आम्ही बदलली १३ घरे (भाग - १६)
आठवणींचा पाऊस (भाग - १)
माझ्या जंगी स्वागतानंतर संपूर्ण चाळीतच काय, पण अर्ध्या गावठाणात माझी ओळख झाली होती. अनेक मुलांशी मैत्री जुळली होती; आमचं एकत्र खेळणं आणि मनसोक्त भटकणं आता नित्याचंच झालं होतं. तरीही, काही वात्रट मुलांची पिन अजून तिथेच अडकलेली! तीच ती जुनी गोष्ट उकरून काढून ते मला चिडवायचे. मग त्यांच्या समाधानासाठी का होईना, मी सुद्धा मोठ्या मनाने चिडल्याचा आव आणायचो.
इकडे, त्या कबुतरंवाल्या 'नवा'शी माझी चांगलीच गट्टी जमली होती. नवा वयाने माझ्यापेक्षा आठ-दहा वर्षांनी मोठा होता, पण आमची मैत्री एकदम पक्की झाली होती. आता तर कबुतरं उडवण्यात आणि ती खाली उतरवून पकडण्यात मी त्याचा उजवा हात बनलो होतो. घरच्यांना माझा हा नाद अजिबात पसंत नव्हता, त्यामुळे त्यांची नजर चुकवून मला लपून-छपून तिथे जावं लागायचं. पण एकदा तिथे पोहोचलो की वेळ कसा जायचा, ते कळायचंच नाही.
कबुतरं आकाशात उडवणं सोपं होतं, पण त्यांना पुन्हा शिस्तीत खाली उतरवणं ही खरी कला होती. आकाशात उंच गेलेली कबुतरं जेव्हा खाली यायला बघायची, तेव्हा नवा विशिष्ट आवाजात त्यांना खुणावायचा. एखादं दुसरं कबुतर वाऱ्याच्या वेगामुळे भरकटलं की माझ्या काळजाची धडधड वाढायची. मग नवाच्या इशाऱ्यावरून मी जमिनीवर धान्याचे दाणे फेकायचो. त्या दाण्यांच्या मोहाने आणि पंखांच्या 'फडफडाटा'सह ती पुन्हा छतावर उतरायची. त्यांच्या त्या लालचुटूक डोळ्यांत आणि मखमली पिसांत मी पूर्णपणे हरवून जायचो.
आणि या सगळ्या धावपळीत, माझ्या त्या टीव्हीवाल्या मावशीकडे जाणे-येणेही अविरत सुरूच होते.
(वारा आणि नानांचा सदरा)
उन्हाळ्याच्या सुट्ट्या तशा संपतच आल्या होत्या, पण उन्हाळा काही संपत नव्हता. त्या दिवशी दुपारी अचानक जोराचा वारा सुटला. पालापाचोळा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि काही लोकांचे कपडेही हवेत उडू लागले होते. आईने पटकन बाहेर येत दोरीवर वाळत टाकलेले कपडे गडबडीने गोळा करायला सुरुवात केली, तेवढ्यात नानांचा सदरा हवेने उडाला आणि मैदानात इकडे-तिकडे भरकटू लागला.
आईने पटकन मला जोरात आवाज दिला, "गण्याss! नानांचा सदरा उडालाय.. पळत जा आणि घेऊन ये पटकन, पुढच्या मैदानात पडलाय बघ.." तिचा तो कापरा आवाज आणि घाई बघून एकवेळ वाटलं, उडून जाणाऱ्या सदऱ्याच्या आत नानाच तर नव्हते ना? कसे असणार, ते तर माझ्या समोर घोरत झोपले होते..
मी अगदी एखाद्या सिनेमातल्या हिरोसारखा मैदानात पळत गेलो आणि वाऱ्याने हेलकावे खाणाऱ्या त्या सदऱ्याला पकडूनच परत आलो. इकडे आकाशात ढगांची नुसती पळापळ सुरू झाली होती. डोंगराला आग लागल्यावर मुले जशी 'पळा पळा' करत सुसाट सुटतात, तसेच ते ढग पळत होते. हे सगळं पाहायला खूप मज्जा येत होती, पण आई "घरात ये" म्हणून मागे लागली होती. तिला भीती वाटत होती की सदऱ्यासारखा तिचा पोरगाही हवेत उडून जाईल!
