आम्ही बदलली १३ घरे (भाग - ११)
भावकी (भाग - ४)
थोडे दिवस असेच गेले; आम्ही अजूनही पाटोद्यातच होतो. परिस्थिती आता हळूहळू रुळावर येत होती. मध्यंतरी सावत्र वाटणारे सगळेच आता पुन्हा 'आपले' वाटू लागले होते.
"खरेतर, समोरची व्यक्ती आपल्याशी कशी वागतेय, हे बऱ्याचदा आपल्याच डोक्यातल्या विचारांवर (किड्यांवर) अवलंबून असते. एकदा का हे किडे वळवळले, की सर्वजण तुमच्या विरोधात उभे आहेत असं वाटू लागतं. पण थोडा वेळ जाऊ दिला, की सगळं काही शांत आणि पूर्ववत होतं."
हातभर बाळ हळूहळू मोठं होऊ लागलं होतं. महिनाभर बाळाच्या विधींचा धडाका चालूच होता - पाचवी, सठी, सुहेर आणि शेवटी बारसं. कालच बाळाचं बारसं झालं आणि नाव 'प्रशांत' ठेवलं. पण आता आम्ही एका नावावर थोडेच थांबणार होतो?
पाळण्यात एक नाव ठेवायचं, नणंदेने नाव ठेवलं म्हणून की काय, आईला पिल्लाचं वेगळं नाव ठेवायचंच असतं. बाबांनाही आपलं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करायचं, म्हणून आणखी एक नाव. आजी-आजोबांचं नाव, काका-काकूंचं नाव, मामा-मामींचं नाव, आणि शेजारीपाजाऱ्यांचं देखील नाव.. हुश्.. आणि आयुष्यभर पूर्ण जग तर नावं ठेवणारच असतं.. बिचाऱ्या पामराला आपल्या एका आयुष्यात कितीतरी नावं घेऊन या जगात वावरावं लागतं.
माझं नाव प्रवीण उर्फ गणेश उर्फ 'गण्या' उर्फ पंडितराव. माझे वडील प्रभाकर उर्फ रमेश उर्फ नाना, आणि माझी आई मीरा उर्फ चंद्रकला उर्फ अक्का. आता घरात नवीन बाळाच्या टोपण नावाचा शोध सुरू झाला... कोणी त्याला 'सोन्या' म्हणायचं, तर कोणी 'मोन्या', 'मंग्या', 'चिक्या'. घरातले सगळे रोज त्याला नवीन नवीन नावं देतच होते.
आम्ही पुण्यात परत आलो. आई आता बऱ्यापैकी पहिल्यासारखी, तरतरीत झाली होती. माझी शाळाही सुरू झाली होती. आई-नाना आता बाळाच्या सेवेत रुजू झाले होते. आमची ती छोटी खोली, जे आमचं घर होतं, आता बाळाची खेळणी, औषधे, बाळंते, लंगोट यांनी भरली होती.
आईला आता दिवसभर बाळंत्याचे आणि लंगोटांचे धुणे करावे लागत होते. घरात जिकडे-तिकडे लंगोटाच्या पताका फडफडत होत्या, जणू काही कोणत्या सरकारी कार्यक्रमाची सजावटच केली आहे! मला तर आता लंगोट आणि हे बाळंते पाहिले तरी मळमळ होऊ लागलं होतं.
आणखी एक वैताग मागे लागला होता, मला आता पूर्वीसारखं स्वच्छंदी वागता येत नव्हतं, आता मी "दादा" झालो होतो ना.. मला माझ्या भावाची काळजी घ्यावी लागणार होती. जेव्हा नाना घरी नसतील तेव्हा माझ्या खेळाला बुट्टीच असायची. आई स्वयंपाक करताना, पाणी भरताना, धुणे-भांडी करताना आणि ती शेजाऱ्यांशी गप्पागोष्टी करताना देखील, बाळाला मलाच सांभाळावं लागायचं. माझ्या आसपासच्या मित्रांनी देखील मला खेळायला बोलवायचं सोडून दिलं होतं.कारण "मला खेळवायला हा, हा सवंगडी जो आला होता.."
