"पुना" पुन्हा तोच उध्दार (भाग - ४)

आम्ही बदलली १३ घरे - पुना (भाग १५)

आम्ही बदलली १३ घरे (भाग - १५)

"पुना" पुन्हा तोच उध्दार (भाग - ४)

(आजचा दिवस - सध्याची परिस्थिती)

पप्याच्या त्या कानात येऊन बोललेल्या वाक्याने माझी आधीच 'तंतरलेली' अवस्था आता पार 'पाचोळा' झाली होती. मगाचा तो नवीन गाव, नवीन घर आणि नवीन शाळेचा उत्साह आता कुठल्या कुठे पळून गेला होता. समोर जमलेला तो जमाव आणि त्यात फोडला जाणारा आईचा टाहो... हे दृश्य बघून माझ्या तोंडचं पाणी तर पळालंच, पण पप्याने कानात सांगितलेल्या त्या बातमीने, आता इथेच माझी 'चड्डी ओली' होते की काय (शू होते की काय), अशी भीती वाटू लागली. खरंच म्हणतात, संकट आलं की मोठ्या माणसाला देव आठवतो आणि आमच्यासारख्या लहान पोरांना 'शू' लागते!

मी समोर आक्रोश करणाऱ्या आईकडे पाहिलं. आजूबाजूला जमलेली ती गर्दी, जणू काही माझ्याकडेच पाहत आहे, माझ्याकडे बोट करून काहीतरी कुजबुजत आहेत, असा मला भास होऊ लागला. पप्याचे ते शब्द माझ्या कानातून थेट छातीत कधी उतरले आणि तिथे भीतीचा 'ताशा' कधी वाजू लागला, हे मला कळलंच नाही! उरातली ती धडधड आता ताशाच्या 'तडतडी'सारखी जाणवत होती... आणि बघता बघता ही तडतड इतकी वाढली की, तिचं रूपांतर कानात वाजत असलेल्या 'ढोलात' झालं! आधीच घाबरून माझी 'फाटली' असताना, आता या आवाजाने कानही फाटतात की काय असं वाटत होतं... कारण पप्याच्या 'सगळे तुलाच शोधतायत!' या वाक्याने माझ्या डोक्यात विचारांच्या लढीची वातच पेटवली होती...

मी कसाबसा, उसनं अवसान आणून आणि स्वतःला सावरत आईजवळ पोहोचलो. आई अजूनही त्याच 'जोशात' रडत होती. मी हळूच "आई..." अशी हाक मारली. माझा आवाज कानावर पडताच तिने झटकन माझ्याकडे पाहिलं आणि... तिचं रडणं एकदम थांबलं! आजूबाजूला जमलेल्यांच्या कानांनाही आता कुठे हायसं वाटलं असावं; कारण देवास ठाऊक, किती वेळ ते आईच्या त्या 'वरच्या पट्टीतलं' रडणं सहन करत होते! तिने एक क्षण अविश्वासानं माझ्याकडे बघितलं, जणू तिला खरंच वाटेना की मी समोर उभा आहे. खात्री पटताच पुढच्या क्षणी तिने मला जोरात मिठी मारली. तिचा तो घट्ट स्पर्श सांगत होता की ती किती घाबरली होती.

Mother hugging child

पण हे प्रेम, तो "पल भर का प्यार"... जेमतेम दोनच सेकंद टिकल! तिच्या डोळ्यातलं पाणी अजून गालावर ओघळतच होतं, तोच हाताची दिशा बदलली. मायेच्या मिठीचं रूपांतर सणसणीत धपाट्यात झालं! पाठीवर पडलेल्या त्या धापट्याने मला खात्री पटली, ही 'मदर इंडिया' नाही, तर 'ललिता पवार'च आहे! आणि तिच्याच लकबीत ओरडली "कुठे मेला होतास इतका वेळ? आणि हे काय? सामान आणायला तीन तास लागतात का?"


(फ्लॅशबॅक - काही वेळापूर्वी)

पप्या आणि मी वाण्याकडून सामान घेऊन परतीच्या वाटेवर होतो. त्याने सुचविलेल्या त्या नवीन वाटेवरून, म्हणजेच अरुंद बोळा-बोळातून आम्ही येत होतो. येताना पप्याने मला अखेर ती पवना नदी दाखवलीच. नदीचं ते भलंमोठं पात्र, वळण घेऊन येणारं तिचं ते संथ पाणी आणि उन्हाळ्यातही दुथडी भरून वाहणारी ती नदी पाहून मनाला एकदम गारवा मिळाला. दुपारचे एवढे रणरणते ऊन असले तरी पप्याचा उत्साह काही कमी झाला नव्हता आणि माझे 'गावदर्शन' सुरूच होते.

Kids watching river

एका गल्लीतून जात असताना, अचानक एका उघड्या दारातून "धुशूम... धुशूम..." असा सिनेमातील फायटिंगचा आवाज कानावर पडला. मी सहज मान वळवून बघितले आणि माझे पाय तिथेच थबकले. मी आधी त्या घराच्या छताकडे पाहिले, तिथे ना छोटा अँटेना होता, ना मोठा! माझ्या गावरान गणितानुसार, 'अँटेना नाही म्हणजे टीव्ही अशक्य!' पण जरा निरखून पाहिलं तर घरात एक भलामोठा टीव्ही दिसत होता... आणि तोही "रंगीत"!

Kids watching TV from door

एखाद्या अश्मयुगीन माणसाला अचानक 'लाईटर' सापडल्यावर त्याला जेवढे आश्चर्य वाटेल, तेवढेच आश्चर्य मला वाटले. मी 'आ' वासून त्या दाराकडे, जागीच खिळून पाहत राहिलो. पप्या आपल्याच तंद्रीत बडबड करत बऱ्याच पुढे निघून गेला होता. जेव्हा त्याला कळलं की आपल गिऱ्हाईक गायब झालाय, तेव्हा तो पळतच मागे आला. त्याने माझा तो 'आ' वासलेला चेहरा पाहिला आणि माझी नजर जिथे अडकली होती, तिकडे पाहिलं.

गावाकडे फक्त 'ब्लॅक अँड व्हाईट' टीव्ही पाहणाऱ्या माझ्या डोळ्यांसाठी तो एक चमत्कारच होता. पडद्यावरचे ते भडक रंग, ती हिरवीगार झाडी आणि बच्चनच्या एकाच बुक्कीत खलनायकाच्या तोंडातून येणारं लालभडक रक्त... सगळं कसं 'खरं' वाटत होतं! बहुदा पप्यासाठी हे नवीन नसावं, त्याला याची सवय असावी; पण मी मात्र हरवून गेलो होतो.

आम्ही दोघे लाजत-काजत दारात जाऊन उभे राहिलो. आत एक काकू होत्या आणि त्यांचा मुलगा (जो बहुतेक जेवणाच्या सुट्टीत आला असावा) जेवण करत होता. काकू त्याला वाढत होत्या. आम्ही ५-१० मिनिटे तसेच उंबरठ्यावर उभे राहून, मान वाकडी करून आतला टीव्ही पाहत होतो. माझ्या पाठीवरची ती सामानाची पिशवी तशीच लटकत होती.

Kids watching TV

त्यांचा मुलगा जेवण करून उठला आणि कामावर जायला निघाला, तेव्हा काकूंची नजर आमच्यावर पडली. त्या जरा दचकल्याच! त्यांनी विचारलं, "काय रे पोरांनो? काय पाहिजे?"

त्यांचा तो प्रश्न आणि चेहऱ्यावरचे भाव पाहून माझ्या पोटात गोळाच आला. मला वाटलं, आता या आत जातील आणि शिळी भाकरी वगैरे आणून माझ्या सामानाच्या पिशवीत टाकतील! पण पप्याने वेळ मारून नेली. तो समजूतदारपणे म्हणाला, "मावशी, काही नाही... हा माझा मित्र कालच गावाकडून आलाय. तुमच्या घरातला रंगीत टीव्ही बघून तो इथेच अडकला. आम्ही तोच बघत होतो... निघतोच आता आम्ही."

पप्याचं हे शहाणपणाचं बोलणं ऐकून माझा चेहराच पडला. मला वाटलं होतं, तो गोड बोलून आतमध्ये जायची परवानगी मिळवेल, पण हा तर चक्क मैदान सोडून पळून जाण्याच्या तयारीत होता! काकू आता पप्याकडे सोडून माझ्याकडेच बघत होत्या. माझ्या पडलेल्या चेहऱ्यावरून त्यांना बहुतेक माझ्या मनातलं दुःख कळलं असावं. त्या हसून म्हणाल्या, "अरे, मग असं दारात उभं राहून काय बघताय? आत या... आत बसून बघा!"

हे ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला! मला इतका आनंद झाला होता की वाटलं, धावत जाऊन या 'मावशीला' कडकडून मिठीच मारावी. पण मी भावनांना आवर घातला आणि पप्याला विचार करायची संधीही न देता, चटकन आत जाऊन टीव्हीसमोर ठाण मांडलं. नाईलाजाने पप्यालाही माझ्या शेजारी येऊन बसावं लागलं.

Kids sitting inside watching TV

"माझ्या" त्या नवीन मावशीच्या मुलाने जाता-जाता आमच्यासाठी दुसरा सिनेमा सुरुवातीपासून लावला आणि तो निघून गेला. मावशीही बैठकीत कॉटवर लोळत सिनेमा पाहू लागल्या, पण पुढच्या १०-१५ मिनिटांतच त्या घोरायला लागल्या. आता आम्ही दोघेच होतो. पप्याने मला एक-दोनदा घरी जायची आठवण करून दिली, पण मी "पाच मिनिटं... फक्त पाच मिनिटं" म्हणत वेळ मारून नेली. शेवटी कंटाळून आमच्या पप्यानेही टप्प्याटप्याने आपला देह जमिनीवर टाकला आणि दोनच मिनिटांत तो गाढ झोपी गेला. आता मी, तो रंगीत टीव्ही आणि अमिताभ बच्चन... आमच्यात कोणताही 'अडसर' उरला नव्हता!

सिनेमा संपल्यावर मी पप्याला हलवून उठवलं, माझी सामानाची पिशवी सावरली आणि 'माझ्या' त्या लाडक्या मावशीला उठवून, त्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. मी आज खूपच खुश होतो. असा 'व्हीआयपी' पाहुणचार आणि फक्त माझ्यासाठी लावलेला तो स्पेशल सिनेमा पाहून मी बहरून गेलो होतो. आता मला हे 'थेरगाव' मनापासून आवडू लागलं होतं.


(दरम्यान घरी...)

इकडे घरी आई आमची आतुरतेने वाट पाहत होती. अर्धा तास उलटून गेला तरी आमचा पत्ता नव्हता, तेव्हा तिचा धीर सुटला. ती धावतच पप्याच्या आईकडे गेली आणि आपली काळजी व्यक्त केली, "अहो, अर्धा तास झाला, पोरं अजून कशी आली नाहीत? काल हे म्हणाले होते की दुकान जवळच आहे, अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर! मग एवढा वेळ कसा काय लागला मुलांना?"

पप्याच्या आईने, माझ्या आईला सावरत समजावून सांगितलं, "अहो, असतील खेळत कुठेतरी! आणि तसंही पप्याला पूर्ण थेरगाव माहिती आहे. रस्ता चुकणार नाहीत ती, येतीलच एवढ्यात." पण माझी आई मला (आणि माझ्या प्रतापंना) चांगलंच ओळखून होती. ती तिथेच त्यांच्या पडवीत बसून, माझ्या 'कर्तुत्वाचा' पाढाच वाचू लागली. गावाकडे असताना मी कसे उद्योग केले होते, हे तिने पप्याच्या आईला सांगायला सुरुवात केली.

गप्पांच्या नादात अजून अर्धा तास निघून गेला, पण आम्ही अजूनही परतलो नव्हतो. आता मात्र पप्याच्या आईच्या मनातही पाल चुकचुकायला लागली. त्यांनी शेजारच्या काही मुलांना सायकलवर वाण्याच्या दुकानात पाठवलं आणि चौकशी करायला सांगितलं. ती मुलं वाराच्या वेगात गेली आणि मोजून ५ मिनिटांत परत आली. त्यांनी जी खबर आणली, ती ऐकून दोघींच्या पायाखालची जमीनच सरकली. "काकू, दुकानदार म्हणाला, पप्या आणि तो नवीन मुलगा कधीच सामान घेऊन दुकानातून निघालेत!"

आता मात्र दोघींचीही घाबरगुंडी उडाली. दुकानदार म्हणतोय ते निघालेत आणि घरी तर पोहोचले नाहीत, मग पोरं गेली कुठे? त्यांनी त्या सायकलस्वार पोरांना आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये फिरून बघायला सांगितलं, पण आमचा काहीच पत्ता लागला नाही.

आता आमच्या मासाहेबांच्या डोक्यात 'नाही नाही' ते विचार यायला सुरुवात झाली. आईला लगेच गावाकडची ती विहीर आठवली आणि इथे जवळच वाहणारी ती पवना नदी आठवली. "पोरगा नदीत तर वाहून नसेल ना गेला?" या विचाराने तिचं काळीज धस्स झालं. इतकंच नाही, तर समोरच्या त्या काळ्या टाकीत आम्ही पडलोय की काय, अशी शंका तिला आली. हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा तिला आठवलं की नदीच्या किनाऱ्याला लागूनच स्मशानभूमी आहे! तिला वाटलं, "स्मशानातल्या भुता-खेतांनी तर नाही ना पोरांना उचलून नेलं?" असले अजब-गजब आणि भयानक विचार करून तिने स्वतःला आणि पप्याच्या आईलाही पूर्णपणे घाबरवून सोडलं.

Mother worrying about dangers

शेवटी प्रकरण हाताबाहेर जातंय हे पाहून, त्यांनी चाळीतल्या आणि ओळखीच्या पुरुषांना बोलावून घेतलं. त्यांना 'पप्या' माहिती होता, पण त्याच्यासोबत असलेला हा दुसरा 'नमुना' कोण, हे कोणालाच माहिती नव्हतं. आईने सांगितल्याप्रमाणे त्यांनी संशयास्पद जागा धुंडाळायला सुरुवात केली. काहीजण समोरच्या त्या मोठ्या सिंटेक्सच्या काळ्या टाकीत डोकावून पाहिले, काहीजण धावत नदीवर जाऊन आले, तर काहींनी स्मशानभूमीचा परिसरही पालथा घातला.