तेवढ्यात एखाद्या डांबरट मुलासारखे, काळे ढग पांढऱ्या ढगांना बाजूला सारत पुढे आले आणि त्यांनी पूर्ण आकाश भरून टाकलं. अचानक सगळीकडे अंधारून आलं. मी वर तोंड करून हे सगळं पाहतच होतो, तेवढ्यात माझ्या चेहऱ्यावर पाण्याचे एक-दोन टपोरे थेंब पडले. वारा शांत झाला, मातीचा सुगंध नाकात शिरला आणि पहिल्या सरीने सागितलं की आता पावसाचा धुमाकूळ सुरू होणार आणि पुढच्याच क्षणी रप रप पाऊस सुरू झाला.
(पुण्यातील पहिला पाऊस)
मी धावत सुटलो आणि धापा टाकत पडवीत उभा राहिलो. पुण्यात पाऊल ठेवल्यापासूनचा हा आमचा पहिलाच पाऊस! मला वाटलं होतं की, आपल्या पारगावसारखा हा पाऊसही एखादा शिडकावा करेल आणि दहा-पंधरा मिनिटांत वाफ होऊन उडून जाईल. पण इथे तर वेगळंच घडत होतं. अर्धा तास सरला, बघता बघता तास उलटला, तरी पावसाचा जोर ओसरण्याचं नाव घेत नव्हता. मनात विचार आला, इतका पाऊस जर पारगावात झाला असता, तर आज मारुतीच्या पारावरून पाणी ओव्हरफ्लो होऊन थेट गावाच्या वेशीत शिरलं असतं!
आई आणि नाना दोघेही पडवीत येऊन त्या पावसाकडे अवाक होऊन बघत होते. त्यांचे ते भाव बघून वाटलं, जणू काही ते दोघेही दुष्काळातून आल्यासारखे पावसाकडे बघतायत... आणि सत्य तरी दुसरं काय होतं? आम्ही खरंच तर दुष्काळी भागातून आलो होतो!
पावसाच्या त्या सरींमुळे हवेतली गर्मी आता कमी झाली होती आणि जीवाला जरा हायसं वाटायला लागलं होतं. काही 'लिंबूटिंबू' पोरांनी तर कपडे-चड्ड्या काढून पावसात चिंब भिजायला सुरुवात केली होती. त्यांचे आई-वडील देखील दाराच्या चौकटीतून आपल्या पोरांची ही गंमत पाहत होते. त्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मला वाटलं, जणू काही ते बापूजी बुवाला केलेला नवसच फेडतायत - "बापूजी बुवा, मला पोरगा होऊ दे, त्याला प्रत्येक पहिल्या पावसात असच नागव नाचवेन!" या विचाराने मी मनातल्या मनात खो-खो हसत होतो.
दुपारच्या उकाड्यामुळे आलेली मरगळ पावसाने आता धुवून काढली होती. वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता भरून आली होती. तेवढ्यात पांढरा शुभ्र सदरा आणि पायजमा घातलेले, सायकलवरून जाणारे एक काका दिसले.
पावसाच्या धारेत त्यांची ती पाठमोरी आकृती बघून माझे डोळे थबकले आणि त्यांच्यावरच खिळून राहिले. ते मला खूप ओळखीचे वाटत होते. मी डोळे बारीक करून त्यांना निरखून पाहू लागलो... ते हुबेहूब आमच्या 'आप्पाकाकां' सारखे दिसत होते. मला अचानक त्यांची खूप आठवण आली आणि त्यासोबतच आठवली ती, अशाच एका पावसाने आमची केलेली फजिती!





Masta...👌..
ReplyDeleteThank You!!
Delete