'कंड' पुराण - अध्याय तिसरा आणि अंतिम.

आम्ही बदलली १३ घरे (भाग ४)

"नळकांड" 


'पाणी जाईल', या एकाच विचाराने जीव कासावीस झाला होता. पाणीच मिळालं नाही तर? अंघोळीला पाणी... धुण्याला पाणी... पाण्याविना दिवस कसा काढायचा? मनात विचारांचं थैमान सुरू होतं. आजूबाजूला कुठून सोय होईल का, याची चाचपणी मी मनातल्या मनात करू लागलो. कोणीतरी सांगितलं होतं की, घरापासून पंधरा मिनिटांवर एक हापसा आहे, तिथून आणता येईल... पण, तो खाजगी मालकीचा! मालकाची हातापाया पडून विनवणी करावी लागते, असं ऐकलं होतं. मी तर ठरवलंच होतं, त्याला भेटल्या-भेटल्या साष्टांग नमस्कार घालून त्याचे पाय धरायचे, पण पाणी मिळवायचंच!

पण, पुढचा प्रश्न 'आ' वासून उभा राहिला... एवढ्या लांबून ती भरलेली घागर आणि बादली उचलून आणणार कोण? आमच्या नळावरूनच मी कसाबसा, टेकवत-टेकवत हे भांडे घेऊन जातो पण, तिथून? अशक्यच! मघाशी वाटलेला दिलासा हवेत फुर्र झाला आणि छातीत पुन्हा धडधड सुरू झाली. शेवटी सगळे पर्याय संपले आणि माझी नजर मम्मीने नळाला लावलेल्या, काठोकाठ भरून वाहणाऱ्या हंड्यावर स्थिरावली.

मी मम्मीला काही बोलणार, इतक्यात मागून कोणीतरी दबक्या पण जरबच्या आवाजात ओरडलं, "पाणी वाया जाऊ देऊ नका, जपून वापरा!"
मी चमकून पाहिलं, तर मम्मी माझ्याकडेच डोळे वटारून पाहत होती! त्या क्षणी मला तिची जी भीती वाटली ना... बापरे! उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर, शेजारच्या गुणा नानीने त्या 'पुतना मावशी'चं जे भयंकर वर्णन केलं होतं, हुबेहूब तशीच मम्मी मला वाटली! नानीचे शब्द जसेच्या तसे कानात घुमू लागले...
ती म्हणाली होती...

"जेव्हा त्या कान्ह्यानं तिचे प्राण ओढले, तेव्हा तिचं खरं रूप बाहेर आलं. अरं, ती बाई नव्हतीच मुळी, साक्षात राक्षसीण! जमिनीवर पडली तेव्हा डोंगरासारखी अवाढव्य! रंग काळाकुट्ट कोळशासारखा आणि तोंड म्हणजे मोठं विवरच! तिचे ते सुळ्यासारखे लांब दात, जणू नांगराचे फाळ! डोळे तर विहिरीसारखे खोल आणि निखाऱ्यासारखे लालभडक... नुसती नजर गेली तरी माणूस जागीच थिजून जावा! केस पिंजलेले, जशी काय वाळलेली झाडंच! तांबूस आणि अस्ताव्यस्त. तिचं शरीर एवढं विक्राळ की, पडताना सहा मैलांवरची झाडं-झुडपं चुरगळून मेली म्हणत्यात! आणि वास? अगं ग ग ग.. मेलेल्या जनावरांसारखा..."

...त्या क्षणी डोळे वटारलेली मम्मी मला अगदी तशीच भासली!

भीतीने माझी गाळण उडाली होती, पण पाण्याची गरज त्या भीतीपेक्षा मोठी होती. आईच्या आठवणीने आणि रिकाम्या बादलीकडे बघून मी धाडस एकवटलं. घशाला कोरड पडलेली असतानाही मी चाचरत म्हणालो, "मम्मी... थोडं... थोडं पाणी घेऊ देता का? एकच बादली..."

पण मम्मी? छे! या दगडाला पाझर फुटेल तर शप्पथ! तिने माझ्याकडे साधं बघितलं सुद्धा नाही. जणू काही मी तिथे अस्तित्वातच नव्हतो. माझे शब्द हवेत धुरासारखे उडून गेले. तिने एका हाताने सुनेला हंडा सरकवायला लावला आणि दुसऱ्या हाताने नळाच्या तोंडाला आपली कळशी लावली. तिचं ते दुर्लक्ष करणं माझ्या जिव्हारी लागलं. मी पुन्हा विनवणी करण्याच्या तयारीत होतो, इतक्यात...

"घुर्रर्र... फुर्रर्र... फस्स्स्स् !!"

नळाने अखेरचा एक मोठा हुंदका दिला आणि पाण्याची ती बारीक धारही लुप्त झाली. नळ कोरडा पडला!
क्षणभर तिथे स्मशानशांतता पसरली. मम्मीने नळाला लावलेली कळशी तशीच रिकामी राहिली होती. पाणी गेलं होतं.

