आम्ही बदलली १३ घरे (भाग - ८)
भावकी भाग - १
गावाकडे असताना आम्ही तीन चुलत भावंडे एकत्र वाढलो - मी आणि माझ्या काकांची दोन मुलं, दिनेश उर्फ दिनू आणि दीपाली उर्फ बायडी. घरामध्ये मी सर्वात मोठा, त्यानंतर दिनू आणि मग काही वर्षांनी झालेली आमच्या पिढीतली पहिली मुलगी म्हणजे बायडी. दिनू माझ्यापेक्षा सहा महिन्यांनी लहान, पण मला कळू लागल्यापासून तो माझ्यासोबतच असायचा. आमची "गणू-दिनू" ही जोडी घरच्यांपुरतीच, पण गावभर मात्र आम्ही 'बामनाचे गण्या-दिन्या' म्हणूनच प्रसिद्ध होतो.
लहानपणापासूनच मी प्रचंड हट्टी. एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच ! याच्या अगदी उलट दुसऱ्या बाजूला दिनू - एकदम शांत, अतिशय शांत. त्याच्या या शांत स्वभावामुळे मला किती वेळा मार खावा लागला आहे, हे अंकात मोजणे अवघडच. गंमत म्हणजे, मी हट्ट करतोय म्हणून कमी, पण 'हा कसा शांत राहतो, काही मागत नाही' (आणि तू मात्र असा), या तुलनेमुळेच मी जास्त मार खायचो.
मला आठवतंय, एकदा दारात "बुड्डी के बाल" वाला आला होता. हे फेरीवाले सीझननुसार वेगवेगळ्या गोष्टी विकायला यायचे. त्या फेरीवाल्यालाही बहुतेक चांगलेच माहिती असावे की या घरात मी राहतो. 'इथे घंटी वाजवत बसलो की हा पोरगा येणार आणि आपले "बुड्डी के बाल" घेणारच', असा त्याचा अंदाज असावा. त्याच्या सुदैवाने आणि माझ्या दुर्दैवाने, मी तो घंटीचा आवाज ऐकला. ओसरीवर खेळत असलेला मी, लगेच पळत पळत दाराच्या चौकटीजवळ आलो आणि नक्की काय विकायला आले आहे, ते पाहू लागलो. काय आले आहे हे अजून नीट कळलेही नव्हते, पण मला ते हवे होते, हे मात्र नक्की!
लगेच मी घरभर आईला शोधायला सुरुवात केली. तेवढ्यात दिनूही दारात आला आणि बाहेर ओट्यावर येऊन, त्या घंटी वाजवणाऱ्या माणसाकडे नुसता बघत बसला. त्याला बहुतेक त्या घंटीचा आवाज आवडला असावा. इकडे माझा जीव उतावीळ झाला होता. मला पक्के ठाऊक होते की, हा जे काही विकतोय, ते गावच्या दुकानात मिळणारे नव्हते. हा फेरीवाला जाण्याआधी मला ते घ्यावेच लागणार होते, म्हणून माझी घाई चालली होती. पूर्ण घरभर "आई! आई!" करत, मी तिला शोधत होतो.
शेवटी आई सापडली. ती नुकतीच नदीवरून धुणे धुवून आली होती आणि बादलीत पिळून, वळकट्या झालेले कपडे झटकून दोरीवर वाळत घालत होती. तिने गमछा झटकला आणि थंडगार पाण्याचे शिंतोडे माझ्या अंगावर उडाले. मी अगदी थोडासा शहारलो, पण माझे ध्येय वेगळेच होते - आईकडून "चार आणे" घ्यायचे आणि जे काही त्या घंटीवाल्याकडे आहे, ते विकत घ्यायचे.
"आई ग! चार आणे दे ना," मी मागणी केली.
आईने आजोबांचा शर्ट झटकत सरळ "नाही" म्हणून सांगितले. तिने ना माझ्याकडे पाहिले, ना "कशाला हवेत?" म्हणून विचारले. मी परत एकदा प्रयत्न केला, "आई... दे ना ग!"
