आम्ही बदलली १३ घरे (भाग - १५)
"पुना" पुन्हा तोच उध्दार (भाग - ४)
(आजचा दिवस - सध्याची परिस्थिती)
पप्याच्या त्या कानात येऊन बोललेल्या वाक्याने माझी आधीच 'तंतरलेली' अवस्था आता पार 'पाचोळा' झाली होती. मगाचा तो नवीन गाव, नवीन घर आणि नवीन शाळेचा उत्साह आता कुठल्या कुठे पळून गेला होता. समोर जमलेला तो जमाव आणि त्यात फोडला जाणारा आईचा टाहो... हे दृश्य बघून माझ्या तोंडचं पाणी तर पळालंच, पण पप्याने कानात सांगितलेल्या त्या बातमीने, आता इथेच माझी 'चड्डी ओली' होते की काय (शू होते की काय), अशी भीती वाटू लागली. खरंच म्हणतात, संकट आलं की मोठ्या माणसाला देव आठवतो आणि आमच्यासारख्या लहान पोरांना 'शू' लागते!
मी समोर आक्रोश करणाऱ्या आईकडे पाहिलं. आजूबाजूला जमलेली ती गर्दी, जणू काही माझ्याकडेच पाहत आहे, माझ्याकडे बोट करून काहीतरी कुजबुजत आहेत, असा मला भास होऊ लागला. पप्याचे ते शब्द माझ्या कानातून थेट छातीत कधी उतरले आणि तिथे भीतीचा 'ताशा' कधी वाजू लागला, हे मला कळलंच नाही! उरातली ती धडधड आता ताशाच्या 'तडतडी'सारखी जाणवत होती... आणि बघता बघता ही तडतड इतकी वाढली की, तिचं रूपांतर कानात वाजत असलेल्या 'ढोलात' झालं! आधीच घाबरून माझी 'फाटली' असताना, आता या आवाजाने कानही फाटतात की काय असं वाटत होतं... कारण पप्याच्या 'सगळे तुलाच शोधतायत!' या वाक्याने माझ्या डोक्यात विचारांच्या लढीची वातच पेटवली होती...
मी कसाबसा, उसनं अवसान आणून आणि स्वतःला सावरत आईजवळ पोहोचलो. आई अजूनही त्याच 'जोशात' रडत होती. मी हळूच "आई..." अशी हाक मारली. माझा आवाज कानावर पडताच तिने झटकन माझ्याकडे पाहिलं आणि... तिचं रडणं एकदम थांबलं! आजूबाजूला जमलेल्यांच्या कानांनाही आता कुठे हायसं वाटलं असावं; कारण देवास ठाऊक, किती वेळ ते आईच्या त्या 'वरच्या पट्टीतलं' रडणं सहन करत होते! तिने एक क्षण अविश्वासानं माझ्याकडे बघितलं, जणू तिला खरंच वाटेना की मी समोर उभा आहे. खात्री पटताच पुढच्या क्षणी तिने मला जोरात मिठी मारली. तिचा तो घट्ट स्पर्श सांगत होता की ती किती घाबरली होती.
पण हे प्रेम, तो "पल भर का प्यार"... जेमतेम दोनच सेकंद टिकल! तिच्या डोळ्यातलं पाणी अजून गालावर ओघळतच होतं, तोच हाताची दिशा बदलली. मायेच्या मिठीचं रूपांतर सणसणीत धपाट्यात झालं! पाठीवर पडलेल्या त्या धापट्याने मला खात्री पटली, ही 'मदर इंडिया' नाही, तर 'ललिता पवार'च आहे! आणि तिच्याच लकबीत ओरडली "कुठे मेला होतास इतका वेळ? आणि हे काय? सामान आणायला तीन तास लागतात का?"
