आमचं कुटुंब मूळचं मराठवाड्यातलं, पण वडिलांच्या नोकरीमुळे (आमच्या उदरनिर्वाहासाठी) पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेलं. घरात देशस्थ ब्राह्मणी वातावरण असूनही, आम्हाला लहानपणापासून अस्सल "मराठवाडी" भाषा आणि लहेजा ऐकण्याचं भाग्य लाभलं. पण गंमत अशी की, आमचे ते मराठवाडी शब्द पचवायला पुणेकर तेव्हा तयार नव्हते. त्यामुळे आई-बाबांनी एक अलिखित नियमच केला होता— आमचा मराठवाडी बाणा फक्त घराच्या चार भिंतींत आणि उंबरठा ओलांडला की बाहेर कटाक्षाने 'पुणेरी' सभ्यतेचा मुखवटा! आज तीन दशकांहून अधिक काळ लोटला, तरी आम्ही अजूनही "पुणेरी" दिसण्याचा आणि बोलण्याचा तो केविलवाणा प्रयत्नच करत आहोत.
पण म्हणतात ना, भाषा ही प्रवाही असते, ती एका जागी साचून राहत नाही. काळाचा महिमा बघा, ज्या शब्दांना पुण्यात कधीकाळी गावंढळ समजले जायचे, तेच शब्द आजच्या पिढीने चक्क "कूल" म्हणून स्वीकारलेत. उदाहरण घ्यायचं झालं तर — "गंडवणे".
नव्वदच्या दशकात पुण्यात हा शब्द ऐकला की लोकांच्या भुवया "कपाळात" जायच्या. मोठी चोरी, फसवणूक किंवा एखाद्याला भयानक संकटात लोटणे, अशा गंभीर गुन्ह्यांसाठी पुणेकर हा शब्द वापरायचे. पण आमच्या घरात? आमच्या घरात हा शब्द काही नवीन नव्हता! कुणाकडून ना कुणाकडून, कधी भावंडांकडून, कधी नातेवाईकांकडून कानावर पडायचाच— "काय गंडवतोय का?", "हे गंडलंय बघ", "त्याला गंडा लावला". बाहेरच्या जगासाठी हा शब्द जरी 'जहाल' आणि स्फोटक असला, तरी आमच्यासाठी तो अगदी 'पाळीव', निरुपद्रवी आणि सौम्य होता.
असाच आमच्याकडे 'सौम्य' शब्दांचा एक शब्दकोश होता. "मेल्या", "मुडद्या", "थोबडतोंड्या" या आम्हाला लहानपणी खोड्या केल्यावर आज्जी, आत्या, मावशी आणि आईकडून सुद्धा मिळणाऱ्या उपाध्या होत्या. याशिवाय गावाकडचे असे काही शब्द कानावर पडायचे, ज्यांचा अर्थ गुगललाही सापडणार नाही— वंगाळ, येंगने, खळगूट, मोकार, रिकामचोट, म्हंग, अन् म्हंग... ही यादी न संपणारी आहे.
यातलाच नेहमीचा ऐकिवातला शब्द म्हणजे— "कंड". हो, बरोबर वाचलंत, "कंड".
कोणी हट्टीपणा किंवा रगेलपणा केला की हमखास ऐकायला मिळणारं वाक्य म्हणजे, "थांब!! तुझा चांगलाच कंड जिरवते". एखाद्याला एखाद्या गोष्टीची जरा जास्तच विशेष आवड असेल, तरी त्याला "फार कंड आहे". त्यामुळे माझ्या सात-आठ वर्षांच्या चिमुकल्या मेंदूत एक साधं समीकरण पक्कं झालं होतं: कंड = मस्ती, हट्टीपणा किंवा फार तर फार माज. (या शब्दाचा बाहेरच्या जगात काहीतरी 'प्रौढ' आणि भलताच अर्थ असू शकतो, याची त्या वयात पुसटशी कल्पनाही नव्हती!).
आणि हो, हे कमी की काय म्हणून, वारसाहक्काने मिळालेल्या आणि याच शब्दाशी नातं सांगणाऱ्या एका "गुणापासून" मी त्या दिवसापर्यंत पूर्णपणे अनभिज्ञ होतो...
क्रमशः
- प्रस्मित





0 Comments:
Post a Comment