आम्ही बदलली १३ घरे (भाग ३)
"नळकांड"
आणि तो दिवस उजाडला...
मी तेव्हा जेमतेम सात-आठ वर्षांचा असेन. घरात आई आजारी होती आणि वडील कामावर गेलेले; त्यादिवशी पाणी भरण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्या त्या चिमुकल्या खांद्यावर येऊन पडली होती. आधीच एक दिवस पाणी आलं नव्हतं, त्यामुळे घरात पाण्याची बोंब!
पाणी साठवण्यासाठी आमच्याकडे असलेली सगळी भांडी कोरडी ठणठणीत पडली होती. तसंही १० बाय १० च्या त्या खोलीत पाणी साठवण्यासारखी भांडी तरी किती असणार म्हणा? मोरीतली (बाथरूममधली) एक स्टीलची बादली, जिची जागा अंघोळीसाठी ठरलेली असायची; दुसरी एक मोठी प्लास्टिकची बादली, जी नेहमी मोरीच्या भिंतीवर ठेवलेली असायची आणि तिच्या शेजारी तिचा सखा, तिच्याच मापाचा पिंप असायचा... आणि आणखी म्हणजे... आईने जीवापाड जपलेली ती तांब्या-पितळेची 'घागर'! तिला तिच्या मामांनी लग्नात दिली होती म्हणे, त्यामुळे त्या घागरीला हात लावतानाही मला धाक वाटायचा. पण आज पर्याय नव्हता.
ती घागर आणि बादल्या घेऊन मी नळावर पोहोचलो, तर तिथे जत्राच भरलेली! नळावर प्रचंड गर्दी. प्रत्येकजण 'कमीत कमी एक हंडा तरी पाणी मिळावं' या आशेने नंबर लावून ताटकळत उभा होता. त्यात 'दुष्काळात तेरावा महिना' म्हणतात त्याप्रमाणे, आजूबाजूच्या चार नळांपैकी फक्त एकाच नळाला पाण्याची बारीक धार लागली होती. पाण्यासाठी उडालेली ती झुंबड पाहून माझ्या छातीत धस्स झालं.
एक-दोघांनी आपली एक-दोन भांडी भरून घेतली आणि अखेर 'मम्मीचा' (शेजारच्या काकूंचा) नंबर आला. तिच्यानंतर माझा नंबर होता. पाणी भरायला मम्मी काही एकटी आली नव्हती, तर तिची अर्धी पलटणच तिथे हजर होती—तिच्या दोन सुना आणि माहेरी आलेली लेक! मम्मीने पहिला हंडा नळाखाली लावला आणि नळाच्या त्या फूटभर उंच कठड्यावर ती ठाण मांडून बसली. पाणी हळूहळू येत होते. हंडा भरला की, तिची एक सून तो उचलायची आणि त्या जागी मम्मी लगेच दुसरा रिकामा हंडा लावायची. इकडे नळाला लावलेला हंडा भरेपर्यंत, तिच्या त्या चपळ सुना भरलेले हांडे रिकामे करून परत हजर व्हायच्या. अशा त्यांनी साधारण ८-१० चकरा केल्या.
मी मात्र एका कोपऱ्यात तसाच ताटकळत उभा होतो. मला वाटले, कदाचित मम्मीला मी आणि माझी रिकामी भांडी अजून दिसली नसावीत, म्हणून तिने मला पाणी भरू दिले नसावे. माझा लोकांच्या चांगुलपणावर जरा जास्तच विश्वास होता, म्हणून मी तो पडताळून पाहायचे ठरवले. मी तसाच हाताची घडी घालून मम्मीच्या मागे उभा होतो. मी पायानेच हळूच माझी बादली पुढे सरकवली. बादलीचा थोडा 'खडखड' आवाज झाला. मम्मीने माझ्याकडे एका तिरक्या नजरेने पाहिले, पण चेहऱ्यावर काहीच भाव आणले नाहीत. उलट, ती सुनेला म्हणाली, "अगं, येताना तो स्टीलचा मोठा हंडा घेऊन ये..." हे ऐकून मात्र माझ्या पोटात गोळा आला. पाण्याच्या त्या बारीक धारेकडे पाहून वाटत होते की, नळ आता कधीही आपला दम सोडेल आणि आमचे घर आज पाण्यावाचून कोरडेच राहील.
क्रमशः
- प्रस्मित





0 Comments:
Post a Comment