(फ्लॅशबॅक - काही वेळापूर्वी)
पप्या आणि मी वाण्याकडून सामान घेऊन परतीच्या वाटेवर होतो. त्याने सुचविलेल्या त्या नवीन वाटेवरून, म्हणजेच अरुंद बोळा-बोळातून आम्ही येत होतो. येताना पप्याने मला अखेर ती पवना नदी दाखवलीच. नदीचं ते भलंमोठं पात्र, वळण घेऊन येणारं तिचं ते संथ पाणी आणि उन्हाळ्यातही दुथडी भरून वाहणारी ती नदी पाहून मनाला एकदम गारवा मिळाला. दुपारचे एवढे रणरणते ऊन असले तरी पप्याचा उत्साह काही कमी झाला नव्हता आणि माझे 'गावदर्शन' सुरूच होते.
एका गल्लीतून जात असताना, अचानक एका उघड्या दारातून "धुशूम... धुशूम..." असा सिनेमातील फायटिंगचा आवाज कानावर पडला. मी सहज मान वळवून बघितले आणि माझे पाय तिथेच थबकले. मी आधी त्या घराच्या छताकडे पाहिले, तिथे ना छोटा अँटेना होता, ना मोठा! माझ्या गावरान गणितानुसार, 'अँटेना नाही म्हणजे टीव्ही अशक्य!' पण जरा निरखून पाहिलं तर घरात एक भलामोठा टीव्ही दिसत होता... आणि तोही "रंगीत"!
एखाद्या अश्मयुगीन माणसाला अचानक 'लाईटर' सापडल्यावर त्याला जेवढे आश्चर्य वाटेल, तेवढेच आश्चर्य मला वाटले. मी 'आ' वासून त्या दाराकडे, जागीच खिळून पाहत राहिलो. पप्या आपल्याच तंद्रीत बडबड करत बऱ्याच पुढे निघून गेला होता. जेव्हा त्याला कळलं की आपल गिऱ्हाईक गायब झालाय, तेव्हा तो पळतच मागे आला. त्याने माझा तो 'आ' वासलेला चेहरा पाहिला आणि माझी नजर जिथे अडकली होती, तिकडे पाहिलं.
गावाकडे फक्त 'ब्लॅक अँड व्हाईट' टीव्ही पाहणाऱ्या माझ्या डोळ्यांसाठी तो एक चमत्कारच होता. पडद्यावरचे ते भडक रंग, ती हिरवीगार झाडी आणि बच्चनच्या एकाच बुक्कीत खलनायकाच्या तोंडातून येणारं लालभडक रक्त... सगळं कसं 'खरं' वाटत होतं! बहुदा पप्यासाठी हे नवीन नसावं, त्याला याची सवय असावी; पण मी मात्र हरवून गेलो होतो.
आम्ही दोघे लाजत-काजत दारात जाऊन उभे राहिलो. आत एक काकू होत्या आणि त्यांचा मुलगा (जो बहुतेक जेवणाच्या सुट्टीत आला असावा) जेवण करत होता. काकू त्याला वाढत होत्या. आम्ही ५-१० मिनिटे तसेच उंबरठ्यावर उभे राहून, मान वाकडी करून आतला टीव्ही पाहत होतो. माझ्या पाठीवरची ती सामानाची पिशवी तशीच लटकत होती.
त्यांचा मुलगा जेवण करून उठला आणि कामावर जायला निघाला, तेव्हा काकूंची नजर आमच्यावर पडली. त्या जरा दचकल्याच! त्यांनी विचारलं, "काय रे पोरांनो? काय पाहिजे?"
त्यांचा तो प्रश्न आणि चेहऱ्यावरचे भाव पाहून माझ्या पोटात गोळाच आला. मला वाटलं, आता या आत जातील आणि शिळी भाकरी वगैरे आणून माझ्या सामानाच्या पिशवीत टाकतील! पण पप्याने वेळ मारून नेली. तो समजूतदारपणे म्हणाला, "मावशी, काही नाही... हा माझा मित्र कालच गावाकडून आलाय. तुमच्या घरातला रंगीत टीव्ही बघून तो इथेच अडकला. आम्ही तोच बघत होतो... निघतोच आता आम्ही."