पण... कसलं काय? आम्ही कुठेच सापडलो नाही! "डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है..." अगदी तसंच, त्या 'डॉन' मधल्या बच्चनसारखे आम्ही पोलिसांना म्हणजेच चाळीतल्या लोकांना चुकवून गायब झालो होतो!


(आजचा दिवस - सध्याची परिस्थिती)

आईचा तो सणसणीत धपाटा... आणि तोही अख्ख्या चाळीसमोर! मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. खरं तर, पाठीत बसलेल्या त्या धपाट्याचं दुःख जेवढं नव्हतं, त्यापेक्षा जास्त पोटात दुखत होतं... कारण मगापासून मला जोरात 'शू' आली होती! पण आता निमूटपणे आईचा मार आणि बोलणी खाण्यावाचून पर्यायच नव्हता.

आजूबाजूला पदर सावरून उभ्या असलेल्या बायका नाकाला पदर लावून कुजबुजत होत्या, "काय खट्याळ कारटं आहे बाई हे!" मी हे सगळं ऐकून, मान खाली घालून गुन्हेगारासारखा उभा होतो. अशा दणकेबाज पद्धतीने, आमची या चाळीशी आणि पर्यायाने पुण्याशी पहिली ओळख झाली.

गावाने मला 'खट्याळ गण्या' म्हणून हिणवलं होतं, आणि आता या नवीन शहराने पहिल्याच दिवशी 'खट्याळ कारटं' म्हणून माझा 'उद्धार' केला होता. स्थळ बदललं, माणसं बदललेली... पण माझा 'उद्धार' मात्र "पुन्हा तोच" झाला!

- प्रस्मित
Share:

"पुना" पुन्हा तोच उध्दार (भाग - ३)

आम्ही बदलली १३ घरे - पुना (भाग १४)

आम्ही बदलली १३ घरे (भाग - १४)

"पुना" पुन्हा तोच उध्दार (भाग - ३)

(फ्लॅशबॅक - गावाकडचा दिवस)

गावाकडे असताना संपूर्ण गावात मोजून दोन-तीन घरी टीव्ही असायचा आणि तेही सगळे 'ब्लॅक अँड व्हाईट'. सगळीकडे फक्त दूरदर्शन! तसंही दिवसभर टीव्ही बंदच असायचा, कारण घरातली मोठी माणसं शेतावर कामाला गेलेली असायची आणि दिवसा टीव्हीवर कार्यक्रमही नसायचे. पण संध्याकाळी ६:३० वाजता "आमची माती, आमची माणसं" लागायचं. आजही नुसतं नाव घेतलं तरी, त्या कार्यक्रमाचं 'टायटल साँग' कानात वाजू लागतं. त्यानंतर ७:०० वाजता मराठी बातम्या, मग दीड तास मराठी कार्यक्रम, ८:३० ला हिंदी बातम्या आणि नंतर हिंदी कार्यक्रम असा सगळा नित्यक्रम असे.

माझं तर रोजचंच ठरलेलं होतं. संध्याकाळी ६:३० वाजल्यापासून कोणाच्या तरी घरी जाऊन, ओसरीवर जिथे जागा मिळेल तिथे बसून टीव्ही बघायचा. अगदी 'आमची माती आमची माणसं' मधलं काही 'माती' (काहीच) कळलं नाही तरी चालेल, पण मी ते बघायचोच. मला टीव्ही बघायला जाम आवडायचं.

मला आठवतंय, एकदा माझ्या डाव्या डोळ्याच्या जरासं वर खोच पडली होती आणि तीन टाकेही पडले होते. आष्टीवरून डॉक्टरांकडून यायला उशीर झाला. घरातले सगळे त्या धक्क्यातून अजून नीटसे सावरलेही नव्हते. आमची आजी 'नशीब डोळा वाचला' म्हणून देवाचे आभार मानत जप करत बसली होती.

पण इकडे घरी पोहोचल्या-पोहोचल्या मला मात्र काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. माझ्या 'टीव्ही पाहण्याच्या तपस्येत' व्यत्यय आला होता! रोजच्या वेळेत मला टीव्ही पहायला जाता आलं नव्हतं आणि माझ्या या 'टीव्ही-साधनेत' असा खंड पडलेला मला अजिबात सहन होत नव्हता. हे लक्षात येताच मी टीव्ही पहायला जाण्याचा हट्ट धरला. माझ्या या हट्टामुळे, आमच्या आप्पा काकांना माझी दया आली की मीच त्यांना जबरदस्तीने यायला भाग पाडले, कुणास ठाऊक!

पण ते तयार झाले. बाहेर गडद अंधार पडला होता. काका एका हातात बॅटरी आणि दुसऱ्या हाताने मला कडेवर घेऊन घरातून निघाले. गावात लोक लवकर झोपत असल्यामुळे एक-दोन घरी फिरावं लागलं. पण अखेर एका घरी विनवण्या करून आम्ही टीव्ही चालू करवलाच. हिंदीतलं काही कळत नसतानाही, मी त्या बातम्या पाहिल्या आणि तेव्हा कुठे माझा जीव शांत झाला!

Child watching old TV

(फ्लॅशबॅक - आजचा दिवस सकाळ)

पप्या उठला आणि सटासट तयार झाला. त्याचा तयार होण्याचा वेग बघण्यासारखा होता. मी घरातून एक पिशवी घेतली, ती हातात गुंडाळून, चप्पल घालता-घालताच आईला म्हणालो, "आई... येतो ग!"

"सावकाश जा! आणि लवकर परत ये!" आई म्हणाली. मी या परस्परविरोधी वाक्यांचा विचार करतच होतो, तेवढ्यात आईकडून पुढची सूचना आली, "पप्याच्या बरोबरच राहा, त्याला सोडून कुठे जाऊ नको." आता मात्र मला वाटलं, हे जरा जास्तच होतंय आईचं! मी निमूटपणे "हो" म्हणालो आणि पळतच बाहेर आलो. पप्या निघायला तयारच होता.

आम्ही आमच्या पडवीतून बाहेर पडलो तशी पप्याची बडबड सुरू झाली. जाता-जाता त्याने लांबूनच मला माझी होणारी नवीन शाळा दाखवली. ती इमारत खरंच खूप मोठी होती. कुठे गावाकडची आमची ४-५ खोल्यांची शाळा आणि कुठे इथली ही तीन मजली, २०-२५ खोल्यांची भव्य शाळा! इमारतीचा तो शुभ्र रंग पाहून, बहुदा उन्हाळ्याच्या सुट्टीतच नुकतीच रंगरंगोटी केली असावी, असं वाटत होतं. शाळेसमोरच मोठच्या मोठं मैदान दिसत होतं. ते पाहून 'शाळा कधी सुरू होतेय' असं वाटलं. मला शाळेच्या इमारतीला भेट देण्याचा मोह झाला, पण मी त्याला आवर घातला.

Big school building

रस्त्यात त्याने मला अगरबत्तीच्या खोक्यांच्या पुंगळ्या बनवण्याचा एक कारखाना बाहेरूनच दाखवला. एका पत्र्याच्या पडवीत काही बायका लाटण्यासारखं काहीतरी घेऊन, एका पुठ्ठ्यावर डिंक लावून आणि त्यावर कागद चिटकवून ते लाटत होत्या आणि तयार झालेली पुंगळी काढून, वाळविण्यासाठी टाकत होत्या. तिथे अशा पुंगळ्यांचा ढीग लागला होता. त्याने पाळलेली कबुतरं, त्यांची खुराडी मला दाखवली आणि ते 'गुटूर-गु' करणारे कबुतरे पाहून मला नवलच वाटलं. लोक कबुतरं पण पाळतात, हे मला माहितीच नव्हतं.

Women working in agarbatti factory

असंच गावदर्शन करत करत आम्ही पाराजवळच्या वाण्याच्या दुकानात पोहोचलो. त्याच्याकडून आईने सांगितलेलं सगळं सामान घेतलं आणि परतीच्या वाटेला लागलो. पप्याला मला गाव दाखवण्याचा भारी उत्साह होता. तो म्हणाला, "गणेश, आपण आता दुसऱ्या रस्त्याने जाऊयात."

मला तो 'गणेश' म्हणाला हे ऐकून मी जरा ओशाळलोच. कारण, कालच ओळख झालेल्या या मुलाला मी अगदी हक्काने त्याच्या घरच्या नावाने म्हणजेच 'पप्या' म्हणत होतो आणि हा मात्र मला 'गणेश' म्हणत होता! त्याच्या तोंडून 'गणेश' ऐकून मला परकं वाटलं. मी त्याला जवळचा 'दोस्त' मानून 'पप्या' म्हणत होतो आणि हा मात्र माझं असं नाव घेऊन अंतर ठेवून वागत होता. बहुतेक, मला 'जिवलग मित्र' करून घ्यायला हा माझ्याइतका उतावळा नसावा.

मी असा विचारात हरवलेला दिसल्याने त्याने पुन्हा विचारलं, "जायचं का? तेवढाच वेळ लागेल घरी पोहोचायला आणि नदी पण दिसेल.." मी 'हो' म्हणून मान डोलवली. आज मी फक्त "हो", "नाही", म्हणून फक्त मानाचं डोलवत होतो, मी काहीच बोलत नव्हतो; तसा मुळात मी बडबड्या, पण आज पप्याचा दिवस होता.. तोच फक्त बोलत होता!


(आजचा दिवस - आत्ता)

माझ्या मनात नाना आणि त्यांच्या कंपनीबद्दल नको नको ते विचार यायला लागले. कंपनीत काही झालं असेल का? की बसने जाताना काही अघटित घडलं असेल? आम्ही परतीच्या वाटेवर असतानाच रस्त्यावरून एक कंपनीची बस जोरात हॉर्न वाजवत गेली. त्या बसकडे बघून मला एकदम नानांची आठवणही झाली होती. या विचारांनी मला आईला सामोरं जाण्याचं धाडस होत नव्हतं.

मगाचा उत्साह कुठल्या कुठे पळून गेला आणि माझा जीव रडकुंडीला आला. तेवढ्यात मघाशी गायब झालेला पप्या अचानक प्रगटला. त्याचा चेहरा उतरलेला होता. त्याने माझ्या कानात दबक्या आवाजात जे काही सांगितलं, त्यामुळे माझे हातपाय थरथर कापायला लागले. डोकं सुन्न झालं. आता आईला आणि या अनोळखी लोकांना कसं सामोरं जायचं, हेच मला कळत नव्हतं.

क्रमशः

- प्रस्मित
Share:

"पुना" पुन्हा तोच उध्दार (भाग - २)

आम्ही बदलली १३ घरे - पुना (भाग १३)

आम्ही बदलली १३ घरे (भाग - १३)

"पुना" पुन्हा तोच उध्दार (भाग - २)

(आजचा दिवस)

मी आणि पप्या दुकानातून सामान घेऊन परतत होतो. पप्या मला एखाद्या 'वेल ट्रेंड गाईड'सारखा (Well-trained guide) गावाची ओळख करून देत होता. मी ही त्याची बडबड निमूटपणे ऐकत होतो, पण मनात मात्र 'हा कधी बोलायचा थांबतोय' असंच वाटत होतं. मी जरा त्याच्याकडे दुर्लक्ष करून रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या घरांचं निरीक्षण करण्यात मग्न झालो.

Two boys walking on village road

मला थेरगाव हे पारगावपेक्षा फारसं वेगळं वाटत नव्हतं. इथेही लोकांच्या दावणीला गाई-म्हशी होत्या. गावाला लागूनच पवना नदी वाहत होती—अगदी आमच्या 'तलवार' नदीसारखी, फक्त फरक एवढाच की ह्या नदीला बारमाही पाणी होतं. सारवलेल्या भिंती, काही भिंतींवर शेणाच्या थापलेल्या गोवऱ्या आणि फारच तुरळक दुमजली इमारती... सगळंच ओळखीचं वाटत होतं.

फक्त एकच गोष्ट मला फार वेगळी जाणवली, ती म्हणजे टीव्हीचे अँटिने! पारगावात कोणाच्या घरी टीव्ही आहे, हे त्यांच्या माळवदावरच्या उंचच उंच अँटीन्यावरून लांबूनच कळायचं. इथले अँटेने मात्र त्या मानाने फारच बुटके होते आणि बहुतेक त्यांना लावलेल्या काड्याही फार कमी होत्या. आणखी एक गंमत म्हणजे, काहींच्या घरावर ना छोटा अँटेने, ना मोठा; तरीही घरात टीव्ही आणि तोही रंगीत!

अशा गप्पा मारत आम्ही घरापाशी पोहोचलो, तर आजुबाजूला चांगलीच धावपळ उडालेली दिसली. पप्या एकदम उत्साहाने म्हणाला, 'काहीतरी राडा झालाय वाटतं!' आता काहीतरी धमाल बघायला मिळणार आणि पुढचे एक-दोन तास आपली फुकट करमणूक होणार, या आशेने आम्ही गर्दीतून वाट काढत पुढे निघालो.

आता कानावर रडण्याचे आवाज येऊ लागले होते. आम्ही जसजसे जवळ जात होतो, तशी आमची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. शेवटी मला आमच्याच पडवीजवळ बायकांचा घोळका दिसला आणि तो रडण्याचा आवाजही ओळखीचा वाटू लागला.

Women crying on porch

पप्या मला सोडून कधीच गायब झाला होता. मी त्या घोळक्यातून कसबस डोकावून पाहिलं... तर समोर साक्षात आई रडत होती! तिला रडताना पाहून माझे धाबेच दणाणले. आमची नेहमी 'मदर इंडिया'च्या तोऱ्यात वावरणारी आई आज अशी 'निरुपा रॉय'सारखी रडतेय, म्हणजे प्रकरण नक्कीच गंभीर आहे, हे मला कळून चुकलं होतं. माझ्या मनात नाना प्रकारचे विचार येऊ लागले.


(फ्लॅशबॅक - कालचा दिवस)

आम्ही काल दुपारीच सामानाचे दोन ट्रंक घेऊन थेरगावला पोहोचलो. हे गाव पाहून मला हायसं वाटलं; कारण शिवाजीनगरला एस.टी.तून उतरल्यापासून पुण्यातल्या त्या टोलेजंग इमारती बघून बघून मान दुखायला लागली होती.