आता पावसाळाही सरत आला होता. मी नानांना बऱ्याच वेळा ओढा आणि कागदाच्या पंखांची होडीची आठवण करून दिली, पण आमच्या नानासाहेबांना 'बाळ-काम-बाळ' ह्यातून वेळ मिळेल तर शपथ! सतत "उद्या करू, उद्या नक्की करू!" ह्या आश्वासनात पूर्ण पावसाळा गेला. आई-नाना दोघांनी, बाळाच्या सेवेसाठी स्वतःला वाहून तर घेतलं होतंच, पण मलाही ह्या बालसेवेसाठी जुंपलं होतं.
अचानक एक दिवस गावाहून निरोप आला. कोणत्यातरी जुन्या खटल्याच्या कामासाठी आई-नानांना तातडीने 'आष्टी'ला जावं लागणार होतं. पण प्रश्न होता खर्चाचा! महिनाअखेर असल्यामुळे हात तसा तंगच होता. खूप विचारविनिमय झाला आणि शेवटी आईने एकटीनेच बाळाला घेऊन जायचं ठरलं.
ही बातमी कानावर पडताच माझ्या मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या! आई आणि बाळ नसल्यावर मिळणारं स्वातंत्र्य आणि मोकळीक... बस्स! पुढचे दोन दिवस नुसती धम्माल करायची, मनसोक्त खेळायचं... माझ्या डोक्यात तर फक्त खेळायचेच विचार सुरू झाले आणि त्या रात्री मला या विचारानं झोपही लागली नाही!
नानांनी सकाळीच आई आणि बाळाला एस.टी.त बसवून दिलं आणि माझ्या स्वातंत्र्याला सुरुवात झाली. मी स्वतः एक-एक करून मित्रांच्या घरी जाऊन त्यांना बोलवलं आणि मैदानात खेळायला घेऊन आलो. माझा आनंद आणि उत्साह माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आम्ही 'लिंगोरचा' खेळायला सुरुवात केली.
खेळ अगदी रंगात आला होता, इतक्यात मला अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि काळजात धस्स झालं! वाटलं आई आणि बाळ परत आले की काय? पण तसं काही झालं नव्हतं. कोणातरी दुसऱ्याचं बाळ रडत होतं. मी पुन्हा जोशात खेळायला सुरुवात केली, पण तरीही मन बेचैन होत होतं. खूप प्रयत्न करूनसुद्धा, आता खेळात तशी मजा येत नव्हती. उत्साहात आरडा-ओरड करणारा मी, आता पूर्णपणे शांत झालो होतो.
ती रात्र फार कठीण गेली. मला कधी बाळ रडत असल्याचा भास होत होता, तर कधी खुळखुळा वाजवल्यावर खळखळून हसणारं बाळ समोर दिसत होतं. मी या कुशीवरून त्या कुशीवर लोळत होतो, पण काहीच फरक पडत नव्हता. बाळ सारखं डोळ्यासमोर येत होतं. एक गोष्ट स्पष्ट जाणवत होती - मला आता आईची आठवण येत नव्हती, तर बाळाची, म्हणजेच माझ्या 'सख्या भावाची' आठवण जास्त येत होती. जे दिवस मी मजेत घालवायचे ठरवले होते, ते असे जातील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
शेवटी आई परत आली... माझ्या भावाला घेऊन! त्या दिवशी पहिल्यांदाच मी त्याला माझा 'सख्खा आणि लाडका भाऊ' म्हणून माझ्या कुशीत घेतलं. माझे डोळे पाण्याने डबडबले होते आणि तो माझ्याकडे डोळे विस्फारून पाहत होता..





किती छान..👌👌
ReplyDeleteतुमच्या प्रतिक्रिया मला इथे नक्की कळवा
ReplyDelete