पप्याचं हे शहाणपणाचं बोलणं ऐकून माझा चेहराच पडला. मला वाटलं होतं, तो गोड बोलून आतमध्ये जायची परवानगी मिळवेल, पण हा तर चक्क मैदान सोडून पळून जाण्याच्या तयारीत होता! काकू आता पप्याकडे सोडून माझ्याकडेच बघत होत्या. माझ्या पडलेल्या चेहऱ्यावरून त्यांना बहुतेक माझ्या मनातलं दुःख कळलं असावं. त्या हसून म्हणाल्या, "अरे, मग असं दारात उभं राहून काय बघताय? आत या... आत बसून बघा!"
हे ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला! मला इतका आनंद झाला होता की वाटलं, धावत जाऊन या 'मावशीला' कडकडून मिठीच मारावी. पण मी भावनांना आवर घातला आणि पप्याला विचार करायची संधीही न देता, चटकन आत जाऊन टीव्हीसमोर ठाण मांडलं. नाईलाजाने पप्यालाही माझ्या शेजारी येऊन बसावं लागलं.
"माझ्या" त्या नवीन मावशीच्या मुलाने जाता-जाता आमच्यासाठी दुसरा सिनेमा सुरुवातीपासून लावला आणि तो निघून गेला. मावशीही बैठकीत कॉटवर लोळत सिनेमा पाहू लागल्या, पण पुढच्या १०-१५ मिनिटांतच त्या घोरायला लागल्या. आता आम्ही दोघेच होतो. पप्याने मला एक-दोनदा घरी जायची आठवण करून दिली, पण मी "पाच मिनिटं... फक्त पाच मिनिटं" म्हणत वेळ मारून नेली. शेवटी कंटाळून आमच्या पप्यानेही टप्प्याटप्याने आपला देह जमिनीवर टाकला आणि दोनच मिनिटांत तो गाढ झोपी गेला. आता मी, तो रंगीत टीव्ही आणि अमिताभ बच्चन... आमच्यात कोणताही 'अडसर' उरला नव्हता!
सिनेमा संपल्यावर मी पप्याला हलवून उठवलं, माझी सामानाची पिशवी सावरली आणि 'माझ्या' त्या लाडक्या मावशीला उठवून, त्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. मी आज खूपच खुश होतो. असा 'व्हीआयपी' पाहुणचार आणि फक्त माझ्यासाठी लावलेला तो स्पेशल सिनेमा पाहून मी बहरून गेलो होतो. आता मला हे 'थेरगाव' मनापासून आवडू लागलं होतं.
(दरम्यान घरी...)
इकडे घरी आई आमची आतुरतेने वाट पाहत होती. अर्धा तास उलटून गेला तरी आमचा पत्ता नव्हता, तेव्हा तिचा धीर सुटला. ती धावतच पप्याच्या आईकडे गेली आणि आपली काळजी व्यक्त केली, "अहो, अर्धा तास झाला, पोरं अजून कशी आली नाहीत? काल हे म्हणाले होते की दुकान जवळच आहे, अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर! मग एवढा वेळ कसा काय लागला मुलांना?"
पप्याच्या आईने, माझ्या आईला सावरत समजावून सांगितलं, "अहो, असतील खेळत कुठेतरी! आणि तसंही पप्याला पूर्ण थेरगाव माहिती आहे. रस्ता चुकणार नाहीत ती, येतीलच एवढ्यात." पण माझी आई मला (आणि माझ्या प्रतापंना) चांगलंच ओळखून होती. ती तिथेच त्यांच्या पडवीत बसून, माझ्या 'कर्तुत्वाचा' पाढाच वाचू लागली. गावाकडे असताना मी कसे उद्योग केले होते, हे तिने पप्याच्या आईला सांगायला सुरुवात केली.
गप्पांच्या नादात अजून अर्धा तास निघून गेला, पण आम्ही अजूनही परतलो नव्हतो. आता मात्र पप्याच्या आईच्या मनातही पाल चुकचुकायला लागली. त्यांनी शेजारच्या काही मुलांना सायकलवर वाण्याच्या दुकानात पाठवलं आणि चौकशी करायला सांगितलं. ती मुलं वाराच्या वेगात गेली आणि मोजून ५ मिनिटांत परत आली. त्यांनी जी खबर आणली, ती ऐकून दोघींच्या पायाखालची जमीनच सरकली. "काकू, दुकानदार म्हणाला, पप्या आणि तो नवीन मुलगा कधीच सामान घेऊन दुकानातून निघालेत!"