Busy Pune street scene

गाड्यांनी गजबजलेले रस्ते, तो गोंगाट आणि हातगाड्यांनी व्यापलेले फुटपाथ पाहून, 'आपला इथे काही निभाव लागणार नाही' असंच वाटलं होतं. पण थेरगावला पाऊल टाकताच मनापासून वाटलं... हेच ते आपलं गाव!

काल नानांनी खास सामानाची आवराआवर करण्यासाठी सुट्टी घेतली होती. आई आणि नानांनी सामान लावायची खूप खटपट केली, पण तरीही पसारा काही संपत नव्हता. शेजारीच नानांच्या कंपनीत काम करणारे एक काका आणि त्यांचं कुटुंब राहत होतं. नानांनी त्यांना घरी चहाला बोलावलं आणि आमची ओळख करून दिली. 'पप्या' हा त्यांचाच मुलगा. त्याचं खरं नाव तसं 'अतुल' होतं, पण मला 'पप्या' हेच नाव जास्त आवडलं.

कारण गावाकडे असताना मला एक भारी गोष्ट समजली होती-ती म्हणजे, जिगरी मित्र एकमेकांना कधीच खऱ्या नावाने हाक मारत नाहीत, ते नेहमी टोपणनावच वापरतात! पप्या वयाने माझ्यापेक्षा दीड वर्षाने मोठा होता, पण गंमत म्हणजे येत्या जूनमध्ये शाळा सुरू होईल तेव्हा तो माझ्याच वर्गात, म्हणजे दुसरीलाच असणार होता. मला मात्र त्याच्या रूपात माझा भावी 'जिवलग मित्र' दिसत होता. त्यांनी त्यांच्या दोन्ही लहान मुलींचीही ओळख करून दिली, पण मला त्यांची नावेही जाणून घेण्यात काडीचाही रस नव्हता.


(फ्लॅशबॅक - आजची सकाळ)

आज सकाळी मी उठण्यापूर्वीच नाना 'फर्स्ट शिफ्ट'साठी निघून गेले होते. आईला चाळीची पूर्ण माहिती आणि कोणती गोष्ट कुठे आहे, याची कल्पना त्यांनी दिली होती. काही अडलं नडलंच, तर पप्याच्या आईची मदत घ्यायलाही त्यांनी सांगितलं होतं.

खिडकीतून आलेल्या सूर्यकिरणांनी मला जाग आली. तो प्रकाश पाहून मनात आलं, 'या नवीन घरातला हा पहिला सूर्योदय... जणू तो आयुष्यात एक नवा प्रकाश आणि नवी उमेद घेऊन आलाय.' मी उत्साहाने उठून पडवीत आलो आणि आळस देत बाहेर नजर टाकली.

बापरे! ही सकाळ गावाकडच्या शांत सकाळीपेक्षा किती वेगळी होती! नळावर पाण्यासाठी उडालेली झुंबड, डबे घेऊन कामाला पळणारे लोक आणि टोस्टवाले-खारीवाल्यांचे आवाज... हा सगळा गोंगाट, वातावरणात अगदी एकरूप झाला होता.

मी सकाळचं आवरून पप्याचीच वाट पाहत बसलो होतो. पण तो अजून उठला नव्हता. साहेबांची उन्हाळ्याची सुट्टी चालू होती ना, त्यामुळे सगळं कसं अगदी निवांत होतं! मी दोनदा त्याच्या घराच्या उघड्या दारातून डोकावून पाहिलं, तर आमचे साहेब एकदम पालथे पडून अडवेतेडवे पसरले होते. त्याच्यासाठी हा काही माझ्यासारखा 'आयुष्यातला पहिला सूर्योदय' नव्हता, हे माझ्या एव्हाना लक्षात यायला हवं होतं.

हातात काहीच काम नव्हतं आणि मी पूर्णपणे त्या पप्यावरच अवलंबून होतो, त्यामुळे मला आता भलताच कंटाळा आला होता. आईसुद्धा तिच्या कामात व्यस्त होती. माझा नुसता 'आत-बाहेर' असा खेळ सुरू होता; कधी घरात जाऊन बसायचो, तर कधी लगेच पडवीत येऊन बाहेर बघायचो. पण आता बाहेरची वर्दळ हळूहळू कमी झाली होती. नळही कोरडा पडला होता आणि रस्त्यावर तर आता शुकशुकाट होता. विशेष म्हणजे, सकाळपासून मला पप्याखेरीज माझ्या वयाचं दुसरं एकही पोरगं दिसलं नव्हतं.

मी पुन्हा एकदा पप्याच्या उघड्या दारातून आत डोकावलं... परिस्थिती 'जैसे थे' होती! हा कुंभकर्ण खरोखरच माझ्या संयमाचा अंत पाहत होता. माझी सकाळी वाटलेली ती नवी उत्सुकता दुपार व्हायच्या आतच मावळायला लागली होती.

तेवढ्यात मला आईची हाक ऐकू आली, 'गण्या sss ! ये गण्या sss...' मी लगेच पळतच आत गेलो. सकाळपासून मी इतका 'पकलो' होतो की, मला आईच्या त्या एका हाकेनेही हायसं वाटलं. आई म्हणाली, 'अरे, काल नानांनी आणलेल्या सामानात धुण्याचा साबण विसरला वाटतं. जरा जाऊन घेऊन येतोस का? आणि हो, अजून थोडं किरकोळ सामान आणायचंय, तेही घेऊन ये.'

मला आता बाहेर पळायला आयती संधी मिळत होती, पण अडचण अशी होती की, मला वाण्याचं दुकान नेमकं कुठे आहे, तेच माहिती नव्हतं. तितक्यात बाहेरून, पप्याच्या घरातून एक मंजुळ आवाज आला, 'उठ! ऊठ मेल्या... किती वेळ लोळणार आहेस अजून... ऊठ !!' बहुतेक पप्याच्या आईने साहेबांना 'शिव्यांची भूपाळी' गाऊन उठवलं होतं! हे ऐकून माझ्या अंगात नवचैतन्य संचारलं.

Boy yawning in bed

मी आईला लगेच 'हो' म्हणालो आणि विचारलं, 'पप्याला घेऊन जाऊ?' आईने होकार देताच मी सुसाट त्याच्या दारात गेलो. पाहतो तर काय, पप्या अंथरूणावर बसून अंग वाकडं-तिकडं करत मोठ्या जांभया देत होता. त्याचा तो अवतार बघून मला हसूच आलं. मनात विचार आला, 'या' नमुन्याची वाट पाहत होतो का आपण सकाळपासून? याचंच नावाचा जप चालला होता ना मगाशी? खरंच म्हणतात ना... 'अडला हरी, गाढवाचे पाय धरी!'

क्रमशः

- प्रस्मित
Share:

"पुना" पुन्हा तोच उध्दार (भाग - १)

आम्ही बदलली १३ घरे - पुना (भाग १२)

आम्ही बदलली १३ घरे (भाग - १२)

"पुना" पुन्हा तोच उध्दार (भाग - १)

फ्लॅशबॅक

मी कुठेतरी ऐकलं होत, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द (हट्ट) आणि जिज्ञासू असण फार गरजेचं असतं. मी तसा लहानपणापासून हट्टी तर होतो पण भारी चौकसही! माझ्या बालबुद्धीला ज्या गोष्टी सहजासहजी समजत नसत, नेमकं त्याच गोष्टींचं मला कुतूहल वाटायचं.

आता एखादी गोष्ट समजून घ्यायची म्हटलं, ती हाताळण आलंच! आणि त्या वस्तू हाताळताना छोटे-मोठे घोळ तर होणारच ना! जर माझे आई-वडील आजकालच्या 'जेन्टल पॅरेंटिंग' (Gentle Parenting) वाले असते, तर त्यांनी मला नक्कीच 'चौकस गणऱ्या' म्हटलं असतं. पण कसलं काय? आमच्या घरच्यांनी आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांनी मिळून मला 'खट्याळ गणऱ्या' ही पदवी बहाल केली आणि पुढे याच नावानं माझा 'उद्धार' होऊ लागला!

सुगीचे दिवस होते. थंडीचे दिवस असले, तरी दुपारचा सूर्य चांगलाच तळपत होता. शेतात या वेळी हरभरा टरारून आला होता. आई, नाना, काका, काकू, आजी आणि भाऊ (माझे आजोबा) सगळेच सकाळपासून हरभरा काढण्याच्या कामात मग्न होते. शेतात जागोजागी हरभऱ्याच्या झाडांचे ढीग दिसत होते. मी आणि दिनू आम्हाला जमेल तशी त्यांना मदत करत होतो.

हरभऱ्याची छोटी-छोटी, कोवळी झाडे आम्ही उपटत होतो आणि आजीने दिलेल्या पंच्यात जमा करत होतो. आजीला म्हणे हीच कोवळी झाडे वाळवून वर्षभरासाठी भाजीची सोय करायची होती. आम्ही करत असलेली ही मदत पाहून आणि माझ्या, दिनूच्या वायफळ, बालिश गप्पा ऐकून सगळ्यांच चांगलच मनोरंजन चाललं होत. तर आजी आणि भाऊ आमच्या कष्टाचं कौतुक करून आम्हाला खरोखरच 'हरभऱ्याच्या झाडावर चढवत' होते!

दुपार झाली तशी जेवायची वेळ झाली. सर्वजण हातातली कामे सोडून, आमच्या शेतातल्या त्या डेरेदार चिंचेच्या झाडाखाली जमले. आई आणि काकूने शिदोरी सोडली आणि सगळ्यांना वाढायला घेतले. सकाळपासून हरभऱ्याचे कोवळे घाटे खाल्ल्यामुळे मला आणि दिनूला तशी भूक नव्हतीच. त्यामुळे आम्ही मोठ्यांच्या आजूबाजूलाच खेळत होतो.

चिंचेच्या झाडापासून जेमतेम २०-२५ फुटांवरच आमची विहीर होती. खेळता-खेळता आम्ही नकळत विहिरीजवळ गेलो. ते पाहून आई लगेच ओरडली, "ए पोरांनो, तिकडे नका जाऊ! परत या इकडे." आईचा ओरडा ऐकून आम्ही जिथे होतो, तिथेच थांबलो. पण, जेवण करता-करता सगळेजण गप्पांमध्ये मग्न झाले आहेत, हे पाहताच आम्ही पुन्हा हळूच विहिरीजवळ सटकलो.

इतक्यात दिनू पळत पळत माघारी आला. तो खूप घाबरला होता. तो मोठ्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता, पण भीतीमुळे त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता... तो फक्त "कण्या... कण्या..." (गण्या... गण्या...) एवढेच बोलत होता. आणि तेवढ्यात विहिरीतून 'धुडूम...' असा मोठा आवाज झाला! तो आवाज खरंच काळजाचा ठोका चुकवणारा होता. सगळेच दचकले.

आईने जेवता-जेवता लांब मान करून विहिरीच्या दिशेने पाहिले, पण तिला काठावर मी दिसलो नाही. आईच्या काळजात धस्स झालं, ती जोरात ओरडली, "गण्याssss...!" काठावर मी दिसत नसल्यामुळे, 'गण्या विहिरीतच पडला', या विचाराने आजी आणि सगळेच जीवाच्या आकांताने विहिरीच्या दिशेने धावत सुटले.

Child drawing water from well

विहिरीजवळ येताच, मी त्यांना सुखरूप दिसलो आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. मी काय उद्योग केला होता? तर, 'पोहरा' म्हणून वापरली जाणारी ती मोठी बादली मी विहिरीत टाकली होती. त्याच बदलीचा तो आवाज होता. त्या बादलीला बांधलेल्या दोरीचे दुसरे टोक माझ्या हातात होते आणि मी ती बादली वर ओढण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो.

पण मी माझा सगळा जोर लावून सुद्धा ती जड बादली काही केल्या वर येत नव्हती. चार वर्षाच्या इवल्याशा हातांना हे ओझ थोडीच झेपणार होत. छोट्याशा माझ्या हट्टी मेंदुला हे समजूनच घ्यायचं नव्हतं, मला नानांसारख विहिरीतून पाणी शेंदायचं होत. मला वाटलं, जेवण झाल्यावर सगळ्यांना प्यायला आणि हात धुवायला पाणी तयार ठेवावं.

पण माझ्या या उद्योगानं, मोठ्यांना हात धुवायला पाणी मिळण्याआधीच, आता माझीच 'धुलाई' होण्याची वेळ आली होती!


आजचा दिवस

आम्ही पुण्याला येऊन मोजून दोन तीन दिवस झाले होते. थेरगाव गावठाण येथे एका चाळीत, आमच पहिलं वाहिल भाड्याचं घर होत. अजून शेजारची एक दोन घर सोडली तर आम्हाला कोणीच ओळखत नव्हतं.

पण आज चाळीत नुसती धावपळ उडाली होती. सगळेजण चाळीच्या आजूबाजूला जीवाच्या आकांताने शोधाशोध करत होतो. चाळीतल्या पुरुषांनी शेजारची सिंटेक्सची ती मोठी टाकी, जवळच वाहणारी पवना नदी, अगदी पलीकडची स्मशानभूमी... सगळं काही पालथं घातलं होतं.

Women crying in the chawl

इकडे आमच्या पडवीत, बायकांच्या घोळक्यात आईचा हंबरडा फोडून आक्रोश चालू होता. तिची ती अवस्था बघवत नव्हती. पप्याची आई तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला धीर देत होती. पप्या म्हणजे या गावात आल्यावर झालेला माझा पहिला मित्र!

काकूंच्याही (पप्याची आई) डोळ्यांत पाणी तरळत होतं. त्यांच्या पदराला धरून पप्याच्या दोन लहानग्या बहिणी उभ्या होत्या. त्यांना नेमकं काय झालंय हे कळत नव्हतं, पण वातावरण बघून त्याही रडवेल्या झाल्या होत्या.

घोळक्यातल्या बायका तोंडावर पदर दाबून, पाणावलेल्या डोळ्यांनी एकमेकींशी कुजबुजत होत्या, "बिचारे.. आत्ताच तर राहायला आले होते ना.. असं व्हायला नको होतं.." "पण बाई कोण आहे ही?" "नक्की काय झालंय?" कोणालाच अजून नीटसा उलगडा होत नव्हता...

