आम्ही बदलली १३ घरे (भाग - १०)
भावकी (भाग - ३)
बाळू मामाने अतिउत्साहात मला सांगितलं,
"गणोबा!! अभिनंदन, तुला भाऊ झाला... मज्जा आहे तुझी ! तुला 'दादा-दादा' म्हणणारा आला बघ ! तुझ्याबरोबर खेळायला हक्काचा सवंगडी आलाय आता..."
तो काय म्हणतोय, ते मी डोळे मोठे करून ऐकतच होतो.
"तुला 'मामा-मामा' म्हणणारा आलाय म्हणून तू एवढा खूश होतोयस... म्हणे... तुला दादा-दादा म्हणणारा आलाय!"
वेडेवाकडे तोंड करून, मी मनातल्या मनातच पुटपुटत होतो..
मामाने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, "काय?"
मी फक्त मान नकारार्थी हलवून त्याला 'काही नाही' म्हणालो. तो आत निघून गेला आणि कसली तरी तयारी करू लागला.
त्याचे शब्द माझ्या कानात घुमत होते... "तुला खेळायला सवंगडी आलाय..." हे आज जन्मलेलं, हातभर बाळ... कधी मोठं व्हायचं अन् कधी माझ्याशी खेळायचं?
ह्याला पकडापकडी, लिंगोरच्या, क्रिकेट खेळता येणार आहे का? मला मामाचाच राग यायला लागला होता... खरं तर मला आई-नानांचा सुद्धा राग येत होता. जो जो माणूस आनंदाने मला शुभेच्छा देत होता, त्या प्रत्येकाचा मला राग येत होता. ते झालेलं बाळ फक्त आई-नानांचं होतं... माझं आत्तापर्यंत तरी कुणीच नव्हतं.
शेवटी उशिरा मामी आणि आज्जी, आईला घेऊन घरी आल्या. आई फारच थकल्यासारखी आणि आजारी वाटत होती. मला तिची खूप काळजी वाटली. मी न राहून लगेच पळत जाऊन आईला बिलगणार, तेवढ्यात...
"अरे, गण्या!! सांभाळून ! धसमुसळेपणा करू नकोस... जरा जपून..!"
असा आजीचा वरच्या पट्टीतील आवाज माझ्या कानी पडला आणि माझ्या काळजात चर्र झालं. खूपच वाईट वाटलं... दुपारपर्यंत लाड करणारी माझी आज्जी, चक्क मला रागावत होती...
मी कसंबसं स्वतःला सावरलं. मला वाटलेलं वाईट माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं; पण माझ्या 'प्रेमळ' आजीने त्याकडे सफाईने दुर्लक्ष केलं.
आजीने आईला आणि मामीला तसंच दारात थांबवलं आणि स्वतः लगबगीने आत आली. आमच्या आजीला कुबड आलेलं, म्हणून ती नेहमी वाकूनच चालायची. तशी ती चपळ, पण आज तिच्यात कुठून तरी अजब बळ आलं होतं. ती एकदम तुरुतुरु स्वयंपाकघरात गेली, एक भाकरीचा तुकडा आणि तांब्याभर पाणी घेऊन आली.
ती तो तुकडा आई, मामी आणि तिच्या "नवीन नातवावर" ओवाळू लागली. आम्ही जेव्हा केव्हा पुण्याहून पाटोद्याला यायचो, तेव्हा आजी नेहमी असा भाकरीचा तुकडा ओवाळून टाकायची. मला का करायची ते माहिती नव्हतं, पण आपलं असं स्वागत होतंय हे पाहून भारी वाटायचं.
पण हे हातभर बाळ पुण्याहून कुठे आलं होतं? हे तर इथेच कुठल्यातरी इस्पितळातून आणलं होतं ! तरीही, मी आई आणि मामीच्या मधे थोडी जागा होती तिथे घुसलो, आणि आजीचा तुकडा माझ्यावरूनही ओवाळला जाईल, अशा बेताने उभा राहिलो.
आई आणि बाळासाठी आजीने आधीच एका खोलीची सोय करून ठेवली होती. सर्व सोपस्कार झाले आणि सगळे त्या खोलीत आले. घरातले सर्वजण मामीच्या हातातील, दुपट्यात गुंडाळलेल्या त्या हातभर बाळाकडेच पाहत होते आणि त्याचे कौतुक करत होते. कोणी त्याच्याशी बोबडं बोलतंय, तर कोणी त्याला उचलून कडेवर घेतंय...