आता मात्र दोघींचीही घाबरगुंडी उडाली. दुकानदार म्हणतोय ते निघालेत आणि घरी तर पोहोचले नाहीत, मग पोरं गेली कुठे? त्यांनी त्या सायकलस्वार पोरांना आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये फिरून बघायला सांगितलं, पण आमचा काहीच पत्ता लागला नाही.
आता आमच्या मासाहेबांच्या डोक्यात 'नाही नाही' ते विचार यायला सुरुवात झाली. आईला लगेच गावाकडची ती विहीर आठवली आणि इथे जवळच वाहणारी ती पवना नदी आठवली. "पोरगा नदीत तर वाहून नसेल ना गेला?" या विचाराने तिचं काळीज धस्स झालं. इतकंच नाही, तर समोरच्या त्या काळ्या टाकीत आम्ही पडलोय की काय, अशी शंका तिला आली. हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा तिला आठवलं की नदीच्या किनाऱ्याला लागूनच स्मशानभूमी आहे! तिला वाटलं, "स्मशानातल्या भुता-खेतांनी तर नाही ना पोरांना उचलून नेलं?" असले अजब-गजब आणि भयानक विचार करून तिने स्वतःला आणि पप्याच्या आईलाही पूर्णपणे घाबरवून सोडलं.
शेवटी प्रकरण हाताबाहेर जातंय हे पाहून, त्यांनी चाळीतल्या आणि ओळखीच्या पुरुषांना बोलावून घेतलं. त्यांना 'पप्या' माहिती होता, पण त्याच्यासोबत असलेला हा दुसरा 'नमुना' कोण, हे कोणालाच माहिती नव्हतं. आईने सांगितल्याप्रमाणे त्यांनी संशयास्पद जागा धुंडाळायला सुरुवात केली. काहीजण समोरच्या त्या मोठ्या सिंटेक्सच्या काळ्या टाकीत डोकावून पाहिले, काहीजण धावत नदीवर जाऊन आले, तर काहींनी स्मशानभूमीचा परिसरही पालथा घातला.
पण... कसलं काय? आम्ही कुठेच सापडलो नाही! "डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है..." अगदी तसंच, त्या 'डॉन' मधल्या बच्चनसारखे आम्ही पोलिसांना म्हणजेच चाळीतल्या लोकांना चुकवून गायब झालो होतो!
(आजचा दिवस - सध्याची परिस्थिती)
आईचा तो सणसणीत धपाटा... आणि तोही अख्ख्या चाळीसमोर! मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. खरं तर, पाठीत बसलेल्या त्या धपाट्याचं दुःख जेवढं नव्हतं, त्यापेक्षा जास्त पोटात दुखत होतं... कारण मगापासून मला जोरात 'शू' आली होती! पण आता निमूटपणे आईचा मार आणि बोलणी खाण्यावाचून पर्यायच नव्हता.
आजूबाजूला पदर सावरून उभ्या असलेल्या बायका नाकाला पदर लावून कुजबुजत होत्या, "काय खट्याळ कारटं आहे बाई हे!" मी हे सगळं ऐकून, मान खाली घालून गुन्हेगारासारखा उभा होतो. अशा दणकेबाज पद्धतीने, आमची या चाळीशी आणि पर्यायाने पुण्याशी पहिली ओळख झाली.
गावाने मला 'खट्याळ गण्या' म्हणून हिणवलं होतं, आणि आता या नवीन शहराने पहिल्याच दिवशी 'खट्याळ कारटं' म्हणून माझा 'उद्धार' केला होता. स्थळ बदललं, माणसं बदललेली... पण माझा 'उद्धार' मात्र "पुन्हा तोच" झाला!