क्रमशः

- प्रस्मित
Share:

भावकी (भाग - ४)

आम्ही बदलली १३ घरे - भावकी (भाग ४)

आम्ही बदलली १३ घरे (भाग - ११)

भावकी (भाग - ४)

थोडे दिवस असेच गेले; आम्ही अजूनही पाटोद्यातच होतो. परिस्थिती आता हळूहळू रुळावर येत होती. मध्यंतरी सावत्र वाटणारे सगळेच आता पुन्हा 'आपले' वाटू लागले होते.

"खरेतर, समोरची व्यक्ती आपल्याशी कशी वागतेय, हे बऱ्याचदा आपल्याच डोक्यातल्या विचारांवर (किड्यांवर) अवलंबून असते. एकदा का हे किडे वळवळले, की सर्वजण तुमच्या विरोधात उभे आहेत असं वाटू लागतं. पण थोडा वेळ जाऊ दिला, की सगळं काही शांत आणि पूर्ववत होतं."

Family Gathering and Naming Ceremony

हातभर बाळ हळूहळू मोठं होऊ लागलं होतं. महिनाभर बाळाच्या विधींचा धडाका चालूच होता - पाचवी, सठी, सुहेर आणि शेवटी बारसं. कालच बाळाचं बारसं झालं आणि नाव 'प्रशांत' ठेवलं. पण आता आम्ही एका नावावर थोडेच थांबणार होतो?

पाळण्यात एक नाव ठेवायचं, नणंदेने नाव ठेवलं म्हणून की काय, आईला पिल्लाचं वेगळं नाव ठेवायचंच असतं. बाबांनाही आपलं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करायचं, म्हणून आणखी एक नाव. आजी-आजोबांचं नाव, काका-काकूंचं नाव, मामा-मामींचं नाव, आणि शेजारीपाजाऱ्यांचं देखील नाव.. हुश्.. आणि आयुष्यभर पूर्ण जग तर नावं ठेवणारच असतं.. बिचाऱ्या पामराला आपल्या एका आयुष्यात कितीतरी नावं घेऊन या जगात वावरावं लागतं.

माझं नाव प्रवीण उर्फ गणेश उर्फ 'गण्या' उर्फ पंडितराव. माझे वडील प्रभाकर उर्फ रमेश उर्फ नाना, आणि माझी आई मीरा उर्फ चंद्रकला उर्फ अक्का. आता घरात नवीन बाळाच्या टोपण नावाचा शोध सुरू झाला... कोणी त्याला 'सोन्या' म्हणायचं, तर कोणी 'मोन्या', 'मंग्या', 'चिक्या'. घरातले सगळे रोज त्याला नवीन नवीन नावं देतच होते.

आम्ही पुण्यात परत आलो. आई आता बऱ्यापैकी पहिल्यासारखी, तरतरीत झाली होती. माझी शाळाही सुरू झाली होती. आई-नाना आता बाळाच्या सेवेत रुजू झाले होते. आमची ती छोटी खोली, जे आमचं घर होतं, आता बाळाची खेळणी, औषधे, बाळंते, लंगोट यांनी भरली होती.

आईला आता दिवसभर बाळंत्याचे आणि लंगोटांचे धुणे करावे लागत होते. घरात जिकडे-तिकडे लंगोटाच्या पताका फडफडत होत्या, जणू काही कोणत्या सरकारी कार्यक्रमाची सजावटच केली आहे! मला तर आता लंगोट आणि हे बाळंते पाहिले तरी मळमळ होऊ लागलं होतं.

आणखी एक वैताग मागे लागला होता, मला आता पूर्वीसारखं स्वच्छंदी वागता येत नव्हतं, आता मी "दादा" झालो होतो ना.. मला माझ्या भावाची काळजी घ्यावी लागणार होती. जेव्हा नाना घरी नसतील तेव्हा माझ्या खेळाला बुट्टीच असायची. आई स्वयंपाक करताना, पाणी भरताना, धुणे-भांडी करताना आणि ती शेजाऱ्यांशी गप्पागोष्टी करताना देखील, बाळाला मलाच सांभाळावं लागायचं. माझ्या आसपासच्या मित्रांनी देखील मला खेळायला बोलवायचं सोडून दिलं होतं.कारण "मला खेळवायला हा, हा सवंगडी जो आला होता.."

आता पावसाळाही सरत आला होता. मी नानांना बऱ्याच वेळा ओढा आणि कागदाच्या पंखांची होडीची आठवण करून दिली, पण आमच्या नानासाहेबांना 'बाळ-काम-बाळ' ह्यातून वेळ मिळेल तर शपथ! सतत "उद्या करू, उद्या नक्की करू!" ह्या आश्वासनात पूर्ण पावसाळा गेला. आई-नाना दोघांनी, बाळाच्या सेवेसाठी स्वतःला वाहून तर घेतलं होतंच, पण मलाही ह्या बालसेवेसाठी जुंपलं होतं.

अचानक एक दिवस गावाहून निरोप आला. कोणत्यातरी जुन्या खटल्याच्या कामासाठी आई-नानांना तातडीने 'आष्टी'ला जावं लागणार होतं. पण प्रश्न होता खर्चाचा! महिनाअखेर असल्यामुळे हात तसा तंगच होता. खूप विचारविनिमय झाला आणि शेवटी आईने एकटीनेच बाळाला घेऊन जायचं ठरलं.

ही बातमी कानावर पडताच माझ्या मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या! आई आणि बाळ नसल्यावर मिळणारं स्वातंत्र्य आणि मोकळीक... बस्स! पुढचे दोन दिवस नुसती धम्माल करायची, मनसोक्त खेळायचं... माझ्या डोक्यात तर फक्त खेळायचेच विचार सुरू झाले आणि त्या रात्री मला या विचारानं झोपही लागली नाही!

नानांनी सकाळीच आई आणि बाळाला एस.टी.त बसवून दिलं आणि माझ्या स्वातंत्र्याला सुरुवात झाली. मी स्वतः एक-एक करून मित्रांच्या घरी जाऊन त्यांना बोलवलं आणि मैदानात खेळायला घेऊन आलो. माझा आनंद आणि उत्साह माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आम्ही 'लिंगोरचा' खेळायला सुरुवात केली.

खेळ अगदी रंगात आला होता, इतक्यात मला अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि काळजात धस्स झालं! वाटलं आई आणि बाळ परत आले की काय? पण तसं काही झालं नव्हतं. कोणातरी दुसऱ्याचं बाळ रडत होतं. मी पुन्हा जोशात खेळायला सुरुवात केली, पण तरीही मन बेचैन होत होतं. खूप प्रयत्न करूनसुद्धा, आता खेळात तशी मजा येत नव्हती. उत्साहात आरडा-ओरड करणारा मी, आता पूर्णपणे शांत झालो होतो.

ती रात्र फार कठीण गेली. मला कधी बाळ रडत असल्याचा भास होत होता, तर कधी खुळखुळा वाजवल्यावर खळखळून हसणारं बाळ समोर दिसत होतं. मी या कुशीवरून त्या कुशीवर लोळत होतो, पण काहीच फरक पडत नव्हता. बाळ सारखं डोळ्यासमोर येत होतं. एक गोष्ट स्पष्ट जाणवत होती - मला आता आईची आठवण येत नव्हती, तर बाळाची, म्हणजेच माझ्या 'सख्या भावाची' आठवण जास्त येत होती. जे दिवस मी मजेत घालवायचे ठरवले होते, ते असे जातील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.

शेवटी आई परत आली... माझ्या भावाला घेऊन! त्या दिवशी पहिल्यांदाच मी त्याला माझा 'सख्खा आणि लाडका भाऊ' म्हणून माझ्या कुशीत घेतलं. माझे डोळे पाण्याने डबडबले होते आणि तो माझ्याकडे डोळे विस्फारून पाहत होता..

Older brother holding the baby
- प्रस्मित
Share:

भावकी (भाग - ३)

भावकी (भाग - ३) | आम्ही बदलली १३ घरे

आम्ही बदलली १३ घरे (भाग - १०)

भावकी (भाग - ३)

बाळू मामाने अतिउत्साहात मला सांगितलं,

"गणोबा!! अभिनंदन, तुला भाऊ झाला... मज्जा आहे तुझी ! तुला 'दादा-दादा' म्हणणारा आला बघ ! तुझ्याबरोबर खेळायला हक्काचा सवंगडी आलाय आता..."

तो काय म्हणतोय, ते मी डोळे मोठे करून ऐकतच होतो.

"तुला 'मामा-मामा' म्हणणारा आलाय म्हणून तू एवढा खूश होतोयस... म्हणे... तुला दादा-दादा म्हणणारा आलाय!"

वेडेवाकडे तोंड करून, मी मनातल्या मनातच पुटपुटत होतो..

मामाने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, "काय?"

मी फक्त मान नकारार्थी हलवून त्याला 'काही नाही' म्हणालो. तो आत निघून गेला आणि कसली तरी तयारी करू लागला.

त्याचे शब्द माझ्या कानात घुमत होते... "तुला खेळायला सवंगडी आलाय..." हे आज जन्मलेलं, हातभर बाळ... कधी मोठं व्हायचं अन् कधी माझ्याशी खेळायचं?

ह्याला पकडापकडी, लिंगोरच्या, क्रिकेट खेळता येणार आहे का? मला मामाचाच राग यायला लागला होता... खरं तर मला आई-नानांचा सुद्धा राग येत होता. जो जो माणूस आनंदाने मला शुभेच्छा देत होता, त्या प्रत्येकाचा मला राग येत होता. ते झालेलं बाळ फक्त आई-नानांचं होतं... माझं आत्तापर्यंत तरी कुणीच नव्हतं.

शेवटी उशिरा मामी आणि आज्जी, आईला घेऊन घरी आल्या. आई फारच थकल्यासारखी आणि आजारी वाटत होती. मला तिची खूप काळजी वाटली. मी न राहून लगेच पळत जाऊन आईला बिलगणार, तेवढ्यात...

"अरे, गण्या!! सांभाळून ! धसमुसळेपणा करू नकोस... जरा जपून..!"

असा आजीचा वरच्या पट्टीतील आवाज माझ्या कानी पडला आणि माझ्या काळजात चर्र झालं. खूपच वाईट वाटलं... दुपारपर्यंत लाड करणारी माझी आज्जी, चक्क मला रागावत होती...

मी कसंबसं स्वतःला सावरलं. मला वाटलेलं वाईट माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं; पण माझ्या 'प्रेमळ' आजीने त्याकडे सफाईने दुर्लक्ष केलं.

आजीने आईला आणि मामीला तसंच दारात थांबवलं आणि स्वतः लगबगीने आत आली. आमच्या आजीला कुबड आलेलं, म्हणून ती नेहमी वाकूनच चालायची. तशी ती चपळ, पण आज तिच्यात कुठून तरी अजब बळ आलं होतं. ती एकदम तुरुतुरु स्वयंपाकघरात गेली, एक भाकरीचा तुकडा आणि तांब्याभर पाणी घेऊन आली.

ती तो तुकडा आई, मामी आणि तिच्या "नवीन नातवावर" ओवाळू लागली. आम्ही जेव्हा केव्हा पुण्याहून पाटोद्याला यायचो, तेव्हा आजी नेहमी असा भाकरीचा तुकडा ओवाळून टाकायची. मला का करायची ते माहिती नव्हतं, पण आपलं असं स्वागत होतंय हे पाहून भारी वाटायचं.

पण हे हातभर बाळ पुण्याहून कुठे आलं होतं? हे तर इथेच कुठल्यातरी इस्पितळातून आणलं होतं ! तरीही, मी आई आणि मामीच्या मधे थोडी जागा होती तिथे घुसलो, आणि आजीचा तुकडा माझ्यावरूनही ओवाळला जाईल, अशा बेताने उभा राहिलो.

आई आणि बाळासाठी आजीने आधीच एका खोलीची सोय करून ठेवली होती. सर्व सोपस्कार झाले आणि सगळे त्या खोलीत आले. घरातले सर्वजण मामीच्या हातातील, दुपट्यात गुंडाळलेल्या त्या हातभर बाळाकडेच पाहत होते आणि त्याचे कौतुक करत होते. कोणी त्याच्याशी बोबडं बोलतंय, तर कोणी त्याला उचलून कडेवर घेतंय...

मीही, उगाच वेगळ पडायला नको, म्हणून न राहून म्हणालो, "मलापण घ्यायचंय बाळाला कडेवर !"

त्यावर आमचा 'अतिशहाणा' बाळू मामा लगेच म्हणाला, "अरे, बाळ खूप लहान आहे, तुला नाही जमणार घ्यायला!"

Woman scolding young boy in a village house setting

"तुला जमणार नाही..."

हे ऐकल्याबरोबर मी तावातावाने म्हणालो,

"मला जमणार नाही? अरे मला ९३% मार्क पडले आहेत... आणि मला जमणार नाही? तुला पडले होते का कधी? तरी तुला जमलंय ना..."

असंच काहीतरी पुटपुटत, रागाने मी तिथून निघून गेलो.

खूप रात्र झाली होती आणि मला झोप येऊ लागली होती. मी आईच्या त्या खोलीत गेलो, तिथे अजूनही आज्जी आणि मामी होत्या. आईसाठी एक कॉट टाकलेली होती. माझा 'प्लॅन' ह्या कॉटवर आईसोबत झोपायचा होता. मी कॉटवर बसलो, तर कॉट गरम लागत होती. मी हळूच खाली वाकून पाहिलं, तर एका घमेल्यात विस्तव ठेवला होता. पारगावची 'बाळंतिणीची खोली' मी कित्येकदा पाहिलीये, त्यामुळे हे सगळं माझ्यासाठी नवीन नव्हतं. मी तसाच कॉटवर आईच्या शेजारी अंग टाकलं.

तेवढ्यात मामी मला म्हणाली, "अहो, गणेश..."

हो, बरोबर वाचलं तुम्ही! "अहो, गणेशच!" आमच्याकडे नणंदेच्या मुलांना "अहो-जाहो" करायची रीत होती.

मामी पुढे म्हणाली, "तुम्हाला इथे नाही झोपता येणार. तुम्ही आज भैय्या आणि पिंकीसोबत त्यांच्या खोलीत झोपा." (भैया आणि पिंकी माझ्या मोठ्या मामाची मुलं).

हे ऐकून तर माझी गाळणच उडाली. काय? आईला सोडून झोपायचं? या विचारानेच मला भीती वाटायला लागली. आजवरच्या आयुष्यात मी आईला सोडून कधीच झोपलो नव्हतो. आज चक्क आईला सोडून झोपायचं? आज माझ्यासोबत खूप साऱ्या नवीन गोष्टी पहिल्यांदाच घडत होत्या. मला नक्की माहिती होतं की आईला सोडून मला झोप येणारच नाही.

