsss... एवढं सगळं पाहून माझा आणि माझ्या चुलत भावंडांचा अगदी जळफळाट व्हायचा.
पण आम्ही पुण्यात आल्यानंतर माझा पहिला झालेला जीवलग मित्र तोच, आमचा "दिग्गु दादा". आमच्यात फक्त एका वर्षाचंच अंतर, म्हणून आमचं जमायला काहीच वेळ लागला नाही. त्यानेच मला पुण्याशी पहिली ओळख करून दिली. पुण्यातील विचित्र नावाच्या जागा त्यानेच मला दाखवल्या आणि त्यांच्या इतिहासाबद्दल लांबच लांब 'फेका' ही मारल्या.
दरवर्षी शाळा सुरू झाली की, शाळेला लागणाऱ्या नव्याकोऱ्या वह्या आत्याकडून यायच्या. सोबत दिग्गु दादाची वापरलेली, थोडीफार फाटलेली पुस्तके, सर्व 'नवनीत मार्गदर्शक' (गाईड्स) आणि अगदी थोड्याशा लिहून अर्ध्याच सोडवलेल्या व्यवसायमाला मला मिळायच्या. माझ्या वर्गातील इतर मुलांपेक्षा माझ्याकडे जरा जास्तच साहित्य असायचं. आमची शाळा 'मनपा'ची असल्यामुळे शाळा सुरू झाल्यापासून काहीच महिन्यात नवीन पुस्तके, दफ्तर, बूट आणि दोन गणवेश मिळायचे, यातच आमचं वर्ष सरून जायचं. जोपर्यंत दिग्गु दादाचं आणि माझं माप सारखं होतं, तोपर्यंत त्याचे वापरलेले शर्ट आणि चड्ड्या मला मिळायच्या. पण तो जेव्हा अचानक "मोठ्ठा" झाला, तेव्हा आईचं काम वाढलं होतं; त्याची येणारी प्रत्येक पँट तिला 'ऑल्टर' करून द्यावी लागायची. असा हा आमचा प्रवास निरंतर चालूच होता.
खरं सांगायचं तर, मला त्याचे कपडे घालून भारी वाटायचं, कारण अख्ख्या गल्लीत मी उठून दिसायचो. ते कपडे अंगावर असले की आपण कोणीतरी 'हिरो' आहोत, असं वाटायचं आणि मग मी गल्लीभर 'शायनिंग' मारत फिरायचो.
मी कधीच आई-बाबांकडे "मला जुने कपडे नको, नवीन घ्या" अशी तक्रार केली नाही. कारण, एकदा त्यांनी नवीन कपडे घेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या नवीन कपड्यांना दिग्गु दादाच्या जुन्या कपड्यांची सर नव्हती!
क्रमशः
- प्रस्मित






0 Comments:
Post a Comment