आम्ही बदलली १३ घरे (भाग - ७)
आम्हाला पुण्यात येऊन आता मोजून दीड-दोन वर्षे झाली होती. जसं चाललं होतं, त्यात आम्ही समाधानी होतो. आत्या आणि दिग्गु दादाच्या आशीर्वादाने, माझं शिक्षण जोरदार चालू होतं. आता आम्ही आमचं दुसरं घर बदलून, तिसऱ्या भाड्याच्या घरात राहायला गेलो होतो. घरे बदलत होती, पण माणसं आणि माझी मित्रमंडळी मात्र तशीच होती; उलट आमचा गोतावळा वाढत चालला होता. त्यावेळी माझी सगळ्यांशीच मैत्री व्हायची - भाजीवाला, पेरूवाला, गोळ्यावाला, दुकानदार, केळीवाला, मटकीवाली... अगदी सगळ्यांशीच!
जेवढ्या पटापट माझे मित्र बनत होते, तेवढ्या वेगाने आई-वडिलांची ओळख मात्र वाढत नव्हती. दर महिन्याच्या अखेरीस पैशांची अशी काही कडकी असायची की, दुसऱ्याकडे हात पसरण्याशिवाय पर्याय नसायचा.
त्या दिवशी आईचा उपास होता. नाना कामावर गेले होते; घरी मी आणि आई दोघेच होतो. आईला उपास असला की साबुदाण्याची खिचडी मिळेल, या आशेवर मी वाट पाहत बसायचो पण, आज घरात काहीच हालचाल नव्हती — ना साबुदाणा भिजवलेला, ना भगरीची तयारी.
शेवटी मी आईला विचारलं,“का गं, आज खिचडी नाही का करणार?”
आईने शांतपणे उत्तर दिलं, “नाही.”
“मग भगर करणार आहेस होय?” मी आशेने विचारलं.
पण उत्तर पुन्हा “नाही” असंच आलं.
खूप खोदून विचारल्यावर समजलं की घरात ना साबुदाणा, ना शेंगदाणे, ना भगर — काहीच नव्हत. शेजाऱ्यांकडे उसने मागायचा विचार डोक्यात आला, पण, या चाळीत नवीन असल्यामुळे शेजाऱ्यांशी तितकीशी ओळख अजून झाली नव्हती. माझा खिचडी-भगर खाण्याचा प्लॅन डोळ्यादेखत फसत होता.
“आई, मी जरा खेळून येतो,” मी म्हटलं आणि तडक बाहेर पडलो. जवळच्या मारवाड्याच्या दुकानात शिरलो. थेट काही विचारायची हिंमत नव्हती; म्हणून मी वेळ काढण्यासाठी त्याला नाहक प्रश्न विचारत बसलो — “हे काय आहे? ते काय आहे? हे कितीला दिलं?” बहुतेक, त्याच्या लक्षात आलं असावं की मला काहीतरी बोलायाचं आहे. शेवटी, मी संधी हेरून विचारलंच,
“काका, आम्ही या भागात नवीन आलो आहोत. उधारीवर किराणा देणारे दुकान शोधतोय. तुम्ही उधार द्याल का?”
तो थोडा गोंधळला आणि म्हणाला, “तुझे आई-वडील कुठे आहेत? त्यांना पाठव, बोलेल मी त्यांच्याशी.” आणि विषय संपवून तो आत जायला वळला.
मग मात्र न राहवून मी त्याला खरी परिस्थिती सांगितली. देवास ठाऊक त्याच्या मनात काय आलं,पण त्याने लगेच भगर आणि शेंगदाण्याच्या पुड्या बांधायला घेतल्या. माझ्या चेहऱ्यावर आशेचे हसू उमटले आणि वाटलं देवच पावला. त्या बांधलेल्या पुड्या माझ्या हातात देत तो हसून म्हणाला, "घे, झाली बघ तुमची उधारी सुरू!"
त्या क्षणी मला कळलं, बोलणं किती गरजेचं आहे. आपल्याकडे म्हणतात ना, "बोलणाऱ्याची माती विकली जाते, पण न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही". जर मी त्यादिवशी बोललो नसतो, तर आईला मात्र कडकडीत उपास घडला असता. म्हणून ठरवलं — अडचण आली की शांत बसायचं नाही; बोलून, धडपड करून, हार न मानता ती अडचण दूर करायची.
या प्रसंगाने माझा आत्मविश्वास काहीच्या काही वाढला होता. त्यानंतर उधारीसाठी नवीन किराणा दुकान शोधण्याची जबाबदारी माझीच असायची. माझ्या या बडबडेपणामुळेच पुढे आई-नाना 'गण्याची आई' आणि 'गण्याचे वडील' म्हणून फेमस झाले.
नुकताच माझ्या शाळेचा निकाल लागला होता. हा काही पहिलाच निकाल नव्हता, पण या वेळेस पहिल्यांदाच मी ९०% चा टप्पा ओलांडून थेट ९३.२०% गुण मिळवले होते. सगळीकडून नुसता कौतुकाचा वर्षाव होत होता आणि मी त्या कौतुकाने हुरुळून जात होतो.
खरं तर अडचणींना कसं सामोरं जायचं हे मला जमलं होतं; पण कौतुकाला कसं तोंड द्यायचं—ते कधीच सोपं झालं नाही. समोरची व्यक्ती जेव्हा कौतुक करते, तेव्हा मी काय करावं, डोळे कुठे वळवावेत, हात-शरीर कसे ठेवावेत—हे कळतच नाही. आतून मन भरून येतं, आनंद होतो; पण बाहेरून मी गोंधळलेला दिसतो आणि काहीच सुचत नाही. आजही कोणी कौतुक केलं की मी गोंधळून जाऊन काहीतरी अचरट बडबड करून मोकळा होत आणि नंतर स्वतःलाच हसू येतं.
सगळेच न चुकता आई आणि नानांचं कौतुक करत होते.
"बेस्ट केलंत... तुम्ही पुण्यात आलात!",
"तुमचा मुलगा तुमचं नाव काढणार",
"तुमच्या कष्टाचं चीज झालं,"
असे उद्गार ऐकायला मिळत होते, ऐकून त्यांना हायसं वाटत होतं. आई ने तर आकाशवाणीच्या कार्यक्रमात फोन करून, "तुझे सूरज कहू या चंदा..." हे गाण देखील ऐकवायला सांगितलं होत. खुश झाली होती दोघ अगदी. आजी-आजोबांच्या विरोधात जाऊन, आईच्या दूरदृष्टीमुळेच नानांनी पुण्याला येण्याचा निर्णय घेतला होता. या कौतुकानं, 'पुण्याला यायचा निर्णय योग्यच होता', असं आता त्यांना मनापासून वाटायला लागलं होतं.
पण कुणास ठाऊक, नशिबात पुढे काय वाढून ठेवलं होत? अस काही घडलं ज्याचा विचार मी स्वप्नातही केला नव्हता.
क्रमशः
- प्रस्मित






0 Comments:
Post a Comment