मी हट्टाने मामीला म्हणालो, "नाही, मी इथेच झोपणार..." आणि भिंतीकडे तोंड करून पडून राहिलो.

मला वाटलं, आई माझी बाजू घेईल आणि मामीला समजावून सांगेल. पण झालं उलटंच ! तिने मलाच समजावून सांगायला सुरुवात केली... कुठे तरी आत, काहीतरी 'खळ्ळ' झालं होतं... तो माझ्या बालमनाचा, विश्वासाचा तुकडा पडल्याचा आवाज होता.

आई काय म्हणतेय, तिकडे माझं लक्षच नव्हतं... मी गहन विचारात हरवून गेलो होतो. मामीने मला कधी भैय्या-पिंकीच्या खोलीत आणून सोडलं, हे मला कळलंच नाही.

रात्रभर मी या कुशीवरून त्या कुशीवर वळत होतो... विचार थांबत नव्हते. मी उशीत तोंड खुपसून मोठ मोठ्यानं "आई आई" ओरडत रडत होतो. खूप बळेबळे झोपायचा प्रयत्न केला, तरी घड्याळाच्या काट्याची 'टिक-टिक', मला झोपू देत नव्हती.

Young boy crying on a bed alone at night

जे काही आज माझ्यासोबत होत होतं, त्याला जबाबदार फक्त ते, पहिल्यांदाच घरात आलेलं, 'हातभर बाळ' होतं.

कालपर्यंत माझे लाडके, माझ्या जवळचे असणारे सगळेजण... मला आता सावत्र वाटू लागले होते.

Share:

भावकी (भाग - २)

भावकी - (भाग - २) | आम्ही बदलली १३ घरे

आम्ही बदलली १३ घरे (भाग - ९)

भावकी भाग - २

नुकताच लागलेला निकाल हा आईने मला शिकवताना उपसलेल्या कष्टाचं फळ होतं. गावाकडे, रानात जाताना, ती मला कडेवर घ्यायची आणि डोक्यावर जेवणाच्या डब्यांचं घमेलं असायचं. चालता चालता मला ती बाराखडी पाढे शिकवायची, गोष्टी सांगायची. आमचं शेत गावापासून २ मैलांच्या अंतरावर होतं, ओझं कडेवर असल्यामुळे चालायला वेळ लागायचा. हे बघून वाटेत भेटणारे येणारे-जाणारे, काही जण मस्करीमध्ये पाय खेचायचे, तर काही जण कौतुकाने म्हणायचे,

"मीराबाई, तुह्य ल्योक कलेक्टर व्हईल बघ.. गावात एकदम साहेब व्हऊन यील.."

Mother carrying child and water pot in a village field

पुण्यात आल्यानंतर आईच्या दिनचर्येत जरा बदल झाला होता. तिची धडपड आणि चिडचिड थोडी कमी झाली होती. गावाकडे असताना, मला ती माझी आई वाटायचीच नाही; तिने सारखं स्वतःला काही ना काही कामातच वाहून घेतलेलं असायचं. गावाकडे असताना आमच्या घरात १५ माणसं. स्वयंपाक, धुणी-भांडी आणि वरून आडातून पाणी शेंदून आणून, मोठ्ठाले तीन रांजण भरावे लागायचे. आमचे पंजोबा आणि आजोबांच्या आत्या दोघेही आमच्या घरी, अंथरुणाला खिळून, त्यांची सेवा करावी लागायची. आणि ह्यातून वेळ मिळालाच तर शेतात राबायला जावे लागे.

आणखी एक जगावेगळंच प्रकरण होतं आमच्या घरात. आमच्या वाड्यात, एक बाळंतीणीची खोली होती आणि सर्वांनी अगदी मनावरच घेतलं होतं की काय, ही खोली रिकामी ठेवायचीच नाही. जोपर्यंत आम्ही तिथे होतो तोपर्यंत, झालंही तसंच. त्या खोलीत नेमाने कोणी ना कोणी बाळंतीण असायचीच. मग त्यांची सेवा.. घरातले सर्वजण त्यात व्यस्त.

तशी आई माझी हक्काची, पण तिथे मला तिचा निवांत असा वेळ मिळायचाच नाही. मात्र, पुण्याला आल्यापासून माझी चंगळ होती. आई फक्त माझी होती. जे नाना पारगावला असताना रात्रंदिवस रानात काम करत असायचे आणि बरेच दिवस दिसायचेही नाहीत, आता तेही माझ्यासोबत वेळ घालवू लागले होते. त्यांना हळूहळू काम आणि घर यांचा मेळ घालता यायला लागला होता. त्यांनी नुकतीच मला पंखांची होडी बनवायला शिकवली होती. येणाऱ्या पावसाळ्यात आम्ही अशा होड्या बनवून, आमच्या घराजवळून वाहणाऱ्या ओढ्यात सोडणार होतो.

नानांच्या शिफ्ट असायच्या. जेव्हा केव्हा त्यांची रात्रपाळी असायची, तेव्हा ते त्यांच्या कॅन्टीनमधून मफिन, बन मस्का, खारी किंवा नानकटाई घेऊन यायचे. आता मी एकटाच होतो. जो खाऊ यायचा तो फक्त माझा असायचा. आता त्याचे तीन भाग होणार नव्हते. मी माझ्या 'एकुलता एक' असण्याचा पुरेपूर फायदा घेत होतो.

आमचा दिगू दादाही असाच एकुलता एक, त्याचे पण भरपूर लाड व्हायचे. आत्या आणि मामा त्याला हवं ते आणून द्यायचे. माझ्या धाकट्या आत्यालाही एकच मुलगा - आदित्य. त्याचीही अशीच मजा. घरात येणारी प्रत्येक गोष्ट त्यांचीच. आई-वडील फक्त तुमचेच. फक्त ऑर्डर सोडा, हट्ट करा; पाहिजे ते मिळणार! 'एकुलता एक' असणं म्हणजे मज्जाच! देवाने आदल्या जन्मी केलेल्या पुण्याचं फळ म्हणून की काय, मला हे 'एकुलतेपण' दिलं होतं.

पुण्यातले ते 'एकुलतेपणाचे' राजेशाही दिवस जगत असतानाच उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि आम्ही पाटोद्याला, माझ्या आजोळी गेलो. तिथे गेल्यावरही, जागा बदलली तरी माझा 'रुबाब' मात्र तसाच होता. सुट्टी अगदी मजेत चालली होती. एक दिवस दुपारी, वाड्याच्या प्रशस्त बैठकीत आजोबांची मैफल जमली होती. त्यांचे भलंमोठं मित्रमंडळ तिथे हजर होतं. खुद्द आजोबा माझं 'प्रगती पुस्तक' हातात घेऊन, एखाद्या सरदारासारखे रुबाबात बसले होते.

मध्यभागी तंबाखूने खच्चून भरलेली चिलीम तयार होती. आजोबांनी ती चिलीम डाव्या हातात उचलली. उजव्या हाताने, नारळाच्या शेंडीचा धगधगता निखारा चिलीमीच्या तोंडावर अलगद ठेवला. चिलीमीच्या बुडाला ओलं कापड गुंडाळलं आणि दोन्ही हातांच्या ओंजळीत ती चिलीम अशी पकडली, जणू काही एखादा दागिनाच.

Grandfather sitting with friends holding a chillum

त्यांनी चिलीम तोंडाला लावली आणि डोळे मिटून एक दीर्घ, जोरदार 'दम' लावला. क्षणात, चिलीमी मधला विस्तव फुलला आणि आजोबांनी नाका-तोंडातून धुराचे भलेमोठे लोट हवेत सोडले. तो पांढरा शुभ्र धूर आणि तंबाखूचा तो उग्र वास तिथे पसरला. एक समाधानी हुंकार देत, त्यांनी ती धगधगती चिलीम शेजारी बसलेल्या शास्त्री काकांकडे सरकवली आणि जमलेल्या सगळ्यांना अभिमानाने सांगायला सुरुवात केली—

"आमच्या गणोबान आमच नाव काढलं, पैकीच्या पैकी मार्क पाडलेत.., ते ही पुण्याच्या शाळेत.. हे बघा!"

अस म्हणत, माझं प्रगती पुस्तक, मित्र मंडळीत फिरवलं. मी बैठकीच्या दारात उभा राहून हे सर्व पाहत उभा होतो. त्यांनी माझ्या कडे हात करून हाक मारली "गणोबा, इकडे या.. " आणि माझा हात धरून, पुढचे १५-२० मिनिटे माझं मनसोक्त कौतुक करत होते..

समोरचं दार उघडं होतं, मला दारातून आज्जी आणि मामी, आईला धरून सायकल रिक्षात बसवताना दिसल्या. त्या कुठे तरी चालल्या होत्या. मला पण त्यांच्या बरोबर जायचं होत, पण मी आजोबांचा हात झटकून जाऊ शकत नव्हतो.. मी निमूटपणे तिथे तसाच उभा राहून, त्यांना रिक्षातून जाताना पाहत राहिलो.

Sad young boy sitting on a doorstep

संध्याकाळी, मी दाराच्या चौकटीत बसून आईची वाट पाहत होतो, आई कुठे गेली आहे याचाच विचार करत होतो, आणि तेवढ्यात मामांने मला जे सांगितलं ते ऐकून पायाखालची जमीनच सरकली.. घात झाला..! मी इतका गाफिल कसा राहिलो? आपल्याला कस काही कळलं नाही? ना आईनं काही सांगितलं ना वडिलांनी.. अचानक अस कसं झालं? मी अवाक् होऊन विचार करत होतो. पूर्णपणे गोंधळून जाऊन शांत राहण्याचा प्रयत्न करत होतो..

आता माझ्या प्रत्येक सुखाचा वाटेकरी आला होता... आणि आमच्याच घरात, खुद्द माझ्याच राज्यात, 'भावकी'चा उदय झाला होता!

Share:

भावकी (भाग - १)

भावकी भाग - १ | आम्ही बदलली १३ घरे

आम्ही बदलली १३ घरे (भाग - ८)

भावकी भाग - १

गावाकडे असताना आम्ही तीन चुलत भावंडे एकत्र वाढलो - मी आणि माझ्या काकांची दोन मुलं, दिनेश उर्फ दिनू आणि दीपाली उर्फ बायडी. घरामध्ये मी सर्वात मोठा, त्यानंतर दिनू आणि मग काही वर्षांनी झालेली आमच्या पिढीतली पहिली मुलगी म्हणजे बायडी. दिनू माझ्यापेक्षा सहा महिन्यांनी लहान, पण मला कळू लागल्यापासून तो माझ्यासोबतच असायचा. आमची "गणू-दिनू" ही जोडी घरच्यांपुरतीच, पण गावभर मात्र आम्ही 'बामनाचे गण्या-दिन्या' म्हणूनच प्रसिद्ध होतो.

लहानपणापासूनच मी प्रचंड हट्टी. एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच ! याच्या अगदी उलट दुसऱ्या बाजूला दिनू - एकदम शांत, अतिशय शांत. त्याच्या या शांत स्वभावामुळे मला किती वेळा मार खावा लागला आहे, हे अंकात मोजणे अवघडच. गंमत म्हणजे, मी हट्ट करतोय म्हणून कमी, पण 'हा कसा शांत राहतो, काही मागत नाही' (आणि तू मात्र असा), या तुलनेमुळेच मी जास्त मार खायचो.

मला आठवतंय, एकदा दारात "बुड्डी के बाल" वाला आला होता. हे फेरीवाले सीझननुसार वेगवेगळ्या गोष्टी विकायला यायचे. त्या फेरीवाल्यालाही बहुतेक चांगलेच माहिती असावे की या घरात मी राहतो. 'इथे घंटी वाजवत बसलो की हा पोरगा येणार आणि आपले "बुड्डी के बाल" घेणारच', असा त्याचा अंदाज असावा. त्याच्या सुदैवाने आणि माझ्या दुर्दैवाने, मी तो घंटीचा आवाज ऐकला. ओसरीवर खेळत असलेला मी, लगेच पळत पळत दाराच्या चौकटीजवळ आलो आणि नक्की काय विकायला आले आहे, ते पाहू लागलो. काय आले आहे हे अजून नीट कळलेही नव्हते, पण मला ते हवे होते, हे मात्र नक्की!

लगेच मी घरभर आईला शोधायला सुरुवात केली. तेवढ्यात दिनूही दारात आला आणि बाहेर ओट्यावर येऊन, त्या घंटी वाजवणाऱ्या माणसाकडे नुसता बघत बसला. त्याला बहुतेक त्या घंटीचा आवाज आवडला असावा. इकडे माझा जीव उतावीळ झाला होता. मला पक्के ठाऊक होते की, हा जे काही विकतोय, ते गावच्या दुकानात मिळणारे नव्हते. हा फेरीवाला जाण्याआधी मला ते घ्यावेच लागणार होते, म्हणून माझी घाई चालली होती. पूर्ण घरभर "आई! आई!" करत, मी तिला शोधत होतो.

Mother washing clothes in the village courtyard

शेवटी आई सापडली. ती नुकतीच नदीवरून धुणे धुवून आली होती आणि बादलीत पिळून, वळकट्या झालेले कपडे झटकून दोरीवर वाळत घालत होती. तिने गमछा झटकला आणि थंडगार पाण्याचे शिंतोडे माझ्या अंगावर उडाले. मी अगदी थोडासा शहारलो, पण माझे ध्येय वेगळेच होते - आईकडून "चार आणे" घ्यायचे आणि जे काही त्या घंटीवाल्याकडे आहे, ते विकत घ्यायचे.

"आई ग! चार आणे दे ना," मी मागणी केली.

आईने आजोबांचा शर्ट झटकत सरळ "नाही" म्हणून सांगितले. तिने ना माझ्याकडे पाहिले, ना "कशाला हवेत?" म्हणून विचारले. मी परत एकदा प्रयत्न केला, "आई... दे ना ग!"

आता मात्र तिचे लक्ष वेधण्यात मी यशस्वी झालो होतो. तिने माझ्याकडे पाहिले आणि कपाळावर आठ्या पाडून, डोळे मोठे करून ती ओरडलीच..

"अरे! नाही म्हटलं ना एकदा.. पैसे काय झाडाला लागतात का?"