मीही, उगाच वेगळ पडायला नको, म्हणून न राहून म्हणालो, "मलापण घ्यायचंय बाळाला कडेवर !"
त्यावर आमचा 'अतिशहाणा' बाळू मामा लगेच म्हणाला, "अरे, बाळ खूप लहान आहे, तुला नाही जमणार घ्यायला!"
"तुला जमणार नाही..."
हे ऐकल्याबरोबर मी तावातावाने म्हणालो,
"मला जमणार नाही? अरे मला ९३% मार्क पडले आहेत... आणि मला जमणार नाही? तुला पडले होते का कधी? तरी तुला जमलंय ना..."
असंच काहीतरी पुटपुटत, रागाने मी तिथून निघून गेलो.
खूप रात्र झाली होती आणि मला झोप येऊ लागली होती. मी आईच्या त्या खोलीत गेलो, तिथे अजूनही आज्जी आणि मामी होत्या. आईसाठी एक कॉट टाकलेली होती. माझा 'प्लॅन' ह्या कॉटवर आईसोबत झोपायचा होता. मी कॉटवर बसलो, तर कॉट गरम लागत होती. मी हळूच खाली वाकून पाहिलं, तर एका घमेल्यात विस्तव ठेवला होता. पारगावची 'बाळंतिणीची खोली' मी कित्येकदा पाहिलीये, त्यामुळे हे सगळं माझ्यासाठी नवीन नव्हतं. मी तसाच कॉटवर आईच्या शेजारी अंग टाकलं.
तेवढ्यात मामी मला म्हणाली, "अहो, गणेश..."
हो, बरोबर वाचलं तुम्ही! "अहो, गणेशच!" आमच्याकडे नणंदेच्या मुलांना "अहो-जाहो" करायची रीत होती.
मामी पुढे म्हणाली, "तुम्हाला इथे नाही झोपता येणार. तुम्ही आज भैय्या आणि पिंकीसोबत त्यांच्या खोलीत झोपा." (भैया आणि पिंकी माझ्या मोठ्या मामाची मुलं).
हे ऐकून तर माझी गाळणच उडाली. काय? आईला सोडून झोपायचं? या विचारानेच मला भीती वाटायला लागली. आजवरच्या आयुष्यात मी आईला सोडून कधीच झोपलो नव्हतो. आज चक्क आईला सोडून झोपायचं? आज माझ्यासोबत खूप साऱ्या नवीन गोष्टी पहिल्यांदाच घडत होत्या. मला नक्की माहिती होतं की आईला सोडून मला झोप येणारच नाही.
मी हट्टाने मामीला म्हणालो, "नाही, मी इथेच झोपणार..." आणि भिंतीकडे तोंड करून पडून राहिलो.
मला वाटलं, आई माझी बाजू घेईल आणि मामीला समजावून सांगेल. पण झालं उलटंच ! तिने मलाच समजावून सांगायला सुरुवात केली... कुठे तरी आत, काहीतरी 'खळ्ळ' झालं होतं... तो माझ्या बालमनाचा, विश्वासाचा तुकडा पडल्याचा आवाज होता.
आई काय म्हणतेय, तिकडे माझं लक्षच नव्हतं... मी गहन विचारात हरवून गेलो होतो. मामीने मला कधी भैय्या-पिंकीच्या खोलीत आणून सोडलं, हे मला कळलंच नाही.
रात्रभर मी या कुशीवरून त्या कुशीवर वळत होतो... विचार थांबत नव्हते. मी उशीत तोंड खुपसून मोठ मोठ्यानं "आई आई" ओरडत रडत होतो. खूप बळेबळे झोपायचा प्रयत्न केला, तरी घड्याळाच्या काट्याची 'टिक-टिक', मला झोपू देत नव्हती.
जे काही आज माझ्यासोबत होत होतं, त्याला जबाबदार फक्त ते, पहिल्यांदाच घरात आलेलं, 'हातभर बाळ' होतं.
कालपर्यंत माझे लाडके, माझ्या जवळचे असणारे सगळेजण... मला आता सावत्र वाटू लागले होते.





0 Comments:
Post a Comment