माझ्या पायाखालची जमीन सरकली. डोळ्यासमोर अंधारी आली. आता घरी काय नेऊ? आईला काय सांगू? रिकाम्या बादलीकडे बघताना माझे डोळे भरून आले. रडू अगदी ओठांवर आलं होतं पण, त्याच क्षणी... त्याच क्षणी माझ्या अंगात आमच्या घराण्याचा तो 'गुण' जागा झाला. इतका वेळ दाबून ठेवलेला अपमान, आईच्या आजारपणाची चिंता, त्या बाईचा माज आणि माझी हतबलता... या सगळ्याचं रूपांतर एका जबरदस्त संतापात झालं. अंगाचा थरकाप उडाला, मी थरथरत होतो, पण भीतीने नव्हे, तर रागाने!
माझं भान हरपलं. हातातली ती स्टीलची बादली मी तावातावाने जमिनीवर फेकली...

"धण्ण !!!"

तो आवाज इतका मोठा होता की तिथे उभे असलेले सगळे दचकले. मी थरथरत्या अंगाने आणि रडवेल्या पण संतापलेल्या आवाजात मम्मीकडे बोट दाखवून ओरडलो...

"जिरला ना? जिरला ना आता तुमचा 'कंड'?"

माझा तो अवतार बघून तिथे एकच सन्नाटा पसरला.
मी उच्चारलेले शब्द मम्मीच्या कानात गरम शिसं ओतल्यासारखे शिरले आणि तिची तळपायाची आग मस्तकात गेली! मम्मीचे डोळे मघाशी होते त्यापेक्षा जास्त मोठे आणि लालबुंद झाले. आता ती हातातली रिकामी कळशी फेकून मलाच मारणार की काय, अशी भीती वाटली! ती सुद्धा रागाने थरथरत होती, जणू काही मी तिचा घोर अपमान केला होता.

तिला पाहून मी जरा सावरलो आणि आपण हे काय करून बसलो, ह्याचा विचार करायला लागलो. माझ्यासाठी सिनेमाप्रमाणे अचानक सगळं काही 'स्लो मोशन'मध्ये पुढे चाललं होतं... सगळ्यांचे आवाज, त्यांचे हावभाव, त्यांच्या चेहऱ्यांवरच्या प्रतिक्रिया टिपण्यासाठी मी इकडे-तिकडे पाहू लागलो.
माझी नजर मम्मीच्या सुनांवर पडली. तिच्या सुना, ज्यांना सासूबाईंचा राग माहीत होता, त्या घाबरण्याऐवजी लाजेने पदर थेट नाका-डोळ्यांवर ओढून, मान खाली घालून उभ्या होत्या. मला हे कळलं नव्हतं की मी लाजण्यासारखं असं काय बोललो?

पाणी भरण्यासाठी जमलेल्या त्या बायकांचा घोळका... ज्या मगाशी कुजबुजत होत्या, त्यांच्या तोंडातली मशेरी तशीच थांबली. "अरे बापरे! एवढ्याशा पोरानं मम्मीला सुनावले?" अशा नजरा त्यांनी एकमेकींना दिल्या. काहीजणींना तर आतल्या आत गुदगुल्या झाल्या होत्या, कारण मम्मीला असं कोणीतरी बोलताना त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं होतं.

रांगेत उभे असलेले काका लोक, जे मगाशी कंटाळून 'पाणी कधी मिळतंय' याची वाट बघत होते, ते आता सावरून उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होतं - जणू त्यांना जे जमलं नाही, ते या पोरानं करून दाखवलं होतं!
पण खरी मज्जा तर त्या गल्लीतल्या टवाळ पोरांची झाली होती. जी मुलं कंटाळून कट्ट्यावर बसली होती, त्यांच्यात अचानक चैतन्य संचारलं. एकाने दुसऱ्याला कोपरानं ढोसलं, "ए पद्या... बघ बघ! जोरात राडा झालाय! आज आपली एक तासाची करमणूक फिक्स! आज गण्या ह्या मम्मीचा मार खाणार, नाहीतर घरच्या मम्मीचा तर फिक्स!" काहीजण तर चक्क खिशात हात घालून "आता पुढे काय होणार" याकडे टक लावून उभे होते.
जेव्हा तुम्हाला असं वाटतं की लोक तुमच्याबद्दलच बोलत आहेत, तेव्हा तुमचे कान जरा जास्तच तीक्ष्ण होतात. मम्मीच्या सुनांशेजारीच उभ्या असणाऱ्या राणे आजींच्या कानात फाटे आजी कुजबुजल्याचा आवाजही मला स्पष्ट ऐकू आला, "काय हे, आजच्या नवीन पिढीला मोठ्यांचा आदर नाही, बोलण्याचं काही ताळतंत्र नाही, कसाही बोलतोय? मुलां समोर काही बोलायची सोयच नाही..."
हे ऐकून मला बुजल्यासारखं झालं आणि आपण खूप मोठा घोळ घालून ठेवलाय, याची मला जाणीव झाली.

नळावरचं ते दृश्य एखाद्या सिनेमाच्या क्लायमॅक्ससारखं थिजलं होतं. मम्मी, मी आणि तो माझा प्रश्न...

जिरला ना आता तुमचा 'कंड'?

                                                                                                                                                     - प्रस्मित


Share:

0 Comments:

Post a Comment

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या

Powered by Blogger.

Contact form

Name

Email *

Message *

Most Popular

Popular Posts