आणि पुढे ती भरपूर बडबड करू लागली. अगदी दोन सेकंदात तिने तिचं माहेर, तिचं लग्न, माझे वडील, त्यांचे वडील, तिचे वडील, दोन्ही आज्ज्या - सगळ्यांबद्दल काय काय बोलली ते मला काही कळलं नाही आणि मला कळून चुकलं की आपलं टायमिंग गंडलय. तरीसुद्धा ती काय म्हणतेय ते समजून घेण्यात तिळमात्रही रस नव्हता. पण माझं नावसुद्धा 'गण्या' होतं, उगाच मला पूर्ण गाव ओळखत नव्हतं ! मी तिथेच त्या सारवलेल्या अंगणात अंग टाकून लोळण घेतली... आणि भोकाड पसरलं.

हे बघताच आई जी चिडली, तिने मग तिच्या वडिलांपासून ते माझ्या वडिलांपर्यंत, ज्यांचा-ज्यांचा राग आला होता, तो माझ्यावर काढायला सुरुवात केली. तेव्हा परत थोडं वाटलं की, जरा आईचा मूड पाहून विचारायला पाहिजे होतं, पण आता वेळ निघून गेली होती. आधी अंगणात मार खाल्ला, मग तिने मला स्वयंपाकघरात आणून मारलं. मी मोठमोठ्याने ओरडत होतो.. आजीला बोलावत होतो.. मला वाटलं हिच्या सासूबाईच मला वाचवू शकतात आणि झालं पण तसंच.

आजी आली... आईला ती बरंच काही बोलली.. काय बोलली ते माझ्या डोक्यावरून गेलं, पण मला फटके बसणे बंद झाले होते. मी लगेच डोळे पुसत आणि मनगटानेच नाक पुसत आजीला बिलगलो. आजीने विचारलं, "काय झालं? काय पाहिजे तुला? शांत हो, काही नाही.. आपण आईचं घर उन्हात बांधू". आजीचं हे नेहमीचंच.. मी आता चार वर्षांचा झालो होतो, हे सगळं आता मला समजत होतं.

पण मग आजीच्या हाताला धरून मी तिला दारात घेऊन गेलो.. तो "बुड्डी के बाल वाला" तिथेच अगदी निर्लज्जपणे घंटी वाजवत उभा होता. आजीच्या लक्षात आलं, तिने अजूनही बाहेर ओट्यावर उभ्या असलेल्या दिनूला बोलावलं आणि तिच्या बटव्यातून चार-चार आण्याची दोन नाणी काढून माझ्या आणि दिनूच्या हातावर ठेवली.

Two boys sitting on the porch eating cotton candy

आम्ही आनंदाने पळत पळत जाऊन "बुड्डी के बाल" घेऊन ओट्यावरच खात बसलो. पण सासूबाई त्या सासूबाईच ! आजी आईला जाऊन म्हणाली,

"बघ ते सुधाचं पोरगं (म्हणजे दिनू), कसं शांत आहे! करतंय का कसला हट्ट? आणि हे तुझं पोरगं !"

बापरे ! आई भयानक चिडली. आजीचं बोलणं पूर्ण होतंय ना होतंय तोच, आई तावातावात ओट्याजवळ आली आणि मला तसंच ओट्यावरून उचलून घरात घेऊन गेली.. आता पुन्हा..! "सासूबाईंचा" राग ! तिने जे काही मला कुटलं.. या वेळेस वडील, आजोबा, आजी, काका, काकू सगळेच मला वाचवायला धावले..

पण यांच्या ह्या माहेरच्या साडी मुळे माझे हातातोंडाशी 'बुड्ढी के बाल' मात्र "जळाले" होते.

Share:

देव पावला..

 आम्ही बदलली १३ घरे (भाग - ७)


आम्हाला पुण्यात येऊन आता मोजून दीड-दोन वर्षे झाली होती. जसं चाललं होतं, त्यात आम्ही समाधानी होतो. आत्या आणि दिग्गु दादाच्या आशीर्वादाने, माझं शिक्षण जोरदार चालू होतं. आता आम्ही आमचं दुसरं घर बदलून, तिसऱ्या भाड्याच्या घरात राहायला गेलो होतो. घरे बदलत होती, पण माणसं आणि माझी मित्रमंडळी मात्र तशीच होती; उलट आमचा गोतावळा वाढत चालला होता. त्यावेळी माझी सगळ्यांशीच मैत्री व्हायची - भाजीवाला, पेरूवाला, गोळ्यावाला, दुकानदार, केळीवाला, मटकीवाली... अगदी सगळ्यांशीच!

जेवढ्या पटापट माझे मित्र बनत होते, तेवढ्या वेगाने आई-वडिलांची ओळख मात्र वाढत नव्हती. दर महिन्याच्या अखेरीस पैशांची अशी काही कडकी असायची की, दुसऱ्याकडे हात पसरण्याशिवाय पर्याय नसायचा.

त्या दिवशी आईचा उपास होता. नाना कामावर गेले होते; घरी मी आणि आई दोघेच होतो. आईला उपास असला की साबुदाण्याची खिचडी मिळेल, या आशेवर मी वाट पाहत बसायचो पण, आज घरात काहीच हालचाल नव्हती — ना साबुदाणा भिजवलेला, ना भगरीची तयारी.

शेवटी मी आईला विचारलं,“का गं, आज खिचडी नाही का करणार?”
आईने शांतपणे उत्तर दिलं, “नाही.”
“मग भगर करणार आहेस होय?” मी आशेने विचारलं.
पण उत्तर पुन्हा “नाही” असंच आलं.

खूप खोदून विचारल्यावर समजलं की घरात ना साबुदाणा, ना शेंगदाणे, ना भगर — काहीच नव्हत. शेजाऱ्यांकडे उसने मागायचा विचार डोक्यात आला, पण, या चाळीत नवीन असल्यामुळे शेजाऱ्यांशी तितकीशी ओळख अजून झाली नव्हती. माझा खिचडी-भगर खाण्याचा प्लॅन डोळ्यादेखत फसत होता. 

“आई, मी जरा खेळून येतो,” मी म्हटलं आणि तडक बाहेर पडलो. जवळच्या मारवाड्याच्या दुकानात शिरलो. थेट काही विचारायची हिंमत नव्हती; म्हणून मी वेळ काढण्यासाठी त्याला नाहक प्रश्न विचारत बसलो — “हे काय आहे? ते काय आहे? हे कितीला दिलं?” बहुतेक, त्याच्या लक्षात आलं असावं की मला काहीतरी बोलायाचं आहे. शेवटी, मी संधी हेरून विचारलंच,

“काका, आम्ही या भागात नवीन आलो आहोत. उधारीवर किराणा देणारे दुकान शोधतोय. तुम्ही उधार द्याल का?”

तो थोडा गोंधळला आणि म्हणाला, “तुझे आई-वडील कुठे आहेत? त्यांना पाठव, बोलेल मी त्यांच्याशी.” आणि विषय संपवून तो आत जायला वळला.

मग मात्र न राहवून मी त्याला खरी परिस्थिती सांगितली. देवास ठाऊक त्याच्या मनात काय आलं,पण त्याने लगेच भगर आणि शेंगदाण्याच्या पुड्या बांधायला घेतल्या. माझ्या चेहऱ्यावर आशेचे हसू उमटले आणि वाटलं देवच पावला. त्या बांधलेल्या पुड्या माझ्या हातात देत तो हसून म्हणाला, "घे, झाली बघ तुमची उधारी सुरू!"

त्या क्षणी मला कळलं, बोलणं किती गरजेचं आहे. आपल्याकडे म्हणतात ना, "बोलणाऱ्याची माती विकली जाते, पण न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही". जर मी त्यादिवशी बोललो नसतो, तर आईला मात्र कडकडीत उपास घडला असता. म्हणून ठरवलं — अडचण आली की शांत बसायचं नाही; बोलून, धडपड करून, हार न मानता ती अडचण दूर करायची.

या प्रसंगाने माझा आत्मविश्वास काहीच्या काही वाढला होता. त्यानंतर उधारीसाठी नवीन किराणा दुकान शोधण्याची जबाबदारी माझीच असायची. माझ्या या बडबडेपणामुळेच पुढे आई-नाना 'गण्याची आई' आणि 'गण्याचे वडील' म्हणून फेमस झाले.

नुकताच माझ्या शाळेचा निकाल लागला होता. हा काही पहिलाच निकाल नव्हता, पण या वेळेस पहिल्यांदाच मी ९०% चा टप्पा ओलांडून थेट ९३.२०% गुण मिळवले होते. सगळीकडून नुसता कौतुकाचा वर्षाव होत होता आणि मी त्या कौतुकाने हुरुळून जात होतो.

खरं तर अडचणींना कसं सामोरं जायचं हे मला जमलं होतं; पण कौतुकाला कसं तोंड द्यायचं—ते कधीच सोपं झालं नाही. समोरची व्यक्ती जेव्हा कौतुक करते, तेव्हा मी काय करावं, डोळे कुठे वळवावेत, हात-शरीर कसे ठेवावेत—हे कळतच नाही. आतून मन भरून येतं, आनंद होतो; पण बाहेरून मी गोंधळलेला दिसतो आणि काहीच सुचत नाही. आजही कोणी कौतुक केलं की मी गोंधळून जाऊन काहीतरी अचरट बडबड करून मोकळा होत आणि नंतर स्वतःलाच हसू येतं.

सगळेच न चुकता आई आणि नानांचं कौतुक करत होते. 
"बेस्ट केलंत... तुम्ही पुण्यात आलात!",
"तुमचा मुलगा तुमचं नाव काढणार", 
"तुमच्या कष्टाचं चीज झालं," 

असे उद्गार ऐकायला मिळत होते, ऐकून त्यांना हायसं वाटत होतं. आई ने तर आकाशवाणीच्या कार्यक्रमात फोन करून, "तुझे सूरज कहू या चंदा..." हे गाण देखील ऐकवायला सांगितलं होत. खुश झाली होती दोघ अगदी. आजी-आजोबांच्या विरोधात जाऊन, आईच्या दूरदृष्टीमुळेच नानांनी पुण्याला येण्याचा निर्णय घेतला होता. या कौतुकानं, 'पुण्याला यायचा निर्णय योग्यच होता', असं आता त्यांना मनापासून वाटायला लागलं होतं.

पण कुणास ठाऊक, नशिबात पुढे काय वाढून ठेवलं होत? अस काही घडलं ज्याचा विचार मी स्वप्नातही केला नव्हता.


क्रमशः 

                                                                                                                                                                                                           - प्रस्मित



Share:

गरीबी - पुण्याची आत्या आणि तिचा दिवा..

 आम्ही बदलली १३ घरे (भाग ६)


माझ्या ओळखीची एकुलती एक श्रीमंत व्यक्ती म्हणजे माझी लाडकी पुण्याची आत्या. ती अगदी प्रेमळ, मायाळू आणि साधीभोळी. सात भावंडांमध्ये ती सगळ्यात श्रीमंत असली, तरी गर्व आणि अहंकाराचा वाराही तिला कधी लागला नाही. श्रीमंतीचा बडेजाव न करता ती प्रत्येकाशी, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, मनापासून आणि आपुलकीने वागायची. तिच्याकडे गेल्यावर कधीच परकेपण जाणवले नाही; उलट, तिच्या श्रीमंतीपेक्षा तिचे मनच जास्त श्रीमंत, असे मला नेहमी वाटायचे.

आमचे मामा (आत्याचे यजमान) ही तसेच, अगदी कर्तबगार. मी त्यांच्याकडून खूप वेळा त्यांच्या लहानपणीचे किस्से ऐकले होते. त्यांनी आणि त्यांच्या भावंडांनी कसे हलाखीत दिवस काढले, काबाडकष्ट करून प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात कसे यश संपादन केले, हे ऐकायला खूपच मजा यायची. ते नेहमी मला म्हणायचे, "गण्या, पडेल ते कष्ट कर, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायची तयारी ठेव, यश झक मारत तुझ्याकडे येतं की नाही ते बघ." बहुतेक माझ्या आई-बाबांनाही त्यांनी असेच सांगितले असावे आणि त्यामुळेच आम्ही आमचा 'बारधाना' घेऊन पुण्यात कष्ट करण्यासाठी आलो होतो.

त्यांच्या वंशाला एकच दिवा, दिवा म्हणजे अगदी दिवाच! आमच्या सर्वांच्या आधी या भूतलावर येऊन, सर्वांकडून जबर लाड करून घेतलेला तो 'जावयाचा पोर'. जर तुम्ही मराठीतला "माझा छकुला" चित्रपट पाहिला असेल, तर त्यातला हा 'छकुला'. एकदम खोडकर! तो जेव्हा जेव्हा गावाकडे यायचा, तेव्हा घरचेच काय पण सारं गाव त्याच्या पुढे-पुढे करायचं. कोणी दूध आणून देतंय, कुणी कैऱ्या, कुणी चिंचा तर कुणी पेरू. तो घरी आला की आज्जी आणि सर्व माम्या-मावश्या स्वयंपाकघरात पक्वान्न बनवण्यात स्वतःला वाहून घ्यायच्या. 'मामा लोक' म्हणजे माझे वडील आणि काका, यांच्या मागे तर एकच काम - त्याच्यासाठी बंब पेटवून पाणी तापव, हुरडा भाज, त्याला सायकलवर गावभर फिरव, नाहीतर त्याच्यासाठी खास बैलगाडी जुंपून त्याला चक्कर मारून आण. हुशsss... एवढं सगळं पाहून माझा आणि माझ्या चुलत भावंडांचा अगदी जळफळाट व्हायचा.

पण आम्ही पुण्यात आल्यानंतर माझा पहिला झालेला जीवलग मित्र तोच, आमचा "दिग्गु दादा". आमच्यात फक्त एका वर्षाचंच अंतर, म्हणून आमचं जमायला काहीच वेळ लागला नाही. त्यानेच मला पुण्याशी पहिली ओळख करून दिली. पुण्यातील विचित्र नावाच्या जागा त्यानेच मला दाखवल्या आणि त्यांच्या इतिहासाबद्दल लांबच लांब 'फेका' ही मारल्या.