आता मात्र तिचे लक्ष वेधण्यात मी यशस्वी झालो होतो. तिने माझ्याकडे पाहिले आणि कपाळावर आठ्या पाडून, डोळे मोठे करून ती ओरडलीच..
"अरे! नाही म्हटलं ना एकदा.. पैसे काय झाडाला लागतात का?"
आणि पुढे ती भरपूर बडबड करू लागली. अगदी दोन सेकंदात तिने तिचं माहेर, तिचं लग्न, माझे वडील, त्यांचे वडील, तिचे वडील, दोन्ही आज्ज्या - सगळ्यांबद्दल काय काय बोलली ते मला काही कळलं नाही आणि मला कळून चुकलं की आपलं टायमिंग गंडलय. तरीसुद्धा ती काय म्हणतेय ते समजून घेण्यात तिळमात्रही रस नव्हता. पण माझं नावसुद्धा 'गण्या' होतं, उगाच मला पूर्ण गाव ओळखत नव्हतं ! मी तिथेच त्या सारवलेल्या अंगणात अंग टाकून लोळण घेतली... आणि भोकाड पसरलं.
हे बघताच आई जी चिडली, तिने मग तिच्या वडिलांपासून ते माझ्या वडिलांपर्यंत, ज्यांचा-ज्यांचा राग आला होता, तो माझ्यावर काढायला सुरुवात केली. तेव्हा परत थोडं वाटलं की, जरा आईचा मूड पाहून विचारायला पाहिजे होतं, पण आता वेळ निघून गेली होती. आधी अंगणात मार खाल्ला, मग तिने मला स्वयंपाकघरात आणून मारलं. मी मोठमोठ्याने ओरडत होतो.. आजीला बोलावत होतो.. मला वाटलं हिच्या सासूबाईच मला वाचवू शकतात आणि झालं पण तसंच.
आजी आली... आईला ती बरंच काही बोलली.. काय बोलली ते माझ्या डोक्यावरून गेलं, पण मला फटके बसणे बंद झाले होते. मी लगेच डोळे पुसत आणि मनगटानेच नाक पुसत आजीला बिलगलो. आजीने विचारलं, "काय झालं? काय पाहिजे तुला? शांत हो, काही नाही.. आपण आईचं घर उन्हात बांधू". आजीचं हे नेहमीचंच.. मी आता चार वर्षांचा झालो होतो, हे सगळं आता मला समजत होतं.
पण मग आजीच्या हाताला धरून मी तिला दारात घेऊन गेलो.. तो "बुड्डी के बाल वाला" तिथेच अगदी निर्लज्जपणे घंटी वाजवत उभा होता. आजीच्या लक्षात आलं, तिने अजूनही बाहेर ओट्यावर उभ्या असलेल्या दिनूला बोलावलं आणि तिच्या बटव्यातून चार-चार आण्याची दोन नाणी काढून माझ्या आणि दिनूच्या हातावर ठेवली.
आम्ही आनंदाने पळत पळत जाऊन "बुड्डी के बाल" घेऊन ओट्यावरच खात बसलो. पण सासूबाई त्या सासूबाईच ! आजी आईला जाऊन म्हणाली,
"बघ ते सुधाचं पोरगं (म्हणजे दिनू), कसं शांत आहे! करतंय का कसला हट्ट? आणि हे तुझं पोरगं !"
बापरे ! आई भयानक चिडली. आजीचं बोलणं पूर्ण होतंय ना होतंय तोच, आई तावातावात ओट्याजवळ आली आणि मला तसंच ओट्यावरून उचलून घरात घेऊन गेली.. आता पुन्हा..! "सासूबाईंचा" राग ! तिने जे काही मला कुटलं.. या वेळेस वडील, आजोबा, आजी, काका, काकू सगळेच मला वाचवायला धावले..
पण यांच्या ह्या माहेरच्या साडी मुळे माझे हातातोंडाशी 'बुड्ढी के बाल' मात्र "जळाले" होते.





0 Comments:
Post a Comment