दरवर्षी शाळा सुरू झाली की, शाळेला लागणाऱ्या नव्याकोऱ्या वह्या आत्याकडून यायच्या. सोबत दिग्गु दादाची वापरलेली, थोडीफार फाटलेली पुस्तके, सर्व 'नवनीत मार्गदर्शक' (गाईड्स) आणि अगदी थोड्याशा लिहून अर्ध्याच सोडवलेल्या व्यवसायमाला मला मिळायच्या. माझ्या वर्गातील इतर मुलांपेक्षा माझ्याकडे जरा जास्तच साहित्य असायचं. आमची शाळा 'मनपा'ची असल्यामुळे शाळा सुरू झाल्यापासून काहीच महिन्यात नवीन पुस्तके, दफ्तर, बूट आणि दोन गणवेश मिळायचे, यातच आमचं वर्ष सरून जायचं. जोपर्यंत दिग्गु दादाचं आणि माझं माप सारखं होतं, तोपर्यंत त्याचे वापरलेले शर्ट आणि चड्ड्या मला मिळायच्या. पण तो जेव्हा अचानक "मोठ्ठा" झाला, तेव्हा आईचं काम वाढलं होतं; त्याची येणारी प्रत्येक पँट तिला 'ऑल्टर' करून द्यावी लागायची. असा हा आमचा प्रवास निरंतर चालूच होता.

खरं सांगायचं तर, मला त्याचे कपडे घालून भारी वाटायचं, कारण अख्ख्या गल्लीत मी उठून दिसायचो. ते कपडे अंगावर असले की आपण कोणीतरी 'हिरो' आहोत, असं वाटायचं आणि मग मी गल्लीभर 'शायनिंग' मारत फिरायचो.

मी कधीच आई-बाबांकडे "मला जुने कपडे नको, नवीन घ्या" अशी तक्रार केली नाही. कारण, एकदा त्यांनी नवीन कपडे घेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या नवीन कपड्यांना दिग्गु दादाच्या जुन्या कपड्यांची सर नव्हती!

क्रमशः

                                                                                                                                                                                                              - प्रस्मित 

Share:

गरीबी

आम्ही बदलली १३ घरे (भाग ५)





​आपल्या लाडक्या महापुरुषाने म्हणून ठेवलंय, 'Poverty is a state of mind' (गरीबी ही एक मानसिकता आहे). कितीही नाकारायचे म्हटले तरी, माझ्या बालपणीचे अनुभव मला नाईलाजाने का होईना, पण या मताशी सहमत व्हायला भाग पाडतातच.


​आपण गरीब आहोत हे मी आईकडून पदोपदी ऐकलं होतं, पण याची खरी जाणीव व्हायला मात्र जरा वेळ लागला. गावाकडे काय किंवा पुण्यात आल्यावर काय, माझ्या आजुबाजूला सर्वजण आमच्यासारखेच 'ठणठण गोपाळ'. गल्लीत जितकी बिऱ्हाडं राहायची, त्या सर्वांची परिस्थिती थोड्याफार फरकाने सारखीच. कधी कुणाला गरज पडली तर ते आमच्या दारात, आणि आम्हाला गरज पडली, की आम्ही त्यांच्या... असा आमचा शेजारधर्म चालूच असायचा.


​माझ्या आजूबाजूला आणि ओळखीत जेवढी मुले होती, त्यांची परिस्थिती काही वेगळी नव्हती. सर्वजण एकाच शाळेत, आणि तीही म.न.पा.ची. आमचे खेळ, आमचे बोलण्याचे विषय, आमचे छंद, आमच्या आवडीनिवडी आणि आम्हाला क्वचितच मिळणारा खाऊ, सारे काही एकसारखेच!


​असं मला कधी वाटलंच नाही की आपल्याकडे काही कमी आहे किंवा जे बाकीच्या मुलांकडे आहे, ते आपल्याला मिळत नाही. आम्हाला एखादा १०-१२ इंचाचा लोखंडी गज मिळाला की पूर्ण पावसाळा आमचा 'रोवारोवी'चा खेळ चालायचा. माचिसची आणि सिगारेटच्या पाकिटांची कव्हर्स, हीच आमची 'पोकेमोन कार्ड्स' असायची. उन्हाळ्यात वाळलेल्या आंब्याच्या कोयी आणि चिंचुके हीच आमची श्रीमंती.
​त्यामुळे कधीच घरच्यांकडे काही मागावं लागलं नाही. आम्हाला जे मिळत होतं, आमच्या आजुबाजूला जे असायचं, त्यातच आनंद लुटण्यात आम्ही तरबेज झालो होतो.


​त्यावेळी दूर दूर पर्यंत, अगदी आमच्या भाड्याच्या घराच्या पत्र्यांवर जाऊनच नाही, तर शेजारीच असणाऱ्या हाय टेन्शनच्या त्या उंचच्या उंच टॉवरवर चढून जरी शोधलं, तरी एकही श्रीमंताचं घर दिसलं नसतं. एवढेच काय पण माझ्या पाहण्यात वा ओळखीत एकही 'श्रीमंत' म्हणावा असा माणूस नव्हता (माझी आत्या सोडून!).

क्रमशः
                                                                                                                                                                                                                                                                                      - प्रस्मित 

Share:

'कंड' पुराण - अध्याय तिसरा आणि अंतिम.

आम्ही बदलली १३ घरे (भाग ४)

"नळकांड" 


'पाणी जाईल', या एकाच विचाराने जीव कासावीस झाला होता. पाणीच मिळालं नाही तर? अंघोळीला पाणी... धुण्याला पाणी... पाण्याविना दिवस कसा काढायचा? मनात विचारांचं थैमान सुरू होतं. आजूबाजूला कुठून सोय होईल का, याची चाचपणी मी मनातल्या मनात करू लागलो. कोणीतरी सांगितलं होतं की, घरापासून पंधरा मिनिटांवर एक हापसा आहे, तिथून आणता येईल... पण, तो खाजगी मालकीचा! मालकाची हातापाया पडून विनवणी करावी लागते, असं ऐकलं होतं. मी तर ठरवलंच होतं, त्याला भेटल्या-भेटल्या साष्टांग नमस्कार घालून त्याचे पाय धरायचे, पण पाणी मिळवायचंच!

पण, पुढचा प्रश्न 'आ' वासून उभा राहिला... एवढ्या लांबून ती भरलेली घागर आणि बादली उचलून आणणार कोण? आमच्या नळावरूनच मी कसाबसा, टेकवत-टेकवत हे भांडे घेऊन जातो पण, तिथून? अशक्यच! मघाशी वाटलेला दिलासा हवेत फुर्र झाला आणि छातीत पुन्हा धडधड सुरू झाली. शेवटी सगळे पर्याय संपले आणि माझी नजर मम्मीने नळाला लावलेल्या, काठोकाठ भरून वाहणाऱ्या हंड्यावर स्थिरावली.

मी मम्मीला काही बोलणार, इतक्यात मागून कोणीतरी दबक्या पण जरबच्या आवाजात ओरडलं, "पाणी वाया जाऊ देऊ नका, जपून वापरा!"
मी चमकून पाहिलं, तर मम्मी माझ्याकडेच डोळे वटारून पाहत होती! त्या क्षणी मला तिची जी भीती वाटली ना... बापरे! उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर, शेजारच्या गुणा नानीने त्या 'पुतना मावशी'चं जे भयंकर वर्णन केलं होतं, हुबेहूब तशीच मम्मी मला वाटली! नानीचे शब्द जसेच्या तसे कानात घुमू लागले...
ती म्हणाली होती...

"जेव्हा त्या कान्ह्यानं तिचे प्राण ओढले, तेव्हा तिचं खरं रूप बाहेर आलं. अरं, ती बाई नव्हतीच मुळी, साक्षात राक्षसीण! जमिनीवर पडली तेव्हा डोंगरासारखी अवाढव्य! रंग काळाकुट्ट कोळशासारखा आणि तोंड म्हणजे मोठं विवरच! तिचे ते सुळ्यासारखे लांब दात, जणू नांगराचे फाळ! डोळे तर विहिरीसारखे खोल आणि निखाऱ्यासारखे लालभडक... नुसती नजर गेली तरी माणूस जागीच थिजून जावा! केस पिंजलेले, जशी काय वाळलेली झाडंच! तांबूस आणि अस्ताव्यस्त. तिचं शरीर एवढं विक्राळ की, पडताना सहा मैलांवरची झाडं-झुडपं चुरगळून मेली म्हणत्यात! आणि वास? अगं ग ग ग.. मेलेल्या जनावरांसारखा..."

...त्या क्षणी डोळे वटारलेली मम्मी मला अगदी तशीच भासली!

भीतीने माझी गाळण उडाली होती, पण पाण्याची गरज त्या भीतीपेक्षा मोठी होती. आईच्या आठवणीने आणि रिकाम्या बादलीकडे बघून मी धाडस एकवटलं. घशाला कोरड पडलेली असतानाही मी चाचरत म्हणालो, "मम्मी... थोडं... थोडं पाणी घेऊ देता का? एकच बादली..."

पण मम्मी? छे! या दगडाला पाझर फुटेल तर शप्पथ! तिने माझ्याकडे साधं बघितलं सुद्धा नाही. जणू काही मी तिथे अस्तित्वातच नव्हतो. माझे शब्द हवेत धुरासारखे उडून गेले. तिने एका हाताने सुनेला हंडा सरकवायला लावला आणि दुसऱ्या हाताने नळाच्या तोंडाला आपली कळशी लावली. तिचं ते दुर्लक्ष करणं माझ्या जिव्हारी लागलं. मी पुन्हा विनवणी करण्याच्या तयारीत होतो, इतक्यात...

"घुर्रर्र... फुर्रर्र... फस्स्स्स् !!"

नळाने अखेरचा एक मोठा हुंदका दिला आणि पाण्याची ती बारीक धारही लुप्त झाली. नळ कोरडा पडला!
क्षणभर तिथे स्मशानशांतता पसरली. मम्मीने नळाला लावलेली कळशी तशीच रिकामी राहिली होती. पाणी गेलं होतं.

माझ्या पायाखालची जमीन सरकली. डोळ्यासमोर अंधारी आली. आता घरी काय नेऊ? आईला काय सांगू? रिकाम्या बादलीकडे बघताना माझे डोळे भरून आले. रडू अगदी ओठांवर आलं होतं पण, त्याच क्षणी... त्याच क्षणी माझ्या अंगात आमच्या घराण्याचा तो 'गुण' जागा झाला. इतका वेळ दाबून ठेवलेला अपमान, आईच्या आजारपणाची चिंता, त्या बाईचा माज आणि माझी हतबलता... या सगळ्याचं रूपांतर एका जबरदस्त संतापात झालं. अंगाचा थरकाप उडाला, मी थरथरत होतो, पण भीतीने नव्हे, तर रागाने!
माझं भान हरपलं. हातातली ती स्टीलची बादली मी तावातावाने जमिनीवर फेकली...

"धण्ण !!!"

तो आवाज इतका मोठा होता की तिथे उभे असलेले सगळे दचकले. मी थरथरत्या अंगाने आणि रडवेल्या पण संतापलेल्या आवाजात मम्मीकडे बोट दाखवून ओरडलो...

"जिरला ना? जिरला ना आता तुमचा 'कंड'?"

माझा तो अवतार बघून तिथे एकच सन्नाटा पसरला.
मी उच्चारलेले शब्द मम्मीच्या कानात गरम शिसं ओतल्यासारखे शिरले आणि तिची तळपायाची आग मस्तकात गेली! मम्मीचे डोळे मघाशी होते त्यापेक्षा जास्त मोठे आणि लालबुंद झाले. आता ती हातातली रिकामी कळशी फेकून मलाच मारणार की काय, अशी भीती वाटली! ती सुद्धा रागाने थरथरत होती, जणू काही मी तिचा घोर अपमान केला होता.

तिला पाहून मी जरा सावरलो आणि आपण हे काय करून बसलो, ह्याचा विचार करायला लागलो. माझ्यासाठी सिनेमाप्रमाणे अचानक सगळं काही 'स्लो मोशन'मध्ये पुढे चाललं होतं... सगळ्यांचे आवाज, त्यांचे हावभाव, त्यांच्या चेहऱ्यांवरच्या प्रतिक्रिया टिपण्यासाठी मी इकडे-तिकडे पाहू लागलो.
माझी नजर मम्मीच्या सुनांवर पडली. तिच्या सुना, ज्यांना सासूबाईंचा राग माहीत होता, त्या घाबरण्याऐवजी लाजेने पदर थेट नाका-डोळ्यांवर ओढून, मान खाली घालून उभ्या होत्या. मला हे कळलं नव्हतं की मी लाजण्यासारखं असं काय बोललो?

पाणी भरण्यासाठी जमलेल्या त्या बायकांचा घोळका... ज्या मगाशी कुजबुजत होत्या, त्यांच्या तोंडातली मशेरी तशीच थांबली. "अरे बापरे! एवढ्याशा पोरानं मम्मीला सुनावले?" अशा नजरा त्यांनी एकमेकींना दिल्या. काहीजणींना तर आतल्या आत गुदगुल्या झाल्या होत्या, कारण मम्मीला असं कोणीतरी बोलताना त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं होतं.

रांगेत उभे असलेले काका लोक, जे मगाशी कंटाळून 'पाणी कधी मिळतंय' याची वाट बघत होते, ते आता सावरून उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होतं - जणू त्यांना जे जमलं नाही, ते या पोरानं करून दाखवलं होतं!
पण खरी मज्जा तर त्या गल्लीतल्या टवाळ पोरांची झाली होती. जी मुलं कंटाळून कट्ट्यावर बसली होती, त्यांच्यात अचानक चैतन्य संचारलं. एकाने दुसऱ्याला कोपरानं ढोसलं, "ए पद्या... बघ बघ! जोरात राडा झालाय! आज आपली एक तासाची करमणूक फिक्स! आज गण्या ह्या मम्मीचा मार खाणार, नाहीतर घरच्या मम्मीचा तर फिक्स!" काहीजण तर चक्क खिशात हात घालून "आता पुढे काय होणार" याकडे टक लावून उभे होते.
जेव्हा तुम्हाला असं वाटतं की लोक तुमच्याबद्दलच बोलत आहेत, तेव्हा तुमचे कान जरा जास्तच तीक्ष्ण होतात. मम्मीच्या सुनांशेजारीच उभ्या असणाऱ्या राणे आजींच्या कानात फाटे आजी कुजबुजल्याचा आवाजही मला स्पष्ट ऐकू आला, "काय हे, आजच्या नवीन पिढीला मोठ्यांचा आदर नाही, बोलण्याचं काही ताळतंत्र नाही, कसाही बोलतोय? मुलां समोर काही बोलायची सोयच नाही..."
हे ऐकून मला बुजल्यासारखं झालं आणि आपण खूप मोठा घोळ घालून ठेवलाय, याची मला जाणीव झाली.

नळावरचं ते दृश्य एखाद्या सिनेमाच्या क्लायमॅक्ससारखं थिजलं होतं. मम्मी, मी आणि तो माझा प्रश्न...

जिरला ना आता तुमचा 'कंड'?

                                                                                                                                                     - प्रस्मित


Share:

​'कंड' पुराण - अध्याय दुसरा..

आम्ही बदलली १३ घरे (भाग ३)

​"नळकांड"

​आणि तो दिवस उजाडला...
​मी तेव्हा जेमतेम सात-आठ वर्षांचा असेन. घरात आई आजारी होती आणि वडील कामावर गेलेले; त्यादिवशी पाणी भरण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्या त्या चिमुकल्या खांद्यावर येऊन पडली होती. आधीच एक दिवस पाणी आलं नव्हतं, त्यामुळे घरात पाण्याची बोंब!

​पाणी साठवण्यासाठी आमच्याकडे असलेली सगळी भांडी कोरडी ठणठणीत पडली होती. तसंही १० बाय १० च्या त्या खोलीत पाणी साठवण्यासारखी भांडी तरी किती असणार म्हणा? मोरीतली (बाथरूममधली) एक स्टीलची बादली, जिची जागा अंघोळीसाठी ठरलेली असायची; दुसरी एक मोठी प्लास्टिकची बादली, जी नेहमी मोरीच्या भिंतीवर ठेवलेली असायची आणि तिच्या शेजारी तिचा सखा, तिच्याच मापाचा पिंप असायचा... आणि आणखी म्हणजे... आईने जीवापाड जपलेली ती तांब्या-पितळेची 'घागर'! तिला तिच्या मामांनी लग्नात दिली होती म्हणे, त्यामुळे त्या घागरीला हात लावतानाही मला धाक वाटायचा. पण आज पर्याय नव्हता.

​ती घागर आणि बादल्या घेऊन मी नळावर पोहोचलो, तर तिथे जत्राच भरलेली! नळावर प्रचंड गर्दी. प्रत्येकजण 'कमीत कमी एक हंडा तरी पाणी मिळावं' या आशेने नंबर लावून ताटकळत उभा होता. त्यात 'दुष्काळात तेरावा महिना' म्हणतात त्याप्रमाणे, आजूबाजूच्या चार नळांपैकी फक्त एकाच नळाला पाण्याची बारीक धार लागली होती. पाण्यासाठी उडालेली ती झुंबड पाहून माझ्या छातीत धस्स झालं.

​एक-दोघांनी आपली एक-दोन भांडी भरून घेतली आणि अखेर 'मम्मीचा' (शेजारच्या काकूंचा) नंबर आला. तिच्यानंतर माझा नंबर होता. पाणी भरायला मम्मी काही एकटी आली नव्हती, तर तिची अर्धी पलटणच तिथे हजर होती—तिच्या दोन सुना आणि माहेरी आलेली लेक! मम्मीने पहिला हंडा नळाखाली लावला आणि नळाच्या त्या फूटभर उंच कठड्यावर ती ठाण मांडून बसली. पाणी हळूहळू येत होते. हंडा भरला की, तिची एक सून तो उचलायची आणि त्या जागी मम्मी लगेच दुसरा रिकामा हंडा लावायची. इकडे नळाला लावलेला हंडा भरेपर्यंत, तिच्या त्या चपळ सुना भरलेले हांडे रिकामे करून परत हजर व्हायच्या. अशा त्यांनी साधारण ८-१० चकरा केल्या.

​मी मात्र एका कोपऱ्यात तसाच ताटकळत उभा होतो. मला वाटले, कदाचित मम्मीला मी आणि माझी रिकामी भांडी अजून दिसली नसावीत, म्हणून तिने मला पाणी भरू दिले नसावे. माझा लोकांच्या चांगुलपणावर जरा जास्तच विश्वास होता, म्हणून मी तो पडताळून पाहायचे ठरवले. मी तसाच हाताची घडी घालून मम्मीच्या मागे उभा होतो. मी पायानेच हळूच माझी बादली पुढे सरकवली. बादलीचा थोडा 'खडखड' आवाज झाला. मम्मीने माझ्याकडे एका तिरक्या नजरेने पाहिले, पण चेहऱ्यावर काहीच भाव आणले नाहीत. उलट, ती सुनेला म्हणाली, "अगं, येताना तो स्टीलचा मोठा हंडा घेऊन ये..." ​हे ऐकून मात्र माझ्या पोटात गोळा आला. पाण्याच्या त्या बारीक धारेकडे पाहून वाटत होते की, नळ आता कधीही आपला दम सोडेल आणि आमचे घर आज पाण्यावाचून कोरडेच राहील.

क्रमशः

                                                                                                                                                            - प्रस्मित
Share:

'कंड' पुराण - अध्याय पहिला.

आम्ही बदलली १३ घरे (भाग २)

आमचं कुटुंब मूळचं मराठवाड्यातलं, पण वडिलांच्या नोकरीमुळे (आमच्या उदरनिर्वाहासाठी) पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेलं. घरात देशस्थ ब्राह्मणी वातावरण असूनही, आम्हाला लहानपणापासून अस्सल "मराठवाडी" भाषा आणि लहेजा ऐकण्याचं भाग्य लाभलं. पण गंमत अशी की, आमचे ते मराठवाडी शब्द पचवायला पुणेकर तेव्हा तयार नव्हते. त्यामुळे आई-बाबांनी एक अलिखित नियमच केला होता— आमचा मराठवाडी बाणा फक्त घराच्या चार भिंतींत आणि उंबरठा ओलांडला की बाहेर कटाक्षाने 'पुणेरी' सभ्यतेचा मुखवटा! आज तीन दशकांहून अधिक काळ लोटला, तरी आम्ही अजूनही "पुणेरी" दिसण्याचा आणि बोलण्याचा तो केविलवाणा प्रयत्नच करत आहोत.

पण म्हणतात ना, भाषा ही प्रवाही असते, ती एका जागी साचून राहत नाही. काळाचा महिमा बघा, ज्या शब्दांना पुण्यात कधीकाळी गावंढळ समजले जायचे, तेच शब्द आजच्या पिढीने चक्क "कूल" म्हणून स्वीकारलेत. उदाहरण घ्यायचं झालं तर — "गंडवणे".
नव्वदच्या दशकात पुण्यात हा शब्द ऐकला की लोकांच्या भुवया "कपाळात" जायच्या. मोठी चोरी, फसवणूक किंवा एखाद्याला भयानक संकटात लोटणे, अशा गंभीर गुन्ह्यांसाठी पुणेकर हा शब्द वापरायचे. पण आमच्या घरात? आमच्या घरात हा शब्द काही नवीन नव्हता! कुणाकडून ना कुणाकडून, कधी भावंडांकडून, कधी नातेवाईकांकडून कानावर पडायचाच— "काय गंडवतोय का?", "हे गंडलंय बघ", "त्याला गंडा लावला". बाहेरच्या जगासाठी हा शब्द जरी 'जहाल' आणि स्फोटक असला, तरी आमच्यासाठी तो अगदी 'पाळीव', निरुपद्रवी आणि सौम्य होता.

असाच आमच्याकडे 'सौम्य' शब्दांचा एक शब्दकोश होता. "मेल्या", "मुडद्या", "थोबडतोंड्या" या आम्हाला लहानपणी खोड्या केल्यावर आज्जी, आत्या, मावशी आणि आईकडून सुद्धा मिळणाऱ्या उपाध्या होत्या. याशिवाय गावाकडचे असे काही शब्द कानावर पडायचे, ज्यांचा अर्थ गुगललाही सापडणार नाही— वंगाळ, येंगने, खळगूट, मोकार, रिकामचोट, म्हंग, अन् म्हंग... ही यादी न संपणारी आहे.

यातलाच नेहमीचा ऐकिवातला शब्द म्हणजे— "कंड". हो, बरोबर वाचलंत, "कंड".
कोणी हट्टीपणा किंवा रगेलपणा केला की हमखास ऐकायला मिळणारं वाक्य म्हणजे, "थांब!! तुझा चांगलाच कंड जिरवते". एखाद्याला एखाद्या गोष्टीची जरा जास्तच विशेष आवड असेल, तरी त्याला "फार कंड आहे". त्यामुळे माझ्या सात-आठ वर्षांच्या चिमुकल्या मेंदूत एक साधं समीकरण पक्कं झालं होतं: कंड = मस्ती, हट्टीपणा किंवा फार तर फार माज. (या शब्दाचा बाहेरच्या जगात काहीतरी 'प्रौढ' आणि भलताच अर्थ असू शकतो, याची त्या वयात पुसटशी कल्पनाही नव्हती!).

आणि हो, हे कमी की काय म्हणून, वारसाहक्काने मिळालेल्या आणि याच शब्दाशी नातं सांगणाऱ्या एका "गुणापासून" मी त्या दिवसापर्यंत पूर्णपणे अनभिज्ञ होतो...
क्रमशः

                                                                                                                                                                            - प्रस्मित
Share:

Overthinking

Share:

​✨ "मम्मी" ✨

आम्ही बदलली १३ घरे (भाग १) 

माणूस एकदा घर बदलतो, दोनदा बदलतो... आम्ही तब्बल १३ वेळा बदलली!

प्रत्येक घरातलं वातावरण वेगळं, तिथले प्रश्न वेगळे आणि तिथली 'पात्रं' तर त्याहून वेगळी. घर बदलण्याच्या या धावपळीत सामानाची मोडतोड झाली, त्रास झाला, पण अनुभवांची मात्र श्रीमंती मिळाली.

​या लेखमालेतून मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या या १३ घरांच्या प्रवासावर. जिथे तुम्हाला भेटतील काही कडू, काही गोड आणि काही निव्वळ हसवून लोळवणारी माणसं!

​सुरुवात करूया पुण्यातल्या एका चाळीवजा घरातून... जिथे पाण्यासाठी युद्ध व्हायचं ..वाचा, माझा हा पहिला अनुभव...



लहानपणी आम्ही पुण्यात (पिंपरी - चिंचवड मधे) एका भाड्याच्या खोलीत राहायचो. "भाड्याची खोली" म्हटलं, की ज्या-ज्या गोष्टी डोक्यात येतात किंवा "डोक्यात जातात", त्या सगळ्या तिथे हजर होत्या. १०x१२ ची ती 'प्रशस्त' खोली, सार्वजनिक शौचालय, घरमालकाची अखंड कटकट आणि आमचा तो विख्यात 'सार्वजनिक नळ'... यादी बरीच मोठी आहे!

​आमचा नळ... म्हणजे फक्त आमचाच नाही, तर आजूबाजूच्या तीस-एक कुटुंबांची ती जीवनवाहिनी (आणि रणभूमी) होती. पाणी सकाळी आणि संध्याकाळी जेमतेम दोन-दोन तास दर्शन द्यायचं. त्यामुळे सकाळी पाणी जाऊन नळ कोरडा पडला, की लोक संध्याकाळच्या पाण्यासाठी तिथे हंडा-कळशी ठेवून 'बुकिंग' करायचे. काहीजणांची दादागिरी तर अशी, की एकदा का नळाचा ताबा घेतला, की घरातली सर्व भांडी... अगदी तांबे, पेले आणि वाटी-चमचे काठोकाठ भरल्याशिवाय ते नळाचा ताबा सोडत नसत. चुकून कोणी त्यांना जाब विचारलाच, तर 'उच्चकोटीच्या' अस्सल गावरान मराठी भाषेत तुमचा आणि तुमच्या सकल खानदानाचा यथेच्छ उद्धार झालाच म्हणून समजा!

​​या नळावरच्या रणरागिणींमध्ये आमच्या एक काकू होत्या. एकदम धष्टपुष्ट आणि दणकट!... सततच्या आठ्यांमुळे सुरकुतलेलं कपाळ आणि त्यावर नवऱ्याच्या कर्तृत्वापेक्षाही (आणि आकारापेक्षाही) मोठं लावलेलं कुंकू! जेमतेम हातभर केस, पण त्यांचा कसंबसं बांधलेला अंबाडा. सहावारी साडी अंगाला अपुरी पडेल या भीतीने बहुतेक त्या नऊवारी नेसायच्या. तोंडात मशेरी आणि सोबतीला चारचौघींचा घोळका घेऊन त्या गप्पा छाटत बसलेल्या असायच्या. या चारचौघी म्हणजे आमच्या गल्लीचे 'सीसीटीव्ही कॅमेरे' होत्या आणि आमच्या ह्या काकू म्हणजे त्यातला 'मास्टर कॅमेरा'!

​एक गोष्ट मात्र मला आजपर्यंत न उमगलेलं कोडं आहे, ती म्हणजे अख्खी गल्ली ह्या काकूंना "मम्मी" म्हणायची. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत... "मम्मी"! अमुकची मम्मी किंवा तमुकची मम्मी नाही, तर युनिव्हर्सल "मम्मी". त्याकाळी आई-बाबांना मम्मी-पप्पा म्हणण्याचं नवीनच फॅड आलं होतं. काही अतिउत्साही मुलं तर काका-काकूंना सुद्धा 'मोठे पप्पा' आणि 'मोठी मम्मी' म्हणायची. स्वतःच्या आईला मम्मी म्हटलं तर समजू शकतो, फार तर सासूच्या धाकापोटी तिला 'मम्मी' म्हटलं तरी तो नाईलाज समजता येईल, पण दुसऱ्याच्या आईला, काहीही संबंध नसताना 'मम्मी' म्हणणं म्हणजे... हद्दच झाली राव!

​बरं, या 'मम्मी'ला मम्मी म्हणणारे तिच्या घरात तरी कुठे कमी होते? तीन मुले आणि एक मुलगी! दोन सुपुत्रांची लग्ने झाल्यामुळे दोन सुना, मुलीचं लग्न झालं असूनही तिचा मुक्काम सतत माहेरीच, आणि उरला सुरला सगळ्यात धाकटा... ज्याच्यासाठी मम्मीचा 'सुनेचा शोध' हा अविरत चालूच होता!

क्रमशः

                                                                                                                                                                            - प्रस्मित

Share:

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या

Powered by Blogger.

Contact form

Name

Email *

Message *

Most Popular

